उषा देशपांडे, दिग्दर्शिका
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
काही वर्षांपूर्वी मनालीला जाण्याचा योग आला होता. आणि चित्रपट क्षेत्रातील असल्यामुळे मला देविका राणींबद्दल माहिती होती. त्यामुळे त्या कुठे राहतात याचा शोध घेत मी रशियन चित्रकाराच्या बंगल्याजवळ पोहोचले. तिथे गेल्यावर समजलं की येथील लोकांना चित्रकार माहिती आहे, परंतु देविका राणी माहिती नाहीत; त्याक्षणीच मी देविका राणी यांच्या जीवनावर आधारित लघुपट दिग्दर्शित करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी फिल्म्स डिव्हिजनच्या साथीने आणि इतर सूत्रांच्या मदतीने माहिती गोळा केली. ‘देविका एक खोज’ हा लघुपट सध्या विविध फिल्म फेस्टिवलमधून दाखवण्यात येणार आहे.
मनोरंजनसृष्टीत सध्याच्या काळात अभिनेत्री म्हणून आपली कारकिर्द घडवणे तसे कठीण राहिलेले नाही. परंतु स्वातंत्र्यपूर्व काळात जिथे स्त्रिया चूल आणि मूल या पारंपरिक रुढी परंपरांमध्ये अडकलेल्या होत्या, त्या काळात अभिनेत्री देविका राणी यांनी खऱ्या अर्थाने मोठे पाऊल उचलले होते. १९०८ साली जन्मलेल्या देविका राणी यांनी पुरुषांच्या बरोबरीने चित्रपटसृष्टीत अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. पहिल्याच चित्रपटात दीर्घ चुंबन दृश्य चित्रित करणाऱ्या अभिनेत्री देविका राणी या भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या आधुनिक नायिका ठरल्या.
देविका राणी मोठय़ा पडद्यावर झळकल्या त्या काळात सुसंस्कृत घराण्यातील स्त्रिया अथवा मुलींनी चित्रपटात अभिनय करणे अप्रतिष्ठेचे मानले जात होते. मात्र, या बुरसटलेल्या विचार आणि चालीरितींना झुगारून देविका राणी यांनी अभिनय क्षेत्रात यशस्वीरित्या प्रवेश केला होता. भारतीय चित्रपटसृष्टीतील नायिकेचा पहिला चेहरा असलेल्या देविका राणी यांचा जीवनप्रवास ‘देविका.. एक खोज’ या माहितीपटातून उलगडण्याचा प्रयत्न दिग्दर्शिका, निर्मात्या उषा देशपांडे यांनी केला आहे. फिल्म्स डिव्हिजनच्या सहयोगाने प्रदर्शित करण्यात आलेल्या या माहितीपटाबरोबर १९३३ साली अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेल्या देविका राणींचा पहिला चित्रपट ‘कर्मा’ देखील नुकताच प्रेक्षकांना दाखवण्यात आला. भारतीय चित्रपटसृष्टीला विस्मरण झालेल्या या पहिल्या आधुनिक नायिकेची पुन्हा आठवण करून देण्यासाठी हा खास क्षण साधल्याचे उषा देशपांडे यांनी सांगितले.
भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिली आधुनिक नायिका अशी ओळख निर्माण करणाऱ्या देविका राणी मूळच्या विशाखापट्टणम इथल्या होत्या. रवींद्रनाथ टागोरांशी त्यांचे कौटुंबिक संबंध देखील होते. देविका राणी वयाच्या नवव्या वर्षी शिक्षणासाठी लंडनला गेल्या. तेथे स्थापत्यशास्त्राचे तंत्रशुद्ध शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा चित्रपटांकडे वळवला होता. कृष्णधवल चित्रपटांच्या काळात चुंबन दृश्य किंवा बोल्ड दृश्ये पाहायला मिळत नव्हती, परंतु या काळात देविका राणी यांनी अभिनेता, निर्माता हिमांशु रॉय यांच्यासोबत पहिल्याच चित्रपटात दीर्घ चुंबनदृश्य देत प्रेक्षकांनाही आश्चर्यचकित केले. १९३३ साली प्रदर्शित झालेला ‘कर्मा’ हा चित्रपट हिंदी आणि इंग्रजी या अशा दोन भाषेत प्रदर्शित झाला होता; तर भारतीय चित्रपटसृष्टीतील हा पहिला इंग्रजी चित्रपट ठरला होता.
