राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिवाजी लोटन पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘धग’ या चित्रपटाने एक दोन नव्हे, तर आजवर तब्बल ४७ पुरस्कारांवर नाव कोरले आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये अतिशय उत्सुकता होती. रसिक प्रेक्षक आतुरतेने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट बघत होते. आता प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली असून, शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. परंपरागत सामाजिक व्यवसायाचे जोखड दूर करण्याचा प्रयत्न करणा-या मुलाची ही कथा. मृत्यू ही अशी गोष्ट, जी कोणालाच आवडत नाही. पण, कोणाच्या तरी मृत्यूवर आपल्या पोटाची खळगी भरणा-या कुटुंबाबाबत तुम्ही काय म्हणाल? दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटीलने याच विषयावर धगची कथा केंद्रित केली. कृष्णासाठी असलेल्या त्याच्या आईच्या महत्त्वाकांक्षा आणि सामाजिक, आर्थिक अडचणींचा तिने केलेला संघर्ष यातील भावनिक क्षणांचा मागोवा घेण्याचे काम यात करण्यात आले आहे. कृष्णाच्या लहानपणापासून त्याच्या जडणघडणीचा प्रवास यामध्ये साकारला गेला आहे.


चित्रपटाची कथा ही मसनवाढीत राहणा-या एका गरीब कुटुंबाची आहे. श्रीपाद (उपेंद्र लिमये), त्याची पत्नी (उषा जाधव), आई (सुहासिनी देशपांडे), मुलगी (नेहा दखिनकर) आणि मुलगा कृष्णा (हंसराज जगताप) असे हे कुटुंब गावात मेलेल्या व्यक्तींच्या प्रेतदहनातून मिळणा-या पैशाने पोट भरतात. या कामातून आपले पोट जरी भरत असले, तरी यामुळे आपल्याला समाजात आदर मिळणार नाही, हे श्रीपादला माहिती असते. पण, परिस्थितीने झुकलेला श्रीपाद मृतदेह जाळून आपल्या कुटुंबाचे पोट भरतो. आपले वडील जे काम करत आहेत, ते काम आपण करणार नाही. त्यासाठी वाटेल ते करण्याची आग कृष्णाच्या डोळ्यात श्रीपादला दिसत असते. त्यामुळे पिढ्यानपिढ्या करत आलेल्या या कामास आपल्या मुलाने करू नये, यासाठी श्रीपाद कृष्णाला शाळेत शिकण्यासाठी पाठवत असतो. घरात पैशाची कमतरता असल्यामुळे मुलांचे पोट भरण्यासाठी आणि सासूच्या औषधासाठी पैशाची तडजोड कशी करावी? हा प्रश्न सारखा कृष्णाच्या आईसमोर उभा असतो. त्यानंतर अचानक झालेल्या श्रीपादच्या मृत्युमुळे कृष्णाच्या स्वप्नांचा आणि इच्छांचा डोंगर अश्रूंमध्ये बुडतो. मात्र तो हताश होत नाही. तो देहदहनाचे काम न करता ऊस सरबताच्या गाडीवर काम करण्यास सुरुवात करतो. परंतु, यात त्याचे शिक्षण मागे पडते. मदतीच्या नावाखाली आपल्या विधवा आईकडे वळलेल्या लोकांच्या वाईट नजरा कृष्णाला कळू लागतात. त्यामुळे मनात नसतानाही तो दहनाचे काम करण्यास सुरुवात करतो. पण, यावेळी तो त्याचे शिक्षणाकडे दुर्लक्ष न करता, दहनाचे काम आणि ऊसाच्या गाडीवरील काम करून आपल्या कुटुंबाला मसनवाढीतून बाहेर काढण्याचा निर्धार करतो.

