‘भरत जाधव एन्टरटेन्मेंट’ या अभिनेते भरत जाधव यांच्या नाटय़संस्थेची पहिलीवहिली निर्मिती असलेल्या ‘ढॅण्टॅढॅण’ या नाटकाबद्दल एक वेगळी उत्सुकता होती. ‘अधांतर’, ‘टाइमपास’सारख्या गंभीर आशयाच्या rv16नाटकांतून अभिनयाची मोठी यत्ता दाखविणाऱ्या, तसंच ‘सही रे सही’सारख्या धंदेवाईक नाटकातून सुपरस्टार बनलेल्या भरत जाधव यांचा ओढा नेमका कशाकडे आहे, हे त्यातून कळून येणार होतं. त्यात त्यांनी दुसऱ्याला प्राधान्य दिल्याचं या पहिल्याच निर्मितीत दिसून येतं. मात्र, एक आहे, की त्यांनी या नाटकाच्या निर्मितीमूल्यांमध्ये कसलीच कसूर ठेवलेली नाही. पाश्चात्त्य रंगभूमीवरचं एखादं सस्पेन्स थ्रिलर नाटक आपण पाहतो आहोत असा भास ‘ढॅण्टॅढॅण’ पाहताना होत राहतो. तंत्र-मंत्राचा असा उत्तम वापर आपल्याकडच्या व्यावसायिक रंगभूमीवर सहसा आढळत नाही. फक्त त्याला सघन संहितेची जोड मिळती तर सोन्याहून पिवळं झालं असतं. यानिमित्तानं दहा वर्षांच्या खंडानंतर लेखक-दिग्दर्शक केदार शिंदे हेही रंगभूमीवर पुनश्च सक्रीय झालेले आहेत. 

‘ढॅण्टॅढॅण’चं कथानक साधं-सोपं आहे. तुटपुंज्या पगारावर नोकरी करणाऱ्या श्रीरंग देशमुख याच्या फॅक्टरीतील महत्त्वाचा माल असलेला कंटेनर अकस्मात गायब होतो. आणि त्याची जबाबदारी श्रीरंगवर असते. कंटेनरच्या गायब होण्यानं बॉस संतप्त होतो आणि दोन दिवसांत कंटेनर शोधून काढ, नाहीतर तुला नोकरी गमावावी लागेल, अशी धमकी तो श्रीरंगला देतो. ही नोकरी गेली तर श्रीरंगला भुके मरण्याखेरीज दुसरा पर्याय उरणार नसतो. आता हा कंटेनर कुठं शोधायचा, या विवंचनेत श्रीरंग घरी येतो. आणि त्याच रात्री देवयानी नावाची कुणीएक तरुणी श्रीरंगच्या घरी येते आणि त्याला गोव्यातील डिकोस्टा हा माणूसच त्याला यातून वाचवू शकेल असं सांगते. काही लोक त्याच्या आणि आपल्या मागावर असल्याचंही ती त्याला सांगते. त्यानंतर काही वेळातच श्रीरंगच्या घरातच तिचा खून होतो आणि त्याचा आळ श्रीरंगवर येतो. आपल्यामागे लागलेल्या या शुक्लकाष्ठातून वाचायचं असेल तर त्या डिकोस्टाला गाठण्याशिवाय पर्याय नाही, हे श्रीरंगला कळून चुकतं. तो पोलिसांचा ससेमिरा चुकवत गोव्याला जायला निघतो. ट्रेनने गोव्याला निघालेल्या श्रीरंगच्या आयुष्यात नंतर अशा काही वेगानं एकेक अतक्र्य घटना घडतात, की प्रवाहपतितासारखं त्यात वाहवत जाण्याशिवाय त्याच्यापुढे दुसरा मार्ग उरत नाही.
.. गोव्यात श्रीरंग सुरक्षित पोहोचतो का? तिथं पोहोचल्यावर डिकोस्टा त्याला भेटतो का? तो त्याला या बालंटातून कशा प्रकारे बाहेर काढतो? श्रीरंगला तो वाचवतो की आणखीन संकटात लोटतो?.. अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं प्रत्यक्ष नाटकात शोधणंच उचित ठरेल.
