‘स्लमडॉग मिलिऑनेर’ या ब्रिटिश दिग्दर्शकाच्या आठ ऑस्कर पटकावणाऱ्या चित्रपटानंतर भारत दर्शनाला आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये महत्त्व वाढले. त्यानंतरच्या लाटेत भारतावरील परिणामकारक चित्रपटांत वेस अॅण्डरसन या दिग्दर्शकाचा ‘दार्जिलिंग लिमिटेड’, जॉन मॅडन यांचा विनोदी अंगाने जाणारा संस्कृतीदर्शक ‘द बेस्ट एक्झॉटिक मारीगोल्ड हॉटेल’ आणि माईक चाहिल यांच्या ‘आय ओरिजन्स’चा आवर्जून उल्लेख करावा लागेल. पैकी ‘आय ओरिजन्स’चा तुलनेत कमी भाग भारतात चित्रित झाला असला, तरी आपल्या चित्रपटाच्या कथानकाला इथल्या ‘आधार’ नोंदणीशी जोडण्याची किमया कौतुकास्पद आहे. प्रगतिशील राष्ट्र असले, तरी भारतात वसत असलेल्या तिसऱ्या जगाच्या वैशिष्टय़ाचे कुतूहल परदेशी चित्रकर्त्यांना अधिक असते. त्यामुळे इथल्याच पहिल्या जगात राहणाऱ्यांसाठीही झोपडपट्टीतील भीषण जगण्यापासून रस्त्यावरच्या खऱ्याखुऱ्या विदारक आयुष्यगाथा विक्रीमूल्य घेऊन आलेल्या असतात.
सरू ब्रायरर्ली या ऑस्ट्रेलियात दत्तक गेलेल्या मुलाने तीन दशकांनंतर भारतात हरविलेल्या आपल्या घराचा शोध गुगलमॅप आधारे घेतला. येथील कुटुंबाच्या भेटीनंतर त्याने त्यावर लिहिलेल्या ‘ए लाँग वे होम’ या आत्मवृत्ताचा चित्रपटीय आविष्कार ‘लायन’ या नावाने यंदाच्या ऑस्कर स्पर्धेत सहा नामांकनासह दाखल झाला आहे. ऑस्ट्रेलियाई दिग्दर्शक गार्थ डेव्हिस यांनी सरूची कथा अत्यंत भावपूर्ण रूपात सादर केली असली, तरी एकाच वळणाने सरकणारा ‘स्लमडॉग. अंडरडॉग’ पुन्हा ऑस्करमध्ये २००९ इतकाच यशस्वी होईल का, हा प्रश्न आहे.
चित्रपटाला सुरुवात होते गुड्डू (अभिषेक भराटे) आणि सरू ( सनी पवार) या दोन लहानग्यांच्या धावत्या ट्रेनमधून कोळसाचोरीच्या धाडसाने. ही मुले मध्य प्रदेशमधील खाण परिसराजवळील गरीब वस्तीत राहात असल्याचे पुढील दृश्यांत कळते. भुरटय़ा कामांतून आपल्या एकटय़ा आईला घर चालविण्यात मदत करणारी ही मुले बालपण गमावून बसलेली आहेत. पैकी पाच वर्षांच्या सरूला आपणही गुड्डूसोबत लांबच्या कामासाठी उपयुक्त असल्याचे वाटते. हट्ट करून तो त्याच्यासोबत जातो. गुड्डूने सांगितलेल्या जागेऐवजी रेल्वे स्थानकात फलाटावर विसावलेल्या ट्रेनमध्ये त्याला चुकून झोप लागते. जाग येते तेव्हा त्याची ट्रेन घरापासून हजारो कि.मी लांब असलेल्या कोलकाता शहरात त्याला नेण्यास सज्ज झालेली असते. ‘गणेशतले’ या घराजवळच्या परिसराच्या नावाखेरीज कोणत्याही प्रकारची माहिती नसलेल्या सरूची या शहरात फरफट होते. रस्त्यावरच्या मुलांचे युद्धस्वरूप जगणे आणि मुलांची तस्करी करणाऱ्या भामटय़ांच्या जगापासून स्वत:ला वाचवत सरू बालसुधारगृहाच्या अजस्र यंत्रणेत दाखल होतो. तेथून ऑस्ट्रेलियाच्या दाम्पत्याकडून दत्तक घेतला जातो.
