‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या निमित्ताने धर्मवीर आनंद दिघे यांच्या अनेक आठवणींना उजाळा मिळत आहे. काल १३ मे रोजी ‘धर्मवीर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटात धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारीत आहे. महाराष्ट्र भाजपाचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आनंद दिघे यांचं कुटूंब राजकारणात सक्रिय नाही असे म्हटले आहे. त्यांची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली असून चर्चेचा विषय ठरला आहे.
निलेश राणे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. “बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री, ‘शिष्य’ एकनाथ शिंदें कॅबिनेट मंत्री, मुलगा खासदार, स्व. आनंद दिघे साहेबांच्या घरात साधा नगरसेवक, शाखाप्रमुख नाही पण निवडणूक आली की दिघे साहेब. आज दिघे साहेबांवर आधारित धर्मवीर नावाचा चित्रपट रिलीज झाला पण त्यांच्या कुटुंबाचे कुठेच नाव नाही”, असे ट्वीट निलेश राणे यांनी केले होते.
आणखी वाचा : ‘ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे’ अशी ओळख असणाऱ्या आनंद दिघेंबद्दलच्या या गोष्टी माहित आहे का?
काल या चित्रपटाचा खास शो ठाण्यातील व्हिवियाना मॉल येथील सिनेपोलिस मल्टिप्लेक्समध्ये पार पडला. यावेळी उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचे ढोल आणि लेझीम पथकाच्या तालास्वरात, मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्या कटआउटसमोर विधिवत पूजा करित दुग्धाभिषेक करण्यात आला.