सत् विरुद्ध असत्चा लढा, त्याला नायक-नायिकांच्या प्रेमाची फोडणी, प्रत्येक मोठय़ा प्रसंगाला अनुरूप गाणी, आयटम साँग, नायक-खलनायक यांची हाणामारी, शेवट गोड असा ठरीव फॉम्र्युला असला की उत्तम मसालापट बनतो. हिंदीतील हाच फॉम्र्युला मराठीमध्ये ‘धमक’ या चित्रपटाच्या निमित्ताने आला आहे. उत्तम लोकेशन्स, चित्रीकरणाचा उत्तम दर्जा, श्रवणीय संगीत, मुख्य कलावंतांचा चांगला अभिनय असे सारे काही असलेला ‘धमक’ हा चित्रपट भयंकर खलनायक आणि कथानकातील भरकटलेपणामुळे अपेक्षित परिणाम साधू शकत नाही. परंतु एक मसालापट म्हणून माफक रंजन करतो.
मोरेश्वर हा चित्रपटाचा नायक आहे. त्याचा मामा म्हणजे डॉ. चाचड आपली मुलगी गौरीचे लग्न मोरेश्वरसोबत लावून देतो. गौरी वयाने वाढली असली तरी अल्लडच वागते. त्यामुळे मोरेश्वर हा आपला नवरा असूनही त्याला भावोजी संबोधते. तिच्या अल्लडपणामुळे मोरेश्वर वैतागतो, घर सोडून निघून जातो. कुंदापूर या गावात डॉ. चाचड यांची कन्या गौरीवर खलनायक विक्रमदादा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हाच आपला नायक म्हणजे मोरेश्वर उगवतो आणि विक्रमदादाला धडा शिकवितो. कुंदापूरचा गावगुंड असलेला विक्रम आणि त्याचे साथीदार गावात उच्छाद मांडतात. त्यांना इन्स्पेक्टर मालवणकर या पोलिसाचीही साथ मिळते. मोरेश्वर आणि त्याच्या मित्रांशी मारामारीत डॉ. चाचड यांनाच हे गुंड भोसकतात. त्यानंतर गाव पेटून उठतो. विक्रमदादाला धडा शिकविण्याचा विडा उचलतो आणि त्याचे नेतृत्व आधी मोरेश्वर, मग डॉ. चाचड आणि नंतर पोलीस इन्स्पेक्टर करतो.
सरळसोट कथानक असलेला, शेवट गोड असणारा हा चित्रपट विनाकारण भरकटवण्याची किमया लेखकाने केली आहे. लेखक-दिग्दर्शक एकच असल्यामुळे हा गोंधळ उडाला आहे हे चित्रपट पाहताना जाणवतेच. उत्कृष्ट निर्मितिमूल्य, खलनायक वगळता अनिकेत विश्वासरावने साकारलेला मोरेश्वर, गिरिजा जोशीने साकारलेली गौरी, इन्स्पेक्टर मालवणकरच्या भूमिकेतील अशोक समर्थ, डॉ. चाचड यांच्या भूमिकेतील मोहन जोशी, मोरेश्वरचे बॉस दाखविलेले विजू खोटे अशा सर्वानीच चांगला अभिनय केला आहे. सबंध चित्रपटात खलनायक रंगविलेला शौनिल शिंदे याची संवादफेक यामुळे चित्रपट अनेक ठिकाणी खलनायकाची भीती दाखविण्याऐवजी प्रेक्षकाला हसवितो. पदार्पणातील भूमिका असल्यामुळे अभिनयातील नवखेपणा समजू शकतो. परंतु दिग्दर्शकाने किमान शुद्ध संवाद देण्याऐवजी खलनायकाला दुसरा कुणाचा तरी भारदस्त आवाज दिला असता तर खलनायक फिका पडला नसता. चांगल्या मसालापटाच्या सर्व शक्यता असलेला हा चित्रपट ठरला असता. परंतु कथानक भरकटते आणि नायक मध्यंतरानंतर दुय्यम भूमिकेतील कलावंत ठरतो, इन्स्पेक्टर मालवणकर आणि काही वेळा डॉ. चाचड याच व्यक्तिरेखा नायक ठरतात. त्यामुळे चित्रपट उत्तम मसालापट ठरू शकत नाही. परंतु किमान मनोरंजन करतो. एकंदरीत चित्रपटातील ‘शैला मी शैला’ हे मेघना नायडूवर चित्रीत झालेले आयटम साँग आणि मुमैद खानवर चित्रीत झालेली लावणी या दोन गाण्यांमुळे चित्रपट गाजेल एवढे मात्र नक्की.
धमक
निर्माती – सुवर्णा बांदिवडेकर
लेखक-दिग्दर्शक – राजेंद्र बांदिवडेकर
संगीत – निर्मल कुमार
गीते – राजेश बामुगडे
कलावंत – अनिकेत विश्वासराव, गिरिजा जोशी, मोहन जोशी, अशोक समर्थ, उमा सरदेशमुख, विद्याधर जोशी, विजू खोटे, जयवंत वाडकर, अजय पाध्ये, धनंजय मांद्रेकर, मौशमी तोंडवळकर, गिरीश साळवी, शोनील शिंदे, मुमैत खान, मेघना नायडू व अन्य.
मसालापट
सत् विरुद्ध असत्चा लढा, त्याला नायक-नायिकांच्या प्रेमाची फोडणी, प्रत्येक मोठय़ा प्रसंगाला अनुरूप गाणी, आयटम साँग, नायक-खलनायक यांची हाणामारी, शेवट गोड असा ठरीव फॉम्र्युला असला की उत्तम मसालापट बनतो.
आणखी वाचा
First published on: 27-04-2014 at 01:05 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhamak marathi movie review dhamak nothing but a masala movie