रहस्याची उकल करणाऱ्या गुप्तहेराच्या धाडसी, रम्य कथा इंग्रजीसह अनेक भाषांमध्ये लोकप्रिय झाल्या आहेत. त्यावरील टीव्ही मालिका आणि चित्रपटांनीही प्रेक्षकांना वेळोवेळी भुरळ घातली आहे. ब्योमकेश बक्षी हा बंगाली गुप्तहेर काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवरून प्रेक्षकांनी पाहिला आहे. ‘सत्यान्वेषी’ असे बिरुद अभिमानाने मिरवणाऱ्या ब्योमकेश बक्षीवरील ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’ हा चित्रपट सरळसाधा, थेटपणे रहस्याची उकल करणारा मात्र नाही. तर तो खास दिबाकर बॅनर्जी स्टाइलने रहस्य उलगडणारा चित्रपट आहे. ‘फिल्म न्वार’ प्रकारच्या चित्रपटांच्या पद्धतीने मध्यंतरानंतर हाताळणी करीत ब्योमकेश सत्य शोधून काढतो. परंतु त्यामुळेच सर्वसामान्यपणे सहज सोप्या पद्धतीने प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात चित्रपट अपयशी ठरला आहे.
गुन्हे थरारपट, रहस्यपटांची हिंदीच्या रूपेरी पडद्यावरील पद्धत दिग्दर्शकाने इथे वापरलेली नाही. याचे कारण असे असू शकते की ब्योमकेश बक्षी हा दूरदर्शनद्वारे खूप वर्षांपूर्वी लोकांसमोर येऊन गेला आहे आणि त्याचबरोबर बंगाली प्रेक्षकांसह काही प्रेक्षकवर्गाला आवडलेला गुप्तहेर असल्यामुळे त्याची चित्रपटांतून मांडणी करताना वेगळ्या पद्धतीने करायला हवी असे दिग्दर्शकाला वाटले असावे.
ब्योमकेश बक्षी हा अजित बॅनर्जी नामक त्याच्याच वयाच्या तरुणाच्या वडिलांचा शोध चित्रपटात घेतो. अजितचे वडील अचानक गायब होतात आणि दोन महिने उलटून गेले तरी पोलीस त्यांचा शोध घेऊ शकत नाहीत. म्हणून अजित ब्योमकेशकडे येतो. अजितचे वडील हे रसायनशास्त्रज्ञ आहेत की आणखी कोण आहेत, ते घरी का परतले नसावेत, याची उत्तरे शोधता शोधता त्यांची हत्या झाल्याचा निष्कर्ष ब्योमकेश काढतो आणि हा निष्कर्ष खरा असल्याचे सिद्ध करतो. पुन्हा त्यांची हत्या का झाली याचा थांग लागेपर्यंत नवनवीन रहस्य निर्माण होत जाते आणि त्याची उकल ब्योमकेश करत जातो. मात्र ही रहस्यांची उकल, हत्या करणाऱ्या गुन्हेगाराचा शोध घेतानाची दिग्दर्शकाने केलेली मांडणी ही खूपच गुंतागुंतीची आहे. संपूर्ण कथानक १९४२ सालातील कलकत्ता येथे घडणारे आहे. तो काळ, जुने कलकत्ता शहर, पडक्या इमारती, वस्त्या, घरे, ट्राम हे सगळे हुबेहूब उभे करण्यासाठी दिग्दर्शक आणि कला दिग्दर्शकाला दाद द्यावी लागेल. परंतु, जपान-बर्मामधून आलेले लोक, त्याचे संदर्भ आणि मुख्य कथानकातील पात्रांची संगती लावण्यात प्रेक्षकाला बरीच शक्ती खर्च करावी लागते. त्यामुळे मध्यंतरापर्यंत सरळसोटपणे रहस्य मांडून त्याची उकल करणारा ब्योमकेश प्रेक्षकाला समजतो. परंतु मध्यंतरानंतर गुंतागुंतीच्या कथानकाचे संदर्भ आणि पात्रांची संगती लावताना प्रेक्षक न गोंधळला तरच नवल.
ब्योमकेश बक्षीची प्रमुख भूमिका दिग्दर्शकाबरहुकूम करण्याचा प्रयत्न करताना सुशांत सिंग राजपूतने त्यात स्वत: कोणताही विचार केलेला नाही. त्याने फक्त दिग्दर्शक सांगेल तेवढेच प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे दूरदर्शनवर पाहिलेल्या ब्योमकेश बक्षीपेक्षा अधिक उंची सुशांत सिंग राजपूत अभिनयात गाठू शकलेला नाही. अजित बॅनर्जीच्या भूमिकेतील आनंद तिवारीचा अभिनय अधिक सरस झाला आहे. नीरज काबी यांनी साकारलेला अनुकूल गुहा अप्रतिम. या चित्रपटातील अनेक व्यक्तिरेखा संदर्भापुरत्या प्रेक्षकांसमोर येत असल्यामुळे त्यांची संगती लावणे आणि मूळ कथेशी त्यांचे नाते उलगडणे प्रेक्षकांसाठी कठीण होऊन बसते. त्यामुळे चित्रपट तर्कविसंगत ठरतो. मध्यंतरानंतर प्रेक्षकाला खिळवून ठेवण्यात अयशस्वी ठरतो.
डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी
निर्माते – आदित्य चोप्रा, दिबाकर बॅनर्जी
दिग्दर्शक – दिबाकर बॅनर्जी
लेखक – शरदिंदू बंडोपाध्याय, दिबाकर बॅनर्जी
पटकथा – दिबाकर बॅनर्जी, ऊर्मी जुवेकर
संगीत – स्नेहा खानवलकर
छायालेखन – निकोस अॅण्ड्रिटसाकिस
संकलन – मानस मित्तल, नम्रता राव
कलावंत – सुशांत सिंग राजपूत, आनंद तिवारी, दिव्या मेनन, नीरज काबी, मियांग चॅँग, अरिंदोल बागची, स्वस्तिका मुखर्जी, डॉ. कौशिक घोष व अन्य.