बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र चित्रपटसृष्टीपासून लांब असले, तरी ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. धर्मेंद्र हे सोशल मीडियावर फारच सक्रिय असून ते नेहमी