चित्रपटाचा जवळजवळ चाळीस मिनिटांचा हा संपूर्ण हिंदीमध्ये चालणारा भाग सरूच्या आयुष्यातील वेदनादायक टप्प्याचा आढावा घेतो. सनी पवार या कलाकाराने हा लहानगा सरू जिवंत केला आहे. भारतासाठी या भागातील साऱ्या नावीन्यपूर्ण नसलेल्या गरिबीदर्शनाच्या घटकांमध्ये या अभिनयालाच सर्वाधिक महत्त्व आहे.
दिप्ती नवल, तनिष्ठा चटर्जी आणि नवाजुद्दीन सिद्दिकी आदी इथल्या कलाकारांनीही त्यांच्या वाटय़ाला आलेल्या लहान भूमिकांना न्याय दिला आहे.
पुढे चित्रपटाची कथा दाखल होते ऑस्ट्रेलियात. तेथे पंचवीस वर्षांनंतर पूर्णपणे त्या देशाचा झालेला आणि क्रिकेटसाठीही ऑस्ट्रेलियाचा खंदा पुरस्कर्ता बनलेला मोठेपणीचा सरू (देव पटेल) आपल्या आयुष्यातील दूरगामी बदलाला पूर्णपणे विसरलेला नसतो. भारतातील अज्ञात शहराच्या स्टेशनवर आपली वाट पाहणारा भाऊ, हरविल्यामुळे आई,बहीण यांची होऊ शकणारी अवस्था यांच्या काळजीचे ओझे घेऊन त्याचे जगणे सुरू असते. त्यामुळे आयुष्यातील प्रत्येक गोष्टींतल्या आनंदाशी काहीअंशी पारखा झालेला सरू मेलबोर्नमधील मित्र-मैत्रिणींच्या सांगण्यावरून गुगलमॅपचा आधार घेतो.
टीव्ही मालिका आणि चित्रपटांमधून भारतीय प्रेक्षकांइतका मेलोड्रामा कुणी रिचवत नसेल. त्यामुळे इथला बेतीव भासणारा मेलोड्रामा हा कथासुसंगत असला, तरी अंमळ अधिक भारतीय चित्रपटांशी साधम्र्य साधणारा आहे. तो वाईट की, चांगला हा मुद्दा सापेक्ष आहे.
सरूच्या आठवणी, गावातील घराजवळ नेणारे अरुंद रस्ते, शहर, रेल्वे फलाट, भावूक डायलॉग्ज यांच्या दृश्यतुकडय़ांचा समर्पक वापर करीत चित्रपटाची गोष्ट गंतव्य स्थानापर्यंत पुढे सरकत जाते. प्रेयसीच्या भूमिकेतील रूनी मारा, ऑस्ट्रेलियाई आई-वडिलांच्या भूमिकेतील निकोल किडमन-डेव्हिड वेनहेम आपापल्या भूमिकांचे ‘कर्म’ अर्पण करताना दिसतात. ऑस्करमध्ये आणि त्याआधी जगभरात ‘स्लमडॉग मिलिऑनेर’ प्रचंड प्रमाणात लोकप्रिय का झाला, याचे तेव्हाही अनेक भारतीयांना आश्चर्य वाटले होते. ‘लायन’ ऑस्करमध्ये यंदा का आहे, याचे तो पाहिल्यानंतर आश्चर्य वाटू शकेल. वर चित्रपटातूंन आपल्याला भावणाऱ्या गोष्टींपैकी ‘लायन’मध्ये नक्की काय हरवलंय, याचाही वेगळाच शोध सुरू होईल.