सध्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय कपल धनुष आणि ऐश्वर्या हे चर्चेत आहे. या चर्चा त्यांनी सोशल मीडियाद्वारे घटस्फोट घेत असल्याचे सांगितल्यानंतर सुरु झाल्या आहेत. त्यांच्या या निर्णयाने अनेकांना धक्काच बसला आहे. पण त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय का घेतला? असा प्रश्न देखील प्रत्येकालाच पडला आहे. दरम्यान नुकतंच धनुषचे वडील आणि तमिळ चित्रपट निर्माते कस्तुरी राजा यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. कौटुंबिक वादामुळे धनुष आणि ऐश्वर्याचे लग्न मोडले, असे त्यांनी सांगितले.
एका न्यूज पोर्टलशी बोलताना धनुषचे वडील आणि तमिळ चित्रपट निर्माते कस्तुरी राजा म्हणाले की, “धनुष आणि ऐश्वर्याने घटस्फोट घेतला नसून ते फक्त वेगळे झाले आहेत. अनेकदा कुटुंब आणि जोडप्यांमध्ये मतभेद आणि कौटुंबिक भांडणे होत असतात. यामुळेच धनुष आणि ऐश्वर्या वेगळे झाले आहेत. सध्या धनुष आणि ऐश्वर्या हैदराबादमध्ये आहेत.”
गेल्या काही दिवसांपासून अनेक कलाकार घटस्फोट घेत असल्याचे समोर आले आहे. अभिनेता आमिर खानने पत्नी किरण रावपासून वेगळ्या होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अभिनेत्री समांथा रुथ प्रभूने पती नागा चैतन्यला घटस्फोट दिला. त्यापाठोपाठ आता धनुष आणि पत्नी ऐश्वर्या रजनीकांतपासून वेगळे झाल्याची घोषणा केली. कलाविश्वातील अशा बऱ्याच जोड्या आहेत, ज्यांनी घटस्फोटाचे वृत्त सांगत चाहत्यांना मोठा धक्का दिला.
“मी सलमान खानच्या पाठीवरील माकड होऊ शकत नाही…”; झरीन खान संतापली
दरम्यान, आपल्या घटस्फोटाची माहिती देताना धनुषनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. धनुषनं लिहिलं, ‘मित्र, पती-पत्नी, पालक आणि एकमेकांचे शुभचिंतक म्हणून १८ वर्षं सोबत राहिलो. आज आम्ही एका अशा ठिकाणी उभे आहोत, जिथे आमचे मार्ग वेगळे आहेत. ऐश्वर्या आणि मी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आमच्या निर्णयाचा स्वीकार करावा’ याशिवाय अशाच पद्धतीची पोस्ट ऐश्वर्याने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर देखील केली आहे.
कशी झाली धनुष आणि ऐश्वर्याची पहिली भेट?
२००२ मध्ये kadhal konden च्या स्क्रीनिंगच्या वेळी ऐश्वर्या आणि धनुष यांची पहिली भेट झाली होती. चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी ऐश्वर्या वडील रजनीकांत यांच्यासोबत आली होती. त्यावेळी धनुषचं परफॉर्मन्स पाहून ती त्याच क्षणी त्याच्या प्रेमात पडली होती. विशेष म्हणजे स्क्रिनिंगच्या दुसऱ्याच दिवशी ऐश्वर्याने धनुषच्या घरी पुष्पगुच्छ पाठवत त्याला संपर्कात रहा असं सांगितलं होतं.
ऐश्वर्याने मैत्रीचा हात पुढे केल्यानंतर या दोघांची मैत्री वाढत गेली आणि त्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं होतं. त्यानंतर २००४ रोजी धनुष आणि ऐश्वर्याने घरातल्यांच्या संमतीने लग्न केलं. या दोघांचा लग्न सोहळा दाक्षिणात्य कलाविश्वातील गाजलेल्या लग्नसोहळ्यांपैकी एक होता. त्यांना दोन मुले आहेत. त्यांची नावे यात्रा आणि लिंगा असे आहे.