रेश्मा राईकवार
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
एखादा विषय आपल्याला खूप छान समजला आहे आणि आपणच तो चांगल्या पद्धतीने मांडू शकतो अशा आवेशात चित्रपट करताना त्याचा किमान अभ्यास आहे की नाही याचाही विचार केला जात नाही. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून असे विषय जेव्हा पडद्यावर उथळ पद्धतीने विनोदी शैलीत मांडण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा याला मनोरंजन म्हणतात का? असा प्रश्न छळत राहतो. धड रंजन नाही आणि धड कर्त्यांनाही त्या विषयाचं गांभीर्य नाही हे ठायी ठायी जाणवून देणाऱ्या ‘डिलिव्हरी बॉय’चा पडद्यावरचा खळखळाटही भयंकर आहे.
‘डिलिव्हरी बॉय’ नामक या चित्रपटात पर्यायी मातृत्व (सरोगसी) या विषयावरची कथा दाखवण्यात आली आहे. या विषयाचे अनेक पैलू आहेत. पर्यायी मातृत्व या विषयाबद्दल अजूनही गावखेडय़ात असलेलं अज्ञान, ज्यांना खरोखरच स्वत:चं मूल हवं आहे त्या जोडप्यांची त्यासाठी होणारी तगमग, त्यातही आयव्हीएफ प्रक्रियेतील गुंतागुंत समजून घेत त्यासाठीची मानसिक आणि आर्थिक तयारी, पर्यायी माता (सरोगेट मदर) मिळवण्यात येणाऱ्या अडचणी आणि पैशाचं आमिष दाखवून गरीब स्त्रियांना त्यासाठी तयार करत उभा राहिलेला बाजार असे या विषयाचे अनेक पदर आहेत. हे सगळे पदर एकाच कथेत कोंबून मांडण्याचा प्रयत्न ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटात झाला आहे. पर्यायी मातृत्व या विषयावर याआधीही चित्रपट येऊन गेले आहेत. मराठीतच ‘मला आई व्हायचंय’ हा सुंदर चित्रपट २०११ साली प्रदर्शित झाला होता. त्याचीच हिंदी आवृत्ती असलेल्या ‘मिमी’ या चित्रपटानेही चांगलं यश मिळवलं. त्यामुळे हा विषय नवीन नाही, पण २०२१ साली आपल्याकडे सरोगसी कायदा करण्यात आला आणि २०२२ मध्ये नियमांतही अधिक स्पष्टता आणली गेली. एकीकडे या विषयाबद्दल अज्ञान असल्याने त्याविषयी माहिती देण्याच्या उद्देशाने चित्रपटाचा घाट घातला गेला की गावाकडे एकूणच या विषयावरून होणारा गोंधळ आणि पर्यायी माता शोधण्यातून झालेल्या बाजारीकरणावर, स्त्रियांच्या फसवणुकीवर प्रकाश टाकावा म्हणून चित्रपट प्रपंच केला गेला काही कळत नाही. मात्र एकंदरीतच हा संपूर्ण विषय मनोरंजनाचा नको तो मसाला लावून सादर करण्यात आला आहे.
हेही वाचा >>>नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटात ‘शूर्पणखा’च्या भूमिकेत झळकणार ‘ही’ अभिनेत्री, जाणून घ्या
गावाकडे जागा-जमीन भाडे-विक्रीसाठी उपलब्ध करून देणारा दलाल दिगंबर कानतोडे (प्रथमेश परब) आणि त्याचा साथीदार चोच्या (पृथ्वीक प्रताप) यांना व्यवसायात यश येत नाही आहे. कामधंदा नाही त्यामुळे दिगंबरचं लग्न होत नाही. या गोंधळात असताना डॉ. अमृता देशमुख नावाची एक तरुणी तिला इस्पितळासाठी मोठी जागा हवी म्हणून या दोघांकडे येते. तिला हवी तशी जागा उपलब्धही होते, पण ज्या गावात अगदी पै-पै मोजून गावकरी खर्च करतात तिथे हजारो-लाखो खर्च करून लोकांच्या रांगा लागल्या आहेत, परदेशी-शहरातली मंडळी या इस्पितळात येत आहेत हे पाहून चक्रावलेले दिगंबर आणि चोच्या हे इस्पितळ नेमकं कशाचं याचा शोध घ्यायचा ठरवतात. त्यातून त्यांना सरोगसी आणि त्या अनुषंगाने गावातील महिलांना रोजगाराची संधी मिळू शकते याचा शोध लागतो. शिवाय, इथेही त्यांना दलालीतून मोठी रक्कम मिळणार असते. तर मुळात चित्रपटाची सुरुवातच या मुद्दय़ावरून सुरू झालेली असल्याने पुढे तो आणखी भरकटत जातो. नाही म्हणायला या सगळय़ात मूल होत नाही म्हणून स्त्रियांना घराघरांतून मिळणारी वागणूक, टोमणे, पुढे या स्त्रियांना पैसा मिळत असला तरी बाळत होत जाणारी त्यांची भावनिक गुंतवणूक, बाळ चांगलंच पाहिजे म्हणून असलेला छुपा दबाव या सगळया समस्यांना लेखक – दिग्दर्शकांनी स्पर्श केला आहे. पण हा जाता जाता या समस्यांचा उल्लेख होतो तो या चित्रपटाचा नायक दिगंबर ऊर्फ भाऊचं मन हेलावण्यासाठी.. त्यातल्या त्यात सरोगसीचा कायदा आणि नवे नियम यांचा यात उल्लेख असल्याने निदान प्रेक्षकांची दिशाभूल होत नाही.
चित्रपटाचं लेखन राम खाटमोडे आणि विवेक वणवे या तरुणांनी केलं आहे. याच लेखक जोडगोळीचे दिग्दर्शन असलेला ‘नवरदेव बीएस्सी अॅग्री’ हा चित्रपट गेल्या आठवडयात प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटाचा विषय आणि मांडणी करताना जे भान होते ते या चित्रपटात नावालाही आढळून आलेले नाही याचं आश्चर्य वाटतं. ‘डिलिव्हरी बॉय’चं दिग्दर्शन मोहसीन खान यांनी केलं आहे, मात्र चित्रपट कथेतच ढेपाळला आहे. त्यामुळे दिग्दर्शनात नवं काही मिळण्याची आशाच उरत नाही. प्रथमेशला इतका विचित्र लुक देण्यामागचं कारण कळत नाही. बाकी त्याने त्याच्या नेहमीच्या सहजतेने दिगूची भूमिका केली आहे. मात्र यावेळी पृथ्वीक प्रतापचा चोच्या दिसण्यात आणि अभिनयातही त्याच्यापेक्षा अधिक भाव खाऊन गेला आहे. अंकिता पाटीलची डॉ. अमृता ही भूमिका महत्त्वाची असूनही तिला दिगू आणि चोच्यापुढे करण्यासाठी काही वावच दिलेला नाही. बाकी गाणी, छायांकन सगळय़ाच आघाडय़ांवर चित्रपट फार काही वेगळा आहे असं नाही. त्यामुळे एका चांगल्या विषयाची उथळ मांडणी करणारा ‘डिलिव्हरी बॉय’ निराशा करतो.
डिलिव्हरी बॉय
दिग्दर्शन – मोहसीन खान
कलाकार – प्रथमेश परब, पृथ्वीक प्रताप, अंकिता लांडे पाटील, गणेश यादव, विजय पटवर्धन.