लेखक-दिग्दर्शक केदार शिंदे यांचं हे सस्पेन्स थ्रिलर नाटक अत्यंत वेगवान सादरीकरणानं प्रेक्षकाला रोलरकोस्टर राइडप्रमाणे एका प्रचंड चक्रीपाळण्यात बसवून भोवळ येईतो घुमवतं. समोर नेमकं काय घडतंय, याचा तर्कनिष्ठ विचार करण्याइतकी उसंतच ‘ढॅण्टॅढॅण’ त्याला देत नाही. असंख्य व्यक्ती आणि त्यांच्यात सुसाट घडणारे घटना-प्रसंग, त्यासाठी दृक्-श्राव्यतेचा, तंत्र-मंत्रांचा आणि मल्टिमीडियाचा केलेला नजरबंदी करणारा प्रयोग यामुळे प्रेक्षक कळत-नकळत भिरभिरत राहतो खरा; परंतु आशयदृष्टय़ा मात्र तो असमाधानीच राहतो. पालीची मगर करण्याचं तंत्र केदार शिंदे आणि संतोष पवार या दोघांनी आपल्या बहुसंख्य नाटकांतून वापरलेलं असलं, आणि ते बऱ्याचदा यशस्वीही झालेलं असलं, तरी ते अस्सल नाटय़ानुभव देण्यात नेहमीच कमी पडत आलेलं आहे, ही त्याची मर्यादा आहे. ‘ढॅण्टॅढॅण’मध्येही त्याचा प्रत्यय येतो. इम्प्रोव्हायझेशन तंत्रानं नाटक उभं करण्यात या दोघांची मास्टरी आहे. परंतु त्याच्या मर्यादांचं भान त्यांना दिसत नाही. ‘ढॅण्टॅढॅण’ कुठल्या एखाद्या कुळीत बसवायचं म्हणून आपण त्याला सस्पेन्स थ्रिलर म्हणू; परंतु यातला सस्पेन्स कधीही पाहणाऱ्यावर ताण आणत नाही. एक गंमत एवढय़ापुरताच तो सीमित राहतो. सस्पेन्स थ्रिलर नाटकं ही मोठय़ा बौद्धिक गुंतागुंतीची मागणी करणारी असतात. परंतु इथं कसलाही गुंता नाही. म्हणजे नाटकात काही खून होत असले तरी त्यामागची कारणमीमांसा देण्याची गरज लेखक-दिग्दर्शकाला वाटत नाही. त्यामुळे मुदलात गुंताच नाही, तर तो सोडवण्याची जबाबदारी येतेच कुठं? तर असं हे ‘ढॅण्टॅढॅण’! rv09
केदार शिंदे यांनी आपल्या नेहमीच्या पठडीनुसार अनेक घटना-प्रसंगांची लांबलचक मालिका यात गुंफली आहे. त्यासाठी असंख्य पात्रं योजली आहेत. त्यांचं बाह्य़ांग, त्यांच्या लकबी, वागणं-वावरणं, त्यांच्या कृती अशा बारीकसारीक तपशिलांमध्येच ते अडकून पडले आहेत. पात्रांच्या ‘असण्या’ला किंवा वागण्याला, तसंच कृतीला काहीएक ठोस कार्यकारणभाव लागतो, हे मात्र त्यांच्या गावीही नाही. त्यामुळे समोर जे घडतं ते मुकाटपणे पाहणं, एवढंच आपल्या हाती उरतं. या नाटकाची सर्वात जमेची बाजू म्हणजे त्यात तंत्र-मंत्राचं केलेलं सुंदर उपयोजन. यातल्या पात्रांना स्वत:ची अशी ‘भूमी’ नसली तरी त्यांना अस्सल बाह्य़ रूपडय़ांमध्ये पेश केलं गेलं आहे. खरं तर श्रीरंगला एकाच तोंडवळ्याची बाई सतत या ना त्या रूपात आपल्यासमोर येते आहे याचा साधा संशय जरी आलेला दाखवला असता तरी नाटकातल्या सस्पेन्सला काडीचा का होईना,आधार लाभला असता. परंतु तसं मुळातच केदार शिंदेंच्या मनात नसावं. त्यांना नाटकाची धंदेवाईक बाजूच या उपयोजनामागे बहुधा अपेक्षित असावी. त्याचप्रमाणे एकाच कलाकाराला अनेक भूमिकांमध्ये वावरायला लावण्याचं थ्रिल! एक मात्र खरंय, की त्यांनी मल्टिमीडिया, पाश्र्वसंगीत, प्रकाशयोजना, ध्वनिसंयोजन, वेश/रंगभूषा, नेपथ्य या सगळ्या तंत्र-मंत्रांचा अफलातून वापर यात केलेला आढळतो. त्यासाठी त्यांना शंभरपैकी दोनशे मार्क्स द्यायला हरकत नाही. या नाटकाची हीच खरी जमेची बाजू. आणि अर्थातच सगळ्या कलाकारांची सळसळती ऊर्जा, त्यांची चतुरस्रता आणि प्रेक्षकांना कवेत घेण्याची त्यांची विलक्षण ताकद.. हॅट्स ऑफ टु देम!!