देविका राणी या केवळ एक उत्तम अभिनेत्री नव्हत्या तर त्यांना वेशभूषा, दिग्दर्शन व चित्रपटासंदर्भातील अनेक तांत्रिक गोष्टींचेही ज्ञान होते. परदेशात शिक्षण घेत असताना त्यांनी विदेशी दिग्दर्शक, निर्माते यांच्याबरोबर चित्रपटांसाठी पडद्यामागे काम केले होते. एकीकडे त्यांचा हा प्रवास सुरु असताना १९२८ साली त्यांची ओळख निर्माते, दिग्दर्शक हिमांशू रॉय यांच्याशी झाली. काही काळानंतर हिमांशु रॉय यांनी ‘कर्मा’ हा भारतीय चित्रपटसृष्टीतील हिंदी आणि इंग्रजी भाषेतील चित्रपट दिग्दर्शित केला. यानंतर देविका राणी यांनी मागे वळून पाहिले नाही. देविका राणी आणि हिमांशू राय यांनी १९३४ मध्ये ‘बॉम्बे टॉकीज’ या भारतातील पहिल्या व्यावसायिक चित्रपट संस्थेची स्थापना केली. या संस्थेने आणि देविका राणी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला मधुबाला, अशोक कुमार, सुरैया, दिलीप कुमार, राज कपूर, पन्हालाल घोष, किशोर साहू, जयराज असे अनेक उत्तम कलाकार दिले. याशिवाय, लेखक, तंत्रज्ञ, दिग्दर्शक, कॅमेरामन अशा अनेक मान्यवरांनाही ओळख मिळवून देण्याचे काम देखील देविका राणी यांनी केले. देविका राणी यांनी चित्रपटसृष्टीतील दहा वर्षांच्या कालखंडात ‘कर्मा’, ‘जवानी की हवा’, ‘अच्छुत कन्या’, ‘जन्मभूमी’, ‘जीवन नैया’, ‘इज्जत’, ‘जीवन प्रभात’, ‘निर्मला’, ‘वचन’, ‘दुर्गा’, ‘अनजान’, ‘हमारी बात’ या चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या. याव्यतिरिक्त त्यांनी ‘बसंत’, ‘ज्वार भाटा’ आणि ‘प्रतिमा’ या चित्रपटांची निर्मिती देखील केली होती. ज्येष्ठ अभिनेते अशोक कुमार यांच्यासोबत देविका राणींची जोडी प्रेक्षकांच्या अधिक पसंतीस उतरली होती.
२१ व्या शतकात स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने आपली यशस्वी कारकिर्द घडवताना दिसतात, परंतु स्वातंत्र्यपूर्व काळात चालीरितींना झुगारुन अभिनय क्षेत्रात येत इतर अनेक स्त्रियांना हे क्षेत्र खुले करुन देण्याचे काम खऱ्या अर्थाने देविका राणी यांनी केले. चित्रपटसृष्टीतील त्यांची कारकिर्द जरी यशस्वी दिसत असली तरी कौटुंबिक आणि मनोरंजनसृष्टीत त्यांना अनेक यश-अपयशांचा सामना करावा लागला होता. ज्या कलाकारांना देविका राणी यांनी नावलौकिक मिळवून दिला होता, त्याच कलाकारांनी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचे सांगितले जाते. मात्र, असे असूनही अभिनय क्षेत्रातील अभुतपूर्व कामगिरीसाठी कालांतराने देविका राणी यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. १९६९ साली दादासाहेब फाळके पुरस्काराच्या देविका राणी पहिल्या मानकरी ठरल्या होत्या. त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आले होते. १९३० ते ५० च्या दशकांत भारतीय चित्रपटसृष्टीची ओळख जगभरात प्रसिद्ध करणाऱ्या देविका राणी आणि हिमांशू रॉय यांचे वैवाहिक जीवन संपुष्टात आले. कालांतराने देविका यांनी ‘बॉम्बे टॉकीज’ या संस्थेला देखील रामराम ठोकला आणि रशियन चित्रकार सोव्हित्सलाव्ह रोरिचसोबत नवा संसार थाटला. भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया उभारणाऱ्या आणि या चित्रपटसृष्टीला जगभरात ओळख मिळवून देण्यात मोलाचा वाटा असणाऱ्या देविका राणी यांचे विस्मरण कुठेतरी या चित्रपटसृष्टीला झाले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. देविका राणी यांनी अनेक मानसिक वेदना भोगल्यानंतर शेवटी हिमाचल प्रदेशात शेवटचे वास्तव्य केले. वृद्धापकाळात त्यांना विस्मरणासह अनेक आजारांनाही सामोरे जावे लागले होते. अखेर त्यांची ही झुंज ९ मार्च १९९४ रोजी संपली. आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या आधुनिक नायिकेचे यशस्वी पर्व चित्रपटसृष्टीच्या इतिहासात लुप्त झाले.