दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष सध्या त्याच्या ‘द ग्रे मॅन’ या हॉलिवूड चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा प्रीमियर लंडननंतर आता मुंबईत ठेवण्यात आला होता. यावेळी हॉलिवूड कलाकारांनी देखील या प्रीमियरला हजेरी लावली होती. पण या सर्वांमध्ये धनुषने मात्र आपल्या देसी अंदाजात उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. या प्रीमियरला धनुष पारंपरिक भारतीय पोशाखात दिसला. सध्या सोशल मीडियावर धनुषचा हा लुक बराच व्हायरल होताना दिसत आहे.
मुंबईमध्ये झालेल्या या प्रीमियरला बॉलिवूड कलाकारांसोबत हॉलिवूड कलाकारांनी देखील हजेरी लावली होती. पण या सर्वात धनुषचा लुंगी अवतार सोशल मीडियावर चर्चेत राहिला. या प्रीमियरसाठी धनुषनं पारंपरिक दक्षिण भारतीय पोशाखाला प्राधान्य दिलं. तो शर्ट आणि लुंगी अशा पारंपरिक वेशात या प्रीमियरसाठी आला आणि त्याने सर्वांची मनं जिंकली. सध्या त्याचं सोशल मीडियावर बरंच कौतुक केलं जात आहे. हॉलिवूड चित्रपटाच्या प्रीमियरसाठी धनुषचं भारतीय पोशाखात पोहोचणं चाहत्यांना भावलं आहे.
या प्रीमियरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यात विक्की कौशल, अदिती पोहनकर, ‘द ग्रे मॅन’चे दिग्दर्शक जो रूसो यांच्यासह इतर अनेक सेलिब्रेटी दिसत आहेत. पण या सर्व फोटोंमध्ये धनुष आणि विक्की कौशलचे फोटो चर्चेत आहेत. या शिवाय काही व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यात विक्की कौशल आणि धनुष एकमेकांची गळाभेट घेताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ प्रसिद्ध व्हिडीओ जर्नलिस्ट विरल भयानी यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
आणखी वाचा- धनुषचा रोमँटिक अंदाज पाहून चक्क लाजली होती ऐश्वर्या, व्हायरल होतोय जुना व्हिडीओ
दरम्यान या आधी ‘द ग्रे मॅन’चा ग्रँड प्रीमियर लंडन येथे झाला होता. या प्रीमियरला धनुषसोबत त्याची दोन्ही मुलं लिंगा आणि यात्रा देखील उपस्थित होते. स्वतः धनुषनं हे फोटो त्याच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केले होते.
पाहा व्हिडीओ –
धनुषच्या ‘द ग्रे मॅन’ चित्रपटाबद्दल बोलायचं तर या चित्रपटात धनुष व्यतिरिक्त एना डी अरमास, बिली बॉब थॉर्नटन, रेगे जीन-पेज आणि जेसिका हेनविक यांसारखी हॉलिवूडचे स्टार कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. हा चित्रपट २२ जुलैला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. नेटफ्लिक्सचा सर्वात महागडा चित्रपट अशी चर्चा असलेल्या या चित्रपटचं बजेट तब्बल २०० मिलियन डॉलर एवढं आहे.