महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी सुरु आहेत. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत ३० पेक्षा जास्त आमदार असून ते सध्या आसाम राज्यातील गुवाहाटी येथे आहेत. राजकीय विश्वात अनेक आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु आहे. राजकारणाबाबत अनेकजण विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. अशामध्येच कलाविश्वातील काही मंडळींनी आपलं मत मांडलं आहे. आता ‘धर्मवीर’ चित्रपटात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता क्षितीश दाते याने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे संताप व्यक्त केला आहे.
आणखी वाचा – Photos : मालदीवमध्ये पोहोचल्या ‘आई कुठे काय करते’मधील कांचन आजी, नवऱ्यासोबत शेअर केले फोटो
क्षितीश दाते नेमकं काय म्हणाला?
अभिनेता क्षितीश दातेने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे. क्षितीशने एका वृत्तपत्राच्या कात्रणाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये क्षितीक्षचा ‘धर्मवीर’मधील लूक पाहायला मिळत आहे. तसेच ‘थोडे दिवस मलाच एकनाथ समजून बैठकीत घ्या’ असं या फोटोबरोबर लिहिलेलं दिसत आहे.
हा फोटो शेअर करत क्षितीशने म्हटलं आहे की, “मोठी राजकीय उलाढाल चालू आहे. चेष्टेमध्ये मीम्स येणं वेगळं आणि वर्तमानपत्रात छापणं हे वेगळं. हे असं छापणं चूक आहे.” एका वर्तमानपत्रामध्ये मीम्स छापून आल्याने क्षितीशने सोशल मीडियाद्वारे संताप व्यक्त केला आहे. ‘धर्मवीर’ चित्रपटात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची भूमिका क्षितिशने उत्तमरित्या साकारली.
या चित्रपटामुळे त्याला एक वेगळीच ओळख मिळाली आहे. क्षितीशने मराठी नाटक, चित्रपटांमध्ये आजपर्यंत उत्तम काम केलं. ‘धर्मवीर’ चित्रपटामधील भूमिकेमुळे त्याचं विशेष कौतुक झालं. महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींबाबत हेमंत ढोमे, आरोह वेलणकर, ऋषिकेश जोशी सारख्या कलाकारांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.