वाढते शहरीकरण व त्यामुळे निसर्गावर होणारा प्रतिकूल परिणाम हा विषय प्राणीकथेच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणाऱ्या ‘दिल्ली सफारी’ या चित्रपटाने थेट ऑस्करच्या शर्यतीत झेप घेतली आहे. लहानग्यांबरोबरच मोठय़ांनाही भावलेल्या या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारासाठी जगभरातील सवरेत्कृष्ट अ‍ॅनिमेशनपटाच्या यादीत नामांकन मिळाले आहे. विशेष म्हणजे, ‘दिल्ली सफारी’सह या यादीत २१ अ‍ॅनिमेशनपट आहेत.

जंगले कमी कमी होत आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे जंगलावर अतिक्रमण केले जाते. हाच विषय प्राण्यांच्या माध्यमातून अतिशय निराळ्या पद्धतीने दिग्दर्शकाने या अ‍ॅनिमेशनपटातून मांडला आहे. कथानकाबद्दल दिग्दर्शकाचे समीक्षकांकडून कौतुक झाले आहेच. त्याचबरोबर बॉलीवूडच्या अनेक नामवंत कलावंतांनी यातील प्राण्यांना आवाज दिले आहेत हेही या अ‍ॅनिमेशनपटाचे वैशिष्टय़ ठरले. हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये हा अ‍ॅनिमेशनपट असून भारतातील पहिला स्टिरिओस्कोपिक थ्रीडी अ‍ॅनिमेशनपट हेही ‘दिल्ली सफारी’चे वैशिष्टय़ ठरले. आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे पुणेस्थित क्रेयॉन पिक्चर्स या थ्रीडी अ‍ॅनिमेशन स्टुडिओचे अनुपमा पाटील आणि किशोर पाटील हे या अ‍ॅनिमेशनपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटासोबत  ‘ब्रेव्ह’, ‘डॉ. सेऊस द लोराक्स’, ‘हॉटेल ट्रान्सिल्व्हानिया’, ‘आईस एज : कॉन्टिनेन्टल ड्रिफ्ट’ आणि ‘मादागास्कर थ्री: युरोप्स मोस्ट वॉन्टेड’ या गाजलेल्या अ‍ॅनिमेशनपटांनाही ऑस्करसाठी नामांकन मिळाले आहे.

ऑस्कर नामांकन गटातील निवडीबद्दल दिग्दर्शक निखिल अडवानी यांनी आनंद व्यक्त केला. ‘कल हो ना हो’, ‘सलाम ए इश्क’, ‘पतियाला हाऊस’ , ‘चांदनी चौक टू चायना’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन निखिल अडवानी यांनी केले आहे. ‘दिल्ली सफारी’  या हिंदी अ‍ॅनिमेशनपटात ऊर्मिला मातोंडकर, गोविंदा, अक्षय खन्ना, सुनील शेट्टी, बोमन इराणी या कलावंतांनी प्रमुख प्राणी व्यक्तिरेखांना आवाज दिले आहेत. इंग्रजी अ‍ॅनिमेशनपटासाठी भारताबाहेरील कलावंतांनी प्राणी व्यक्तिरेखांना आवाज दिले आहेत. संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांचे संगीत असलेल्या अ‍ॅनिमेशनपटाची पटकथा गिरीश धमिजा, सुरेश नायर यांनी लिहिली आहे.   

 

Story img Loader