गायिका नेहा कक्करचं ‘ओ सजना’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं. तिने फाल्गुनी पाठकच्या ‘मैने पायल है छनकाई’ या गाण्याचं रिक्रिएशन करत ‘ओ सजना’ गाणं बनवलंय. काहींना नेहाचं रिक्रिएटेड गाणं आवडलं आहे, तर काहींनी नेहा जुनी एव्हरग्रीन गाणी खराब करत असल्याची टीका केली आहे. नेहाचं हे गाणं ऐकल्यानंतर आपली कायदेशीर कारवाई करण्याची इच्छा होत असल्याचं फाल्गुनी पाठक म्हणाल्या होत्या. दरम्यान, आता या गाण्यातील मुख्य कलाकार धनश्री वर्मा आणि प्रियांक शर्मा यांनी या गाण्याबद्दल प्रतिक्रिया देत कौतुक केलंय. त्यांच्यामते नेहाने मूळ गाणं आणखी चांगलं केलंय.
आधी संताप, आता यु-टर्न! नेहा कक्करवर चिडलेल्या फाल्गुनी पाठक म्हणाल्या, “माझा आक्षेप नाही…”
मिड-डेला दिलेल्या मुलाखतीत धनश्री म्हणाली, “मी फाल्गुनी पाठकचे ‘मैने पायल है छनकाई’ हे गीत ऐकत मोठी झाली आहे आणि मला ते खूप आवडते. त्यामुळे हे गाणं रिक्रिएट केल्यानंतर ते आणखी चांगलं होईल, असं मला वाटत होतं. अशातच मला या गाण्याच्या रिक्रिएशनबद्दल कळलं आणि मला खूप आनंद झाला. हे गाणं खूप लोकप्रिय आहे, त्यामुळे त्याचं नवीन व्हर्जन लोकांना आवडेल, याची आम्हाला खात्री होती. संगीतकार नेहा, तनिष्क बागची आणि जानी यांनी ते खूप चांगलं बनवलंय. त्यांना जे करायचं होतं, त्याला त्यांनी न्याय दिलाय. मी खूप आनंदी आहे.”
प्रियांक शर्मा म्हणाला, “मी या गाण्याची ऑफर आल्यानंतर एका मिनिटापेक्षा कमी वेळात होकार कळवला. हे एक आयकॉनिक गाणं आहे आणि त्यांनी (नेहा आणि टीम) ते खूप चांगलं बनवलंय. त्यांनी आधीच्या व्हर्जनला पूरेपूर न्याय दिलाय. खरं तर हे गाणं तयार झाल्यानंतर नेमकं कसं असेल, हे जाणून घेण्यासाठी मी खूप उत्सुक होतो. शिवाय आमची टीम खूप चांगली होती, त्यामुळे काम करताना मजा आली. आम्ही सगळे कोरियोग्राफर बॉस्को यांचे चाहते आहोत, त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करायला मिळणे ही खूप मोठी गोष्ट होती. मला ‘ओ सजना’ गाण्याचा एक भाग बनून खूप आनंद झाला.”