‘धर्मवीर – मुक्काम पोस्ट ठाणे’ हा दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांचे चरित्र उलगडणारा चित्रपट होता. त्याच्या पुढच्या भागाचा विचार करताना आनंद दिघे यांची हिंदुत्वाची विचारधारा आणि त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून ते जपण्याचा केलेला प्रयत्न यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. हे करत असताना एकाअर्थी तो आनंद दिघे यांचा चरित्रपट उरलेला नाही, मात्र त्यांच्याबरोबर राहून हिंदुत्ववादी राजकारणाचा वस्तुपाठ घेतलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सहकारी कार्यकर्त्यांच्या मनात उतरलेली त्यांची विचारधारा, दिघे यांच्याबरोबर केलेले कार्य आणि वर्तमान वास्तवातील अनुभवांचा संघर्ष या दृष्टिकोनातून चित्रपटाची मांडणी केलेली आहे. त्यामुळे साहजिकच चरित्रपटाचा धागा पूर्ण न सोडता आनंद दिघे – एकनाथ शिंदे या गुरू-शिष्यांच्या आयुष्यातील वास्तव घटनांचे धागे आणि त्यात चित्रपटातील दृश्याविष्काराच्या दृष्टीने घेतलेले स्वातंत्र्य अशी काहीशी सोयीची मांडणी लेखक – दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी ‘धर्मवीर २’साठी केली आहे.

‘धर्मवीर २ – साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ या चित्रपटाच्या शीर्षकात उल्लेख केल्याप्रमाणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या हिंदुत्वाच्या हाकेला धाव देऊन त्यांच्याबरोबर जोडला गेलेला आनंद दिघे यांच्यासारखा कट्टर शिवसैनिक आणि त्यांनी आपल्या तडाखेबाज पद्धतीने कार्य करत घडवलेले कार्यकर्ते यांच्यातून हा हिंदुत्ववादाचा विचार पुढे कसा झिरपत गेला याची झलक पाहायला मिळते. मात्र हा चित्रपट सुरुवातीपासून शेवटपर्यंत आनंद दिघे यांच्यावर केंद्रित राहिलेला नाही, तो त्यांच्या विचारांचा झेंडा आपल्या खांद्यावर घेतलेल्या एकनाथ शिंदे यांचा आहे. आनंद दिघे यांनी आपल्या कार्यातून हिंदू धर्म जपण्याबरोबरच लोकसेवेचाही वस्तुपाठ आपल्या सहकाऱ्यांना घालून दिला होता. त्यामुळे त्यांच्या तालमीत तयार झालेल्या कार्यकर्त्यांची विचारधारा आणि कालौघात महाराष्ट्रातील सत्ताकारणात घडलेल्या आघाडी-बिघाडीच्या समीकरणांनी पक्षाची मूळ तत्त्वं, धोरण, वास्तवात एकेकाळी हिंदुत्वविरोधी म्हणून हिणवलेल्यांच्या बरोबरीने सत्ताकारभार सांभाळताना कार्यकर्त्यांच्या मनात उमटलेला उद्वेग हा कथाभाग या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. मात्र हा कथाभाग विस्तारताना एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबरच्या सहकाऱ्यांनी केलेले बंड आणि त्यानंतर घडलेल्या सत्ताबदलाच्या नाट्याचा रंग त्याला दिला गेला आहे. चरित्रपटापेक्षाही थेट राजकीय प्रचारपटाच्या अंगाने चित्रपटाची मांडणी करण्यात आली आहे, त्यामुळे त्यातल्या सत्यासत्यतेचा धांडोळा घेतानाही तो व्यक्तीसापेक्षच असणार यात शंका नाही. किंबहुना, ते लक्षात घेऊन अशा पद्धतीचा प्रचारपट रंगवताना गोळीबंद पटकथा आणि त्याला तात्त्विक-भावनिक संघर्षाचा मुलामा देत वेगवान, अँग्री यंग मॅन धाटाची मांडणी दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी केली आहे. यातले वास्तव संदर्भ सोडले तर स्वतंत्र काल्पनिक कथा म्हणून नक्कीच तो तरडे यांच्या नेहमीच्या शैलीतील धडाका चित्रपट म्हणून गणला गेला असता.

हेही वाचा >>>“त्या सीझनमध्ये एकाही मुलाला सोडलं नाहीस”, राखी सावंतने केली निक्कीची बोलती बंद; म्हणाली, “आय लव्ह यू बोलून…”

