दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष आणि त्याची पत्नी ऐश्वर्या रजनीकांत काही दिवसांपूर्वीच एकमेकांपासून वेगळे झालेत. त्यानंतर धनुष त्याच्या कामात बिझी झाला. सध्या धनुष त्याच्या भाऊ आणि निर्माता सेल्वाराघवनचा आगामी चित्रपट ‘नान वरुवेन’च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. तसं पाहायला गेलं तर धनुष सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसतो. पण त्यानं नुकताच एक फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. पत्नी ऐश्वर्यापासून वेगळं झाल्यानंतर धनुषची ही पहिलीच पोस्ट आहे.
धनुष सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. मात्र अशातही तो आपल्या कुटुंबासाठी देखील वेळ काढताना दिसत आहे. हे त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये पाहायला मिळत आहे. पत्नी ऐश्वर्यापासून वेगळं झाल्यानंतर धनुषनं पहिल्यांदाच त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो त्याचा मुलगा यत्रसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करताना दिसत आहे. या फोटोमध्ये वडील आणि मुलातलं खास बॉन्डिंग दिसून येत आहे.
इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर करताना धनुषनं लिहिलं, ‘याला मी याआधी कुठे पाहिलं आहे का? #yathradhanush .. #naanevaruven’ हा फोटो चित्रपट ‘नान वरूवेन’च्या लोकशनवरील आहे. याच्या बॅकग्राउंडला सुंदर निसर्ग पाहायला मिळत आहे. धनुष आणि यत्र कॅज्युअल लूकमध्ये असून एकमेकांशी गप्पा मारताना दिसत आहेत. धनुष आणि त्याच्या भाऊ या चित्रपटाच्या निमित्तानं चौथ्यांदा एकत्र काम करताना दिसणार आहेत.
दरम्यान १७ जानेवारी २०२२ रोजी धनुष आणि ऐश्वर्या यांनी ते दोघंही एकमेकांपासून वेगळे होत असल्याची घोषणा केली होती. याची माहिती या दोघांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. जवळपास १८ वर्षांचा संसार मोडत हे दोघं वेगळे झाले आहेत. धनुषच्या कामाबद्दल बोलायचं तर आगामी काळात त्याच्याकडे ‘नान वरुवेन’, ‘सर’, ‘मारन’ हे चित्रपट आहेत.