अत्यंत पापभीरू, नाकासमोर सरळ चालणाऱ्या व्यक्तीच्या हातून अचानक एखादा गुन्हा घडला तर काय कल्लोळ होईल? त्याच्या स्वत:च्या मनात उठणारं भावनिक वादळ आणि त्याच्या जिवलगांचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा भाग जितका रंजक तितकंच सत्य लपवणं आणि शोधून काढण्याच्या पाठशिवणीच्या खेळातील नाट्यही उत्कंठा वाढवत जातं. या दोन्हींचा संगम साधत उभा केलेला रंजक भावकल्लोळ ‘देवमाणूस’ या तेजस प्रभास विजय देउस्कर दिग्दर्शित चित्रपटातून पाहायला मिळतो.
‘देवमाणूस’ हा चित्रपट २०२२ साली प्रदर्शित झालेल्या ‘वध’ या हिंदी चित्रपटावर आधारित आहे. ‘वध’ची निर्मिती करणाऱ्या लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी मराठीत ‘देवमाणूस’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यामुळे निर्मितीमूल्यात हा चित्रपट कुठेही कमी पडलेला नाही हे पडद्यावर जाणवतं. या चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पटकथा आणि संवाद लेखन हे अभिनेत्री नेहा शितोळे हिने केलं आहे. आजवर ‘बिग बॉस मराठी’ची स्पर्धक आणि मालिकांमधील छोट्या-मोठ्या भूमिकांमधून परिचयाच्या असलेल्या नेहाने ‘देवमाणूस’चे संवाद लिहिले आहेत.
मुळात, चित्रपटाची कथा ही काहीशी व्यावसायिक मसाला चित्रपटांना साजेशी अशी असल्याने चुरचुरीत संवाद वगैरेंची फोडणी हे साहजिकपणे आलंच… मात्र, नेहाने केलेलं संवादलेखन हे त्या तुलनेत साधंसोपं आणि घराघरांत घडणारं वाटू शकेल, अशा पद्धतीचं आहे. कथेत पुरेपूर नाट्य भरलेलं असलं तरी त्यात विनाकारण नाट्यमयता वाढवण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केलेला नाही. आदर्श तत्त्वं घेऊन जगणाऱ्या एका सामान्य शिक्षकाची आणि त्याच्या पत्नीची मुलाकडून होणारी फसवणूक, विनाकारण दंडेलशाही सहन करण्याचा वाट्याला आलेला मनस्ताप आणि हे सगळं कधी संपणार अशा पद्धतीची असहाय्यता या नाट्याचा दिग्दर्शकाने सुरेख वापर करत ‘देवमाणूस’ची कथा रंगवली आहे.
केशव आणि लक्ष्मी हे उतारवयातील जोडपं. मुलाचं परदेशात शिकण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी इच्छा नसतानाही बायकोच्या आग्रहावरून केशवने घर गहाण ठेवून कर्ज काढलं आहे. डॉलरमध्ये कमवायला लागलो की असं फेडीन कर्ज हे मुलानं आईवडिलांना दिलेलं आश्वासन त्याच्याबरोबर परदेशात विरून जातं. रोजच्या फोनलाही महागलेल्या मुलाच्या वर्तनाने केशवमधला बाप अत्यंत दुखावला आहे. लक्ष्मी मात्र आईच्या मायेला आवर घालू शकत नाही. या दोघांच्या आयुष्याला कर्जामुळेच दिलीप शेठ नावाच्या गावगुंडांचं ग्रहण लागलं आहे. केशव आणि लक्ष्मी या सगळ्या असह्य कोंडीतून संयमाने मार्ग काढत असतानाच एका विचित्र पद्धतीने ही कोंडी सुटते. आयुष्यात कधीही वाईट वर्तन न केलेला, साधा वारकरी असलेल्या केशवच्या मनात त्याच्या हातून घडलेलं कृत्य सलत राहतं. नको त्या क्षणी, हातून नको ते घडून गेलेल्या या देवमाणसाची नियतीच्या फेऱ्यातून सुटका होते का? याची रंजक पद्धतीने मांडलेली गोष्ट चित्रपटात पाहायला मिळते.
कसलेल्या कलाकारांचा अभिनय, आटोपशीर मांडणी, सुंदर छायांकन आणि गुंतवून ठेवणारी दिग्दर्शकीय मांडणी यामुळे ‘देवमाणूस’ चित्रपट पाहणाऱ्याला शेवटपर्यंत खुर्चीत खिळवून ठेवतो. अत्यंत सज्जन, मनाने मोकळ्या अशा केशवभाऊंची भूमिका अभिनेता महेश मांजरेकर यांच्याशिवाय अन्य कोणी करूच शकणार नाही, इतक्या सहजसुंदर पद्धतीने त्यांनी केली आहे. त्यांना पत्नीच्या भूमिकेत अभिनेत्री रेणुका शहाणे यांची साथ मिळाली असल्याने त्यात नावीन्यही आलं आहे आणि या दोघांमधील अभिनयाची देवाणघेवाण ही प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरली आहे.
हिंदीतही निवडक भूमिकांमधून छाप उमटवणाऱ्या अभिनेता सिद्धार्थ बोडकेने कमालीच्या ताकदीने दिलीप शेठ साकारला आहे. सुबोध भावे आणि अभिजीत खांडकेकर यांना त्यांच्या नेहमीच्या प्रतिमांपेक्षा थोड्या वेगळ्या भूमिकेत पाहण्याची संधी चित्रपटाने दिली आहे. तर्काच्या पातळीवर कथा पूर्णपणे पटणारी वा वास्तवाला धरून नाही, मात्र वर म्हटल्याप्रमाणे खरोखरच एखाद्या सज्जन आणि पापभीरू माणसाच्या आयुष्यात असं काही घडलं तर काय होईल हा कल्पनाविलास वास्तवतेचं भान राखत मांडण्याचा उत्तम प्रयत्न दिग्दर्शकाने केला असल्याने भावकल्लोळाचा हा अंक उत्कंठावर्धक ठरला आहे.
देवमाणूस
दिग्दर्शक – तेजस प्रभा विजय देउस्कर
कलाकार – महेश मांजरेकर, रेणूका शहाणे, सुबोध भावे, सिद्धार्थ बोडके आणि अभिजीत खांडकेकर.