भक्तिसंगीत, सुगम संगीत आणि चित्रपट संगीत अशा प्रत्येक संगीत प्रकारात सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांनी अलौकिक कार्य केले आहे. ग.दि.माडगूळकर रचित आणि बाबूजींद्वारे संगीतबद्ध केलेल्या ‘गीतरामायण’ या अद्भुत निर्मितीस ६९ वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘गीतरामायण’ या काव्याप्रमाणेच बाबूजींनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली गाणी आजची तरुण पिढीही तितक्याच आवडीने गुणगुणते. संगीत क्षेत्रात सुधीर फडके यांचा एक उमदा तरुण संगीतकार ते प्रतिभावंत गायक – संगीतकार हा प्रवास सोपा नव्हता. पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या गायकीने आणि संगीताने प्रेक्षकांना भुरळ घातली. बाबूजींच्या १०५ व्या जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांची संगीत क्षेत्रातील आमूलाग्र कामगिरी प्रेक्षकांसमोर मांडणारा ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा चित्रपट येत्या १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. योगेश देशपांडे दिग्दर्शित या चित्रपटात सुधीर फडके यांच्या भूमिकेत अभिनेता सुनील बर्वे, तर त्यांच्या पत्नी ललिताबाई फडके यांच्या भूमिकेत अभिनेत्री मृण्मयी देशपांडे पाहायला मिळणार आहेत. तर, सागर तळाशीकर, मिलिंद फाटक, आदिश वैद्य, सुखदा खांडकेकर, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर, शरद पोंक्षे, उदय सबनीस, चिन्मय पटवर्धन, निखिल राऊत, विभावरी देशपांडे, धीरेश जोशी, परितोष प्रधान या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. यानिमित्ताने, दिग्दर्शक योगेश देशपांडे आणि सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, सागर तळाशीकर, अपूर्वा मोडक या कलाकारांनी बाबूजी आणि या चित्रपटाबद्दल ‘लोकसत्ता’शी दिलखुलास गप्पा मारल्या.
सुनील बर्वे यांची बाबूजींची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी निवड कशी करण्यात आली? याबद्दल बोलताना दिग्दर्शक योगेश देशपांडे म्हणाले, ‘एखाद्या मोठय़ा व्यक्तीच्या आयुष्यावर चित्रपट साकारायचा असेल तर त्यासाठी त्या व्यक्तीचा सखोल अभ्यास करावा लागतो. कारण चरित्रपट करताना त्या व्यक्तीच्या आयुष्यातील प्रमुख घटना आणि चढउतार दाखवणे जसे गरजेचे असते. तसेच काही प्रसंग दाखवावे की नाही याचा देखील एक लेखक – दिग्दर्शक म्हणून विचार करावा लागतो. गेल्या साडे चार – पाच वर्षांपूर्वी बाबूजींचे आयुष्य रुपेरी पडद्यावर आणावे असा विचार माझ्या मनात आल्यापासून आपण त्यांच्याबद्दल असे काय सांगू शकतो की बाबूजी पुन्हा संपूर्ण महाराष्ट्राला वेगळय़ा पद्धतीने उमगतील, म्हणून त्यांच्या बालपणीपासूनचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच संगीत क्षेत्रात यश मिळण्याआधी आणि नंतर बाबूजींचा प्रवास कसा होता हे या चित्रपटात मांडण्यात आले आहे. अर्थात, अडीच तासात हा प्रवास मांडणे कठीण होते. पण, सखोल अभ्यास करून हा चित्रपट साकारण्यात आला आहे हे नक्की प्रेक्षकांना समजेल.’ या चित्रपटासाठी आपल्याला सुनील बर्वेसारखा अभिनेता अपेक्षित होता. कारण चित्रपटात लूक फार महत्त्वाचा आहे. सुनील बर्वे बाबूजींचे पात्र अचूक साकारू शकेल असे वाटल्याने तसेच त्याला संगीताची देखील समज असल्याने त्याची बाबूजींच्या व्यक्तिरेखेसाठी निवड करण्यात आली, असेही योगेश देशपांडे यांनी सांगितले.
हेही वाचा >>>कुशल बद्रिकेला बायकोनं लावलं कामाला, फोटो शेअर करत म्हणाला, “एका भांडणात….”
बाबूजींची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी काय वेगळी मेहनत घ्यावी लागली याबद्दल बोलताना त्यांची भूमिका साकारायला मिळणे हे एकीकडे भाग्याचे वाटत होते, त्याचवेळी थोडीशी भीतीही जाणवत होती, असे सुनील बर्वे यांनी सांगितले. बाबूजींचे महाराष्ट्रातच नाही तर देशभरात आणि जगभरात चाहते आहेत. म्हणून एक दडपण निश्चित होते. बाबूजी हे आजवर संगीतातून प्रेक्षकांना अधिक उलगडले आहेत. त्यामुळे त्यांच्या संगीत प्रवासाबरोबरच ते व्यक्तिगत आयुष्यात कसे होते हे दाखवण्याचा आम्ही या चित्रपटात प्रयत्न केला आहे आणि त्यानुसार मी मेहनत घेतली आहे, असे त्यांनी सांगितले. ‘मला गाणे कळते. मला गाणे सतत गुणगुणावेसे वाटते, त्यामुळे गातेवेळीचे हावभाव कसे असतात हे सगळे मला माहिती आहे. आणखी एक गोष्ट मला जाणवली ते म्हणजे बाबूजी गात असताना त्यांच्या डोळय़ातील भाव बोलके होतात. त्यांची भूमिका करताना नक्कल करण्यापेक्षा त्यांच्या डोळय़ात दिसणारे ते भाव आणण्याचा मी मनापासून प्रयत्न केला आहे, असे सुनील बर्वे यांनी सांगितले.
