ठाण्यात शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास लवकरच प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाचे अनेक पोस्टर, टिझर याची जोरदार चर्चा सुरु आहे. नुकतंच ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
प्रसाद ओकने नुकतंच इन्स्टाग्रामवर या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्याची माहिती दिली आहे. “घेऊन येत आहोत अशा लोककारणी व्यक्तिमत्त्वाची कथा, ज्याच्यासाठी ‘माणूस जपणं हाच श्रेष्ठ धर्म होता’! येत आहे एका धगधगत्या अग्निकुंडाची चरित्रागाथा, ‘धर्मवीर, मुक्काम पोष्ट ठाणे’ मोठ्या पडद्यावर 13 मे 2022 पासून.” असे प्रसाद ओकने पोस्ट शेअर करताना म्हटले आहे.
फ्लॉप होण्याची भीती की स्टारडमवर परिणाम? ‘या’ कारणामुळे महेश बाबू करत नाही बॉलिवूडमध्ये पदार्पण
‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’या ट्रेलरची सुरुवात संस्कृतच्या एका वाक्याने होते. त्यानंतर आनंद दिघेंच्या रुपात असलेला प्रसाद ओक दिसत आहे. यात ठाण्यामध्ये शिवसेनेचं स्थान बळकट करण्यापासून ते कट्टर शिवसैनिकाची भूमिका आनंद दिघेंनी कशी साकारली याबाबतचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे कोणतेही पद नसतानाही आनंद दिघे यांनी ठाण्यात शिवसेनेचे स्थान कसे बळकट केले, याबद्दलही यात दाखवलं आहे.
या चित्रपटाच्या ट्रेलरला ३ तासात १३ लाख व्ह्यूज मिळाल्याची माहिती प्रसाद ओकने दिली आहे. विशेष म्हणजे याबाबत त्याने एक पोस्टही शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.
दरम्यान ‘धर्मवीर’ या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघेंची भूमिका साकारली आहे. ठाण्यामध्ये शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून आनंद दिघेंची ओळख होती. या चित्रपटाच्या माध्यमातून आनंद दिघे यांच्या व्यक्तीमत्वामधील एक सामान्य व्यक्ती, शिवसेना कार्यकर्ता ते ठाण्यातील शिवसेनेचा सर्वात प्रमुख नेता असा प्रवास उलगडणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केलं आहे. तर मंगेश देसाई यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. येत्या १३ मे रोजी ‘धर्मवीर मु. पो. ठाणे’ हा चित्रपट झी स्टुडिओजच्या माध्यमातून महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.