प्रदीप मुळ्ये या सृजनशील नेपथ्यकारानं या नाटकाची जातकुळी अचूक ओळखून केलेलं सूचक व सांकेतिक नेपथ्य नाटकाच्या गतिमानतेला आवश्यक तो अवकाश उपलब्ध करून देतं. ओंकार दत्त यांच्या वेशभूषेला तसंच शीतल तळपदे यांच्या कल्पक प्रकाशयोजनेला दाद द्यावी तेवढी थोडीच. साई-पियुष यांचं संगीत व ओंकार दत्त यांची गीतं नाटकाच्या श्राव्य बाजूत भर घालतात. रंगभूषाकाराचं नाव दिलेलं नसलं तरीही त्यांचा पात्रांना ‘चेहरा’ देण्यातला सिंहाचा वाटा दुर्लक्षिता येणार नाही. तंत्रज्ञांच्या भक्कम अधिष्ठानावरच ‘ढॅण्टॅढॅण’चा प्रत्ययकारी डोलारा उभा आहे.
भरत जाधव यांनी श्रीरंग देशमुखचं निरपराधीपण, नस्त्या लफडय़ात अडकल्यानं झालेली घालमेल, एकापाठोपाठ घडणाऱ्या अतक्र्य घटनांनी गोंधळून-गडबडून जाणं, परिस्थितीनं केलेली गोची, त्यातून आलेली उद्विग्नता व असहायता यांचा व्यामिश्र भावकल्लोळ.. तसंच मधेच भूमिकेबाहेर येत प्रेक्षकांना विश्वासात घेणं- या सगळ्या गोष्टी उत्कटतेनं केल्या आहेत. संदेश उपशाम यांनी श्रीरंगचे वडील ते लॉज-मालकीण अशा वैविध्यपूर्ण चित्रविचित्र भूमिकांमध्ये धमाल रंगत आणली आहे. अजिंक्य दाते यांनीही श्रीरंगचा बॉस ते खरा डिकोस्टा व्हाया रॉड्रिक्स, रेल्वे इन्स्पेक्टर, डिकोस्टाचा बॉडीगार्ड असा वळणावळणाचा प्रदीर्घ प्रवास उत्तमरीत्या पार पाडला आहे. शिवराज वायचळ यांनीही ऑफिसातला घाटपांडे ते खोटा डिकोस्टा व्हाया कामवाली बाई, ट्रेनमधील टीसी वगैरे पात्रांना मूर्त रूप दिलं आहे. गौरी सुखटणकर यांनी श्रीरंगच्या ऑफिसातली नयना, देवयानी, टीना, टीव्ही न्यूज रीडर, गावरान पारू ते डिकोस्टाची बायको सुझान अशा विविध भूमिका समजदारीनं निभवल्या आहेत. प्रशांत विचारे यांनीही श्रीरंगचं आरशातलं प्रतिबिंब ते लॉजचा मरतुकडा मालक अशी असंख्य पात्रं सजीव केली आहेत. सर्वच कलाकारांनी आपलं शंभर टक्के योगदान ‘ढॅण्टॅढॅण’मध्ये दिलं आहे. तेवढं जरा थोडं आशयाकडे लक्ष देते तर एक चांगली नाटय़कृती रसिकांच्या पदरी पडती.

Story img Loader