बाबूजींच्या आयुष्यात त्यांच्या पत्नीचा ललिताबाईंचा मोठा वाटा होता. त्या प्रसिद्धिपराङ्मुख होत्या, त्यांच्याविषयी फार कमी लोकांना माहिती असल्याने त्यांची भूमिका साकारताना त्यांचे चिरंजीव श्रीधर फडके यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केल्याचे मृण्मयी देशपांडे हिने सांगितले. ललिताबाई उत्तम गात, लग्नानंतर मात्र त्यांनी गाणं थांबवलं आणि आयुष्यभर त्या बाबूजींसोबत खंबीरपणे उभ्या होत्या, असे सांगतानाच बाबूजींच्या आवाजातील २७ गाणी चित्रपटात आहेत, त्यामुळे एक सुरेल अनुभव प्रेक्षकांना मिळणार असल्याचेही तिने स्पष्ट केले.
हेही वाचा >>>‘रामायण’ चित्रपटातील रणबीर कपूर व साई पल्लवीचा फोटो व्हायरल, पाहा दोघं कसे दिसतात प्रभू श्रीराम व सीतेच्या भूमिकेत
गदिमा हे खऱ्या अर्थाने मोठे नाव
चित्रपटात ग. दि. माडगूळकर यांची भूमिका अभिनेता सागर तळाशीकर यांनी केली आहे. ‘गदिमा हे खऱ्या अर्थाने फार मोठे नाव आहे. त्यांच्या कविता आपण शाळेत वाचल्या आहेत. त्यांची गाणी आपण सतत ऐकत असतो. ते स्वत: एक अभिनेते, निर्माते, पटकथाकार आणि चित्रकार होते आणि मुळात ते दहावी नापास होते. घरच्या परिस्थितीमुळे त्यांना गाव सोडावे लागले. त्यांनी स्वातंत्र्यसंग्रामात देखील भाग घेतला होता. पत्री सरकार गावोगावी जाऊन पोवाडे सादर करायचे. ते पोवाडे गदिमांनी लिहिले होते हे १९४७ पर्यंत कोणालाच माहिती नव्हते. दीडशे ते पावणे दोनशे पटकथा लिहिणाऱ्या, आमदारपद सांभाळलेल्या, चौकस बुद्धिमत्ता असलेल्या गदिमांची भूमिका करताना आपण त्यांच्यासारखे वाटतो का? ही भीती होतीच. पण त्यांचे व्यक्तित्व समजून घेऊन ते अभिनयातून उलगडण्याचा प्रयत्न मी केला आहे, असे सागर तळाशीकर यांनी सांगितले.
सावरकर चित्रपट.. मोठे आव्हान
बाबूजींवर सावरकरांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चरित्र चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायचे होते. त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. चित्रपट करण्यासाठी त्यांना साधारण आठ ते नऊ वर्षे लागली. अनेक लेखक बदलले, चित्रपटात काही बदल झाले पण बाबूजींनी नेटाने चित्रपट पूर्ण केला. चित्रपटाच्या निर्मितीसाठी आवश्यक खर्च त्यांनी गावोगावी जाऊन जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून गोळा केला. त्यावेळेचा काळ आणि सामाजिक परिस्थिती पाहता हा चित्रपट करणे आणि तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे हे फारच मोठे आव्हान होते. तुलनेने रणदीप हुडा यांचे काम अधिक सोपे झाले आहे, असे मत योगेश देशपांडे यांनी व्यक्त केले.
‘नव्या पिढीला दिग्गजांची ओळख आहे’
बाबूजींची गाणी नव्या पिढीला माहिती नाहीत, हे विधान चुकीचे असल्याचे योगेश देशपांडे यांनी सांगितले. ओटीटीचा प्रभाव असलेल्या आजच्या विशी-पंचविशीतील मुलांना सुधीर फडके, आशा भोसले, लता मंगेशकर यांच्यासारख्या दिग्गज गायक-संगीतकारांच्या गाण्यांची ओळख आहे. त्यांच्या घरी त्यांनी ही गाणी कधीतरी ऐकलेली आहेत. त्यामुळे त्यांना गाणी माहिती आहेत, त्या गाण्यांमागची गोष्ट, त्या गाण्यांशी जोडलेल्या व्यक्तीची गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे आहे, असे योगेश यांनी सांगितले. या चित्रपटाच्या सेटवर असलेल्या १४० जणांपैकी कित्येक तरुण-तरुणींना या गाण्यांची माहिती होती. त्यांच्या कर्त्यांविषयीची माहिती महाराष्ट्रात पोहोचायला हवी आणि त्यादृष्टीने चरित्रपटांची भूमिका महत्त्वाची आहे, असे योगेश देशपांडे यांनी सांगितले.