उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस कायमच चर्चेत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या अनेक गोष्टींवर आपलं मत अगदी परखडपणे मांडताना दिसतात. यामुळे कित्येकदा त्यांना ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला आहे. अमृता या पेशाने बॅंकर असून त्या उत्तम गायिकाही आहेत. गाण्यांच्या माध्यमातून त्या प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. नुकतंच त्यांनी झी मराठी वाहिनीवरील ‘बस बाई बस’ या क्रार्यक्रमात हजेरी लावली.

अभिनेता सुबोध भावे ‘बस बाई बस’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. या कार्यक्रमात अमृता फडणवीसांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दाखवण्यात आला. फोटो पाहताच अमृता यांनी देवेंद्र फडणवीसांना विचारलेल्या प्रश्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. ‘बस बाई बस’ या कार्यक्रमातील हा व्हिडीओ झी मराठीने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. देवेंद्र फडणवीसांचा फोटो पाहताच अमृता फडणवीस यांनी “काय मग आज वेळ मिळाला वाटतं?”,असा प्रश्न विचारला. पुढे त्या म्हणाल्या, “कुठे आसामला नेणार का?”. त्यांनी असं विचारल्यावर कार्यक्रमात एकच हशा पिकला. अमृता फडणवीसांनी विचारलेल्या या प्रश्नाची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे. त्यांनी विचारलेल्या या प्रश्नाचा राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडींशी संबंध जोडला जात आहे.

या कार्यक्रमात अमृता फडणवीसांना “देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना माननीय मुख्यमंत्री असे म्हणायचे. पण, तुम्हाला मात्र लोक मामी म्हणतात. तर हे ऐकून तुम्हाला कसं वाटतं?”, असाही प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी गमतीने “लोक मला मामी म्हणतात हे ऐकून फारच मजा येते”, असं उत्तर दिलं.

‘बस बाई बस’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या महिला सहभागी होतात. खासदार सुप्रिया सुळेंनीही या कार्यक्रमात हजेरी लावली होती. आता कार्यक्रमात अमृता फडणवीस सहभागी होणार आहेत. हा भाग पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत.

Story img Loader