चित्रपटाची सुरुवातच पालघर येथील साधूंच्या हत्येच्या घटनेने होते. त्या घटनेने अस्वस्थ झालेले, तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री असलेले एकनाथ शिंदे आपल्या परीने ही घटना म्हणजे हिंदुत्वावर झालेला हल्ला आहे, त्याविरोधात ठोस कारवाई व्हायला हवी ही भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्यांना दाद मिळत नाही. मुळात हिंदुत्ववादी विचारसरणी असलेल्या भाजपबरोबरची युती सोडून सत्तेसाठी काँग्रेसबरोबर मनाविरुद्ध केलेली हातमिळवणी आणि त्यामुळे पक्षकार्यकर्त्यांच्या मनात उमटलेल्या अस्वस्थतेला हुंकार कसा मिळत गेला याचं चित्रण चित्रपट पहिल्या दृश्यचौकटीपासून करतो. दिघे यांनी हिंदू साधूसंतांना दिलेला पाठिंबा, जबरदस्तीने धर्मांतर करवणाऱ्या ख्रिास्ती मिशनऱ्याला विरोध करण्याबरोबरच आपल्या लोकांना धर्माची जाण यावी यासाठी केलेला प्रयत्न, कठीण परीक्षांमुळे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सुरू केलेल्या सराव परीक्षा, बाळासाहेबांच्या आदेशावरून अयोध्येला जाऊन बाबरी मशीद पाडणं, हाजीमलंग श्रीमलंगगड ओळखला जावा यासाठी केलेला संघर्ष, तत्कालीन सावरकरविरोधी पोलीस आयुक्त त्यागी यांना शिकवलेला धडा, साखर गोदामात साठवून ऐन सणाच्या वेळी महागाई भडकवणाऱ्या व्यापाऱ्यांना भीक न घालता गोदामं रिकामी करत सामान्यांना दिलेला दिलासा, राखी बांधणाऱ्या मुस्लीम भगिनीला तीनदा तलाक म्हणेन अशी धमकी देणाऱ्या नवऱ्याला घडवलेली अद्दल अशा भूतकाळातील घटनांचे दाखले देत दिघे यांचे विचार, त्यांनी त्यावेळी केलेल्या कृतींची आज वर्तमानात एकनाथ शिंदे यांच्याबरोबर घडलेल्या घटना आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांशी सांगड घालत हा कथाप्रवास दिग्दर्शकाने खेळता ठेवला आहे.

‘धर्मवीर २’ हा चरित्रपट आहे की नाही आणि त्यातला खरेखोटेपणा या गोष्टी बाजूला ठेवत स्वतंत्रपणे कलाकृती म्हणून विचार केला तर लेखक – दिग्दर्शक म्हणून प्रवीण तरडे यांनी केलेली कामगिरी आणि कलाकारांचा अभिनय या दोन्ही गोष्टी चोख ठरल्या आहेत. अभिनेता प्रसाद ओक यांनी आनंद दिघे यांची भूमिका पहिल्या चित्रपटातही अगदी हुबेहूब साकारली होती. तोच प्रभाव याही चित्रपटात आहे, मात्र हा चित्रपट एकनाथ शिंदे यांच्या व्यक्तिरेखेवर अधिक केंद्रित असल्याने त्यांची भूमिका करणाऱ्या अभिनेता क्षितीश दातेचा यात कस लागला आहे. क्षितीशने शिंदे यांच्या अगदी बारीकसारीक हालचाली, बोलताना होणारे त्यांचे हातवारे, निर्णायक प्रसंगात दाढीवरून हात फिरवण्याची त्यांची लकब, संवादफेकीतही त्यांच्याप्रमाणेच बोलण्याची पद्धत, त्यांची देहबोली हा सगळा परकाया प्रवेशाचा भाग अगदी बेमालूम रंगवला आहे. दिघेंबरोबरचे शिंदे यांचे ठाण्यातील सहकारी आणि नंतर सरकारला हलवून सोडणारे त्यांचे सहकारी दादा भुसे, संजय शिरसाट, संदीपान भुमरे, तानाजी सावंत, शहाजीबापू पाटील या व्यक्तिरेखांसाठी अचूक निवडलेले कलाकार आणि त्या सगळ्यांचा उत्तम अभिनय यामुळे प्रत्यक्षात अनुभवलेले हे सत्तानाट्य पडद्यावर पाहताना अधिक रंगत आली आहे. कलाकारांच्या अभिनयाने आणि दमदार मांडणीमुळे ‘धर्मवीर २’ हा चित्रपट पाहताना कंटाळवाणा होत नाही. अर्थात, यातील आशयाच्या खरेखोटेपणाचा विचार करायचा नाही असं म्हटलं तरी शेवटाकडे येताना दिग्दर्शकीय स्वातंत्र्याचाही अतिरेक झाला आहे. चित्रपटातील कथानायकाची गाडी निर्णायक टप्प्यावर आणून सुरत-गुवाहाटी ते मुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास तिसऱ्या भागासाठी ठेवला असल्याची जाणीवही जाता जाता करून देण्यात आली आहे. तोवर प्रत्यक्षात घडणारे सत्तानाट्य यापेक्षा रंजक ठरते की काय ही उत्सुकता आहेच.

धर्मवीर २

दिग्दर्शक – प्रवीण तरडे. कलाकार – प्रसाद ओक, क्षितीश दाते, अभिजीत खांडकेकर, विजय चव्हाण, सुनील तावडे, आनंद इंगळे, स्नेहल तरडे, मकरंद पाध्ये, हृषीकेश जोशी, उदय सबनीस.