‘रांझणा’ या हिंदी चित्रपटापासूनच धनुषने त्याची छाप प्रेक्षकांवर पडायला सुरुवात केली होती. आता धनुष हा केवळ दाक्षिणात्य चित्रपटापुरता मर्यादित राहिलेला नसून तो आता हॉलिवूडमध्येसुद्धा महत्वाच्या भूमिका करू लागला आहे. मध्यंतरी त्याने हॉलिवूडचा ‘द ग्रे मॅन’ या चित्रपटात महत्वाची भूमिका केली आहे, याबरोबरच तो प्रादेशिक चित्रपटातसुद्धा झळकतो आहे. गेल्या काही दिवसातील धनुषचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकले नसले तरी त्याचे चाहते त्याच्या एका बहुचर्चित बायोपिकची वाट बघत आहेत.
धनुषच्या याच आगामी चित्रपटाबद्दल नवीन अडपेट समोर आली आहे. दिग्गज संगीतकार व संगीत सम्राट म्हणून ओळखले जाणारे इलयाराजा यांच्या बायोपिकमध्ये धनुष त्यांची भूमिका साकारणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. प्रसिद्ध ट्रेड एक्स्पर्ट मनोबाला विजयबालन यांनी ट्विटरवरुन या बातमीची पुष्टी केली आहे.
आपल्या ट्वीटमध्ये ते लिहितात, “संगीत सम्राट इलयाराजा यांच्या जीवनावर आधारित बहुचर्चित अशा बायोपिकचे चित्रीकरण ऑक्टोबर २०२४ मध्ये सुरू होणार असून अष्टपैलू व अतिशय गुणी अभिनेता धनुष हा त्यांची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट २०२५ साली प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.” या ट्वीटबरोबरच त्यांनी धनुष व इलयाराजा या दोघांचे फोटोसुद्धा जोडले आहेत. या फोटोमध्ये या दोघांनी पारंपरिक पांढऱ्या रंगाचा पोषाख परिधान केलेला आहे.
या घोषणेमुळे चाहते चांगलेच उत्सुक झाले असून त्यांनी या पोस्टखाली कॉमेंट करत या प्रोजेक्टसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. चाहते या चित्रपटाची फार आतुरतेने वाट बघत आहेत. इलयाराजा यांनी ७००० गाणी संगीतबद्ध केली असून १००० हून अधिक चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं आहे, याबरोबरच तब्बल २०००० हून अधिक लाईव्ह शोजमध्ये त्यांनी गाणी सादर केली आहेत. त्यांना वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. २०१२ मध्ये त्यांना ‘संगीत नाटक अकादमी’चा पुरस्कार देण्यात आला होता. त्यांना पद्मभूषण व पद्मविभूषण या पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलं आहे.