PM Narendra Modi on Sabarmati Report movie
पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटावर मोठी प्रतिक्रिया; पोस्ट करत म्हणाले, “बनावट कथानक…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Sahitya Lifetime Achievement Award to dr Salunkhe and Social Work Award to Javadekar
डॉ. आ. ह. साळुंखे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर, महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे शरद जावडेकर यांना समाजकार्य विशेष पुरस्कार
Allu Arjun
‘पुष्पा’साठी राष्ट्रीय पुरस्कार घेताना अल्लू अर्जुन दु:खी का होता? स्वत: सांगितलं कारण
loksatta readers feedback
पडसाद : मनात डोकावून पाहायला लावणारे भाषण
Raosaheb Danave Beating Karyakarta
Raosaheb Danave Viral Video : फोटो फ्रेममध्ये येणाऱ्या कार्यकर्त्याला रावसाहेब दानवेंनी लाथाडलं; VIDEO व्हायरल!
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’


चित्रपटातील कलाकारांचा अभिनय दमदार झाला आहे. खास कौतुक करावसं वाटतं ते म्हणजे बालकलाकार हंसराज जगताप याचं. मुख्य कलाकारांचं जगणं, त्यांची सुख-दु:खं, त्यांचं हतबल होणं पडद्यावर दिसत राहतं. त्याच्या या वयातल्या अभिनयाच्या परिपक्वतेला खरोखरच दाद द्यायला हवी. त्याने आपल्या मनातल्या भावना व आपल्या जीवनाचं वास्तव, समाजाकडून होत असलेली अवहेलना या सा-या गोष्टींबरोबर या वयात असलेला एक विशिष्ट प्रकारचा राग व द्वेषही चित्रपटात जबरदस्त दाखवला आहे. चिमुकल्या नेहा दखिनकरने केलेले कामही खूप सुंदर आहे. उपेंद्र लिमयेसारख्या दमदार कलाकारबाबत बोलावे तितके कमीच आहे. पण, या चित्रपटात त्याला फार कमी अभिनयाची संधी दिल्यामुळे एका उत्कृष्ट कलाकाराच्या अभिनयाची कमतरता चित्रपटात जाणवते. दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटीलचे दिग्दर्शनही वाखाणण्याजोगे आहे. बरं, चित्रपट आहे म्हणून त्यात काही समस्या मांडली आहे, दिग्दर्शकाला काही संदेश वगैरे द्यायचाय, असं अजिबात अविर्भाव चित्रपटात नाही. उलट दिग्दर्शकाने त्याला जे सांगायचंय, जे मांडायचंय ते चित्रपटाच्या चौकटीत अगदी व्यवस्थित बसवलं आहे. अमुक ठिकाणी चित्रपट सुरू होणार, अमुक ठिकाणी मध्यांतर होणार आणि इच्छित स्थळी जाऊन चित्रपट संपणार हा पारंपरिक विचार इथे अजिबात नाही. चित्रपटाची एक भाषा असते वगैरे सगळं मान्य करुनही एक वेगळा विचार, एक साधा सरळ चित्रपट बनवता येऊ शकतो आणि साधं-सरळ असलं तरी त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट होऊ शकतो, हे शिवाजी पाटील यांनी दाखवून दिले आहे. तसं पाहायला गेलं तर या चित्रपटातील गावरान भाषा सर्वसामान्य प्रेक्षकांना लगेच समजेल, अशी नसली तरी तो एकदा पाहाण्याजोगा आहे. किमान चित्रपटातल्या एका प्रयत्नाकडे व्यक्तीगत मनोरंजनाच्या पुढे जाऊन पाहायला हवं. चित्रपटाच्या कलादिग्दर्शकाचे व इतर सर्वच तंत्रज्ञांचे आभार मानायला हवेत. साध्या वेशभूषा व रंगभूषेतही प्रचंड परिपक्वता दिसून येते. या चित्रपटाच्या दर्जात या सा-यांचा अगदी महत्त्वाचा वाटा ठरतो. चित्रपटाचे बजेट मोठे असणे गरजेचे नसते तर त्याचा विषय आणि त्याची मांडणी ही महत्वाची असते, हे या चित्रपटातून पाहावयास मिळते.  
कथा दिग्दर्शक: शिवाजी लोटन पाटील
पटकथा-संवाद: नितीन दीक्षित
छाया दिग्दर्शकः नागराज दिवाकर
निर्माता: विशाल पंडित गवारे
कलाकार: उपेंद्र लिमये, उषा जाधव, हंसराज जगताप, नागेश भोसले, नेहा दखिनकर, सुहासिनी देशपांडे
गीतः शिव कदम
पार्श्वसंगीतः सुनील कौशिक