दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषनं नुकतीच सोशल मीडियावरून त्याच्या घटस्फोटाची घोषणा केली आणि पुन्हा एकदा त्याचं नाव चर्चेत आलं आहे. पत्नी ऐश्वर्या रजनीकांतसोबत आपला १८ वर्षांचा संसार मोडत धनुष विभक्त झाला. त्याची सोशल मीडिया पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या दोघांच्या घस्फोटाच्या वृत्तानं त्यांच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. पण अशाप्रकारे चर्चेत येण्याची धनुषची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही लग्नानंतर काही प्रसिद्ध अभिनेत्रींशी त्याचं नाव जोडलं गेलं होतं. ज्यामुळे धनुष चर्चेत आला होता.
धनुषनं आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर केवळ दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतच नाही तर बॉलिवूडमध्येही स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अलिकडेच तो सारा अली खानसोबत ‘अतरंगी रे’ चित्रपटात दिसला होता. पण धनुषच्या अभिनय करिअरसोबतच त्याच्या खासगी आयुष्यामुळेही तो अनेकदा चर्चेत राहिला आहे. एवढंच नाही तर ऐश्वर्या रजनीकांतशी लग्न केल्यानंतरही त्याचं नाव अमाला पॉल आणि श्रुती हसन या दाक्षिणात्य अभिनेत्रींशी जोडलं गेलं होतं. त्यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा झाल्या होत्या. ज्यामुळे बरेच वादही झाले होते.
दाक्षिणात्य अभिनेत्री अमाला पॉलनं २०१४ साली फिल्म मेकर ए एल विजय याच्याशी लग्न केलं होतं पण २०१६ साली या दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर विजयनं आर ऐश्वर्या नावाच्या एका मुलीशी लग्न केलं. पण त्यावेळी सोशल मीडियावर मात्र अमालाच्या घटस्फोटाचं कारण धनुषशी तिची वाढती जवळीक असल्याचं बोललं गेलं होतं. अर्थात अमालानं या सर्व निव्वळ अफवा असल्याचं म्हटलं होतं. मात्र त्यावेळी धनुष- अमाला यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती.
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार धनुष आणि प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती हसन यांच्याही अफेअरच्या सोशल मीडियावर जोरदार चर्चां झाल्या होत्या. चित्रपट ‘३’ च्या शूटिंगदरम्यान या दोघांमध्ये जवळीक वाढल्याच्या चर्चा होत्या. या चित्रपटाचं दिग्दर्शन धनुषची पत्नी ऐश्वर्यानं केलं होतं. तर श्रुती ही तिची बालमैत्रीण आहे. धनुषसोबत आपल्या अफेअरच्या चर्चांवर श्रुतीनं, ‘आम्ही केवळ एकमेकांचे चांगले मित्र आहोत त्यामुळे लोक काय बोलतात यामुळे आम्हाला फरक पडत नाही.’ असं स्पष्टीकरण दिलं होतं. याशिवाय स्वतः ऐश्वर्यानंही या चर्चा केवळ अफवा असल्याचं म्हटलं होतं.
दरम्यान आपल्या घटस्फोटाची माहिती देताना धनुषनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. धनुषनं लिहिलं, ‘मित्र, पती-पत्नी, पालक आणि एकमेकांचे शुभचिंतक म्हणून १८ वर्षं सोबत राहिलो. आज आम्ही एका अशा ठिकाणी उभे आहोत, जिथे आमचे मार्ग वेगळे आहेत. ऐश्वर्या आणि मी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आमच्या निर्णयाचा स्वीकार करावा’ याशिवाय अशाच पद्धतीची पोस्ट ऐश्वर्याने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर देखील केली आहे.