देव आनंद कोठेही असला तरी आपण देव आनंद आहोत याचा विसर पडू द्यायचा नाही. पडद्यावर तर झालेच, पण त्याला पाली हिलवरील आनंद रेकॉर्डिंग स्टुडिओतील प्रशस्त कार्यालयात भेटावे, त्याच्या नवीन चित्रपटाच्या मुहूर्ताला त्याच्या आवडत्या मेहबूब स्टुडिओत पहावे, त्याच्या चित्रपटाच्या प्रेस शोचा त्याचा वावर अनुभवावा, त्याच्या चित्रपटाची पार्टी असो…सगळीकडे देव आनंद त्याच्या दिसण्या-चालण्या-बोलण्याच्या ‘शैली’ने भरलेला असे. सदैव ‘तारुण्यात’ मी हा त्याचा बाणा. त्याचा पुत्र सुनीलमध्येही दिसावा ही अपेक्षा का? कारण, पित्याचा वारसा पुत्राकडे जाताना फारसा कधीच पुत्राचा स्वतंत्रपणे विचार केला जात नाही. ‘आनंद और आनंद’च्या मुहूर्तापासूनच सुनील आनंदमध्ये देव पाहिला जाऊ लागला आणि चित्रपट पडद्यावर येईपर्यन्त तो सापडलाच नाही… देव आनंद और देव आनंद असाच प्रकार घडला. देवच्या कोणत्याही स्टाईलमध्ये (वस्त्रांची निवड वगैरे) सुनीलने वावरावे तरी पंचाईत आणि न दिसावे तरी अडचण असा काहीसा प्रकार झाला. बहुधा खुद्द ‘देव’च्याही ते लक्षात आले म्हणून की काय देवने कथा आणि कॅमेऱ्याचा सगळा फोकस स्वत:वर राहिल हा हट्ट सोडला नाही. ‘प्रेम पुजारी’पासून दिग्दर्शन क्षेत्रात उतरतानाच त्याने ही सवय लावून घेतल्याचे जाणवले. स्वत:च्या प्रतिमा आणि लोकप्रियता यांच्या प्रेमात त्याने इतके का राहावे, असा खोचक प्रश्न करू नका. ‘देस परदेस’नंतरचे त्याच्या दिग्दर्शनातील सगळे चित्रपट पडले तरी त्याचे उत्तर सापडले नाही. ‘आनंद और आनंद’मध्ये नताशा सिन्हा सुनीलची नायिका होती. राज बब्बर आणि स्मिता पाटील यांच्याही भूमिका होत्या. सुनीलने कालांतराने ‘मास्टर’ नावाच्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. सगळाच ‘आनंद’ होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा