राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं काही दिवसांपूर्वीच ‘मूड बना लिया’ गाणं प्रदर्शित झालं. या गाण्याला लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळाले. आता या गाण्याच्या यशानंतर त्यांचं आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. प्रजासत्ताक दिनानिमित्त अमृता फडणवीस यांनी त्यांचं नवं गाणं प्रदर्शित केलं. पण या गाण्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली होती.
गाण्याला मिळाले लाखो व्ह्यूज
‘भारतीयन्स’ या चित्रपटातील ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्तां हमारा’ हे अमृता फडणवीस यांच्या आवाजातील गाणं प्रदर्शित झालं. अमृता फडणवीस यांनी खास पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली होती. तसेच गाण्याचा व्हिडीओही सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला. पण नेटकरी मात्र हे गाणं ऐकून त्यांच्यावर नाराज झाले.
नेटकऱ्यांनी अमृता यांच्या या गाण्याला नापसंती दर्शवली. हा मराठी माणसांवर अत्याचार आहे, भसाडा आवाज आणि अल्बम काढून कोणी सुंदर व स्टार होत नाही, तुम्ही गाणं गाऊ नका, हा तर देशाचा अपमान अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या. पण अमृता यांचं हे गाणं लाखो लोकांनी पाहिलं आहे.
टी-सीरीजच्या युट्यूब चॅनलवर अमृता फडणवीस यांचं गाणं प्रदर्शित करण्यात आलं. या गाण्याला पाच दिवसांमध्येच १२ मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्ह्यूजच्या माध्यमातून अमृता यांनी ट्रोलर्सला चांगलंच उत्तर दिलं आहे. आता त्यांचं आणखी कोणतं नवं गाणं प्रदर्शित होणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.