‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांच्या यादीमध्ये ‘देवमाणूस’ मालिकेचा देखील समावेश आहे. या मालिकेच्या पहिल्या भागाने प्रेक्षकांना वेड लावलं. या मालिकेला प्रेक्षकांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहता याचा दुसरा भाग प्रदर्शित करण्यात आला. ‘देवमाणूस २’ने देखील प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. देवमाणूस या मालिकेमुळे अभिनेता किरण गायकवाडला घराघरात प्रसिद्धी मिळाली. मात्र आता ‘देवमाणूस २’या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेची निर्माती-अभिनेत्री श्वेता शिंदे हिने याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्वेता शिंदे ही नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असते. तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने चला हवा येऊ द्या या मालिकेच्या सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत. त्यात देवमाणूस २ या मालिकेची संपूर्ण टीम पाहायला मिळत आहे. याला तिने भावूक कॅप्शन दिले आहे.

श्वेता शिंदेची इन्स्टाग्राम पोस्ट

“नेहमी एखाद्या मालिकेचं, नाटकाचं, चित्रपटाचं प्रमोशन करण्यात येणाऱ्या सर्वांच्या लाडक्या ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये आज पहील्यांदाच एका मालिकेचा निरोप समारंभ साजरा केला जाणार आहे. एका निर्मातीला आणि काय हवं?

इतकं प्रेम, इतका लळा… ‘देवमाणूस ll’ ह्या मालिकेद्वारे आम्हाला आज तुमचा निरोप घेताना ऊर भरून आलाय… आयुष्याच्या प्रत्येक वळणावर एक असा टर्निंग पॉइंट येतो जो आपल्याला खूप काही देऊन जातो… झी मराठी वाहिनीवरील ‘देवमाणूस’ आणि ‘देवमाणूस ll’ ह्या मालिका म्हणजे माझ्या आणि वज्र प्रोडक्शन्सच्या कारकिर्दीतील खरा टर्निंग पॉइंट ठरल्या. १०:३० च्या स्लॉटला स्वतःच वेगळं अस्तित्व निर्माण करत…कधी प्रेक्षकांचा रोष तर कधी प्रेक्षकांचे भरभरून प्रेम आम्ही अनुभवले.

झी मराठी वाहिनीचा भक्कम आधार, मालिकेतील सर्वच गुणी कलाकारांचे आणि तांत्रिक विभागाचे सहाय्य आणि मायबाप प्रेक्षकांच्या आशीर्वादानेच आम्ही हा इतका मोठा पल्ला पार करू शकलो. यापुढे देखील वज्र प्रॉडक्शन्स सध्या झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘अप्पी आमची कलेक्टर’ आणि यांसारख्या अनेक एकापेक्षा एक सरस कलाकृती घेउन येईल आणि तुमचे मनोरंजन करत राहील याची मी खात्री देते.

निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी, चुकले आमचे काही, त्याची क्षमा असावी!” असे श्वेता शिंदेने ही पोस्ट करताना म्हटले आहे.

दरम्यान देवमाणूस २ ही मालिका बंद झाल्यानंतर आता ‘देवमाणूस ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची नवी चर्चा सुरु झाली आहे. वाढलेले केस, दाढी आणि जेलमधील कपडे अशा विचित्र अवतारामध्ये तो वाड्यात प्रवेश करताना दिसत आहे. त्याच्या या एण्ट्रीमुळे ‘देवमाणूस ३’ मालिका लवकरच प्रदर्शित होणार असल्याचं बोललं जात आहे. डिंपलची मुलगी – देवमाणूस पार्ट ३, देवमाणूस ३ लवकरच येणार, या मालिकेच्या पुढील भागासाठी आम्ही वाट पाहत आहोत अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devmanus 2 marathi serial producer shweta shinde share emotional instagram post nrp