दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा सुपरस्टार धनुषने २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रांझना’ चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. मध्यंतरी एअरपोर्टवरील धनुषचा वाढलेली दाढी आणि लांब केसांचा लुक सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. धनुषला अशा अवतारात पाहून त्याचे अनेक चाहते आश्चर्यचकित झाले होते अनेकांनी त्याला ओळखलेही नव्हते. मात्र, आता पुन्हा एकदा अभिनेत्याने आपल्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. तिरुपती मंदिर परिसरातील व्हायरल फोटोंमध्ये धनुषने टक्कल केल्याचे पाहायला मिळत आहे.
हेही वाचा : “बिगबॉसचं घर लै रिस्की”, किरण मानेंनी शेअर केलेली पोस्ट चर्चेत; म्हणाले, “माझा गॉडफादर एकच…”
अभिनेता धनुष सोमवारी सकाळी आपली दोन्ही मुले यात्रा आणि लिंगा यांच्याबरोबर तिरुपती मंदिरात पोहोचला. यावेळी धनुषबरोबर त्याचे आई-वडील कस्तुरी राजा आणि विजयालक्ष्मी उपस्थित होते. अभिनेत्याने याचवेळी आपल्या मुलांसह तिरुपती मंदिरात आपले केस दान केल्याची चर्चा आहे.
धनुषच्या या नव्या लुकचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. त्याचा आगामी चित्रपट ‘D50’साठी हा लुक असू शकतो अशी शक्यता अभिनेत्याच्या काही चाहत्यांनी वर्तवली आहे. तिरुपती मंदिराजवळच्या व्हायरल व्हिडीओ आणि फोटोंमध्ये धनुषने केस दान केल्यामुळे डोक्यावर टोपी, गळ्यात मोठी रुद्राक्षाची माळ आणि तोंडावर मास्क घातलेला दिसत आहे.
दरम्यान, धनुष लवकरत ‘कॅप्टन मिलर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट १९३० च्या पार्श्वभूमीवर आधारित असून, अलीकडेच या चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला होता. तसेच पुढच्या वर्षी बहुचर्चित रांझनाचा सीक्वेल ‘तेरे इश्क मैं’मध्ये धनुष प्रमुख भूमिका साकारणार आहे.