Devendra Fadnavis in Sangeet Manapman Movie Trailer Release : शतकापूर्वी रंगभूमीवर आलेले आणि रसिकमनांत विराजमान झालेले ‘संगीत मानापमान’ हे कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे नाटक आणि त्यातील गाजलेली नाट्यपदं आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. याच अभिजात नाटकावरून प्रेरित असलेल्या ‘संगीत मानापमान’ या चित्रपटातही १८ प्रतिभावंत गायकांनी गायलेल्या १४ गाण्यांचा आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे. या चित्रपटाचा आज ट्रेलर लॉन्च करण्यात आला. यावेळी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यांना गायक शंकर महादेवन यांनी गाण्याची विनंती केली. मात्र त्यांनी शब्दांची कोटी करत गाण्यास नकार दिला.

प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गाण्याची विनंती केली. यावेळी अभिनेता सुबोध भावे यांनी त्यांच्या हातात माईकही दिला. मात्र, माईक हातात घेतल्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी पहिल्यांदा स्पष्ट करू इच्छितो की मी शब्दांत शूर आहे, पण सुरात असूर आहे. लोकांचा गैरसमज होतो. पण माझी बायको गाते, मला गाता येत नाही.” देवेंद्र फडणवीसांनी मिश्किल भाष्य केल्यावर सुबोध भावे यांनी त्यांना फक्त गणपती बाप्पा मोरया बोलण्याची विनंती केली.

हेही वाचा >> १८ गायकगायिकांच्या १४ गाण्यांनी सजलेला ‘संगीत मानापमान’

दिग्गज संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांनी या चित्रपटासाठी एकूण १४ गाणी संगीतबद्ध केली आहेत. तर स्वत: शंकर महादेवन यांच्यासह सोनू निगम, राहुल देशपांडे, महेश काळे, अवधूत गुप्ते, बेला शेंडे, प्रियांका बर्वे, आर्या आंबेकर, प्रतिभा सिंग बघेल, जसराज जोशी, आनंद भाटे, शौनक अभिषेकी, सावनी रवींद्र, हृषीकेश बडवे, अस्मिता चिंचाळकर, कृष्णा बोंगाणे, शिवम महादेवन आणि श्रीनिधी घटाटे अशा १८ गायक-गायिकांनी ही गाणी गायली आहेत. अभिमानाची गोष्ट म्हणजे यातले सात गायक हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक आहेत.

जिओ स्टुडिओजच्या निमित्ताने ‘संगीत मानापमान’ चित्रपटाला मोठं व्यासपीठ मिळालं असून ‘सारेगामा’सारख्या मोठ्या संगीत कंपनीच्या माध्यमातून ही गाणी अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे’, असेही महादेवन यांनी सांगितलं. ‘संगीत मानापमान’चे दिग्दर्शन आणि त्यातली धैर्यधराची मुख्य भूमिका अशा दोन्ही धुरा अभिनेता सुबोध भावे यांनी सांभाळल्या आहेत. सुबोधसह या चित्रपटात सुमित राघवन, वैदेही परशुरामी, उपेंद्र लिमये, नीना कुलकर्णी, निवेदिता सराफ, शैलेश दातार, अर्चना निपाणकर आदी कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. पटकथा आणि कथाविस्तार शिरीष गोपाळ देशपांडे आणि ऊर्जा देशपांडे यांचे आहेत, तर अतिरिक्त पटकथा आणि संवाद पटकथा लेखन प्राजक्त देशमुख यांनी केले आहे. संगीतमय नजराणा असलेला ‘संगीत मानापमान’ हा चित्रपट १० जानेवारी २०२५ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader