दाक्षिणात्य अभिनेता धनुषने सोमवारी आपला १८ वर्षांचा संसार मोडत, पत्नी ऐश्वर्या रजनीकांतपासून वेगळे होण्याची घोषणा केली. प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या आणि धनुष यांचे २००४ मध्ये लग्न झाले आणि त्यांना यात्रा आणि लिंगा ही दोन मुले आहेत. धनुष आणि ऐश्वर्या यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपण विभक्त झाल्याची घोषणा देखील केली आहे.
ट्विटरवर शेअर केलेल्या नोटमध्ये धनुषने म्हटले आहे की, “मित्र म्हणून, जोडपे म्हणून, पालक म्हणून आणि एकमेकांचे शुभचिंतक म्हणून १८ वर्षांची सोबत राहिली. आज आम्ही एका अशा ठिकाणी उभे आहोत, जिथे आमचे मार्ग वेगळे आहेत. ऐश्वर्या आणि मी जोडपे म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आमच्या निर्णयाचा स्वीकार करावा.” असं म्हणत धनुषने घटस्फोटा बाबतची माहिती दिली आहे. तर, अशाच पद्धतीची पोस्ट ऐश्वर्याने तिच्या इन्स्टा अकाउंटवर देखील केली आहे.
२००२ मध्ये kadhal konden च्या स्क्रीनिंगच्या वेळी ऐश्वर्या आणि धनुष यांची पहिली भेट झाली होती. चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी ऐश्वर्या वडील रजनीकांत यांच्यासोबत आली होती. त्यावेळी धनुषचं परफॉर्मन्स पाहून ती त्याच क्षणी त्याच्या प्रेमात पडली होती. विशेष म्हणजे स्क्रिनिंगच्या दुसऱ्याच दिवशी ऐश्वर्याने धनुषच्या घरी पुष्पगुच्छ पाठवत त्याला संपर्कात रहा असं सांगितलं होतं.
ऐश्वर्याने मैत्रीचा हात पुढे केल्यानंतर या दोघांची मैत्री वाढत गेली आणि त्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं होतं. त्यानंतर २००४ रोजी धनुष आणि ऐश्वर्याने घरातल्यांच्या संमतीने लग्न केलं. या दोघांचा लग्न सोहळा दाक्षिणात्य कलाविश्वातील गाजलेल्या लग्नसोहळ्यांपैकी एक होता.