बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास पुढील आठवड्यात विवाहबंधनात अडकणार आहेत. निकचं गेल्याच आठवड्यात मुंबईत आगमन झालं. २८ नोव्हेंबरपासून रंगणाऱ्या या विवाहसोहळ्यासाठी प्रियांकाच्या मुंबईतील घराला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नववधुप्रमाणे सजलेल्या प्रियांकाच्या घरात आता पाहुण्यांचं आगमन व्हायला सुरू झालं आहे.

प्रियांका जरी जोधपुरमध्ये लग्न करणार असली तरी मेंहदी आणि लग्नाचे इतर विधी तिच्या जुहू येथील घरी पार पडणार आहेत असं म्हटलं जात आहे. प्रियांकानं अद्यापही या वृत्ताला दुजोरा दिला नाही. २ डिसेंबरला जोधपुरमधल्या उमेद भवन या आलिशान ठिकाणी प्रियांका निकचा विवाहसोहळा रंगणार आहे. पारंपरिक भारतीय पद्धतीनं हा विवाहसोहळा होणार असून नंतर ख्रिश्चन पद्धतीनंही दोघांचं लग्न होणार आहे. निक ख्रिश्चन असल्यानं दुसऱ्या दिवशी ख्रिश्चन पद्धतीनं लग्न होणार आहे.

प्रियांका नुकतीच निकसोबत मुंबईत परतली आहे. ती ‘स्काय इज पिंक’ या तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यग्र होती. लग्नासाठी तिनं काही दिवसांची सुट्टी घेतली आहे. प्रियांकाच्या लग्नासाठी बॉलिवूड आणि हॉलिवूडमधले जवळपास २०० पाहुणे उपस्थित राहणार आहे. या सेलिब्रिटींना विवाहस्थळापासून लग्नाच्या ठिकाणी पोहण्याकरता खास हेलिपॅडची सोयही करण्यात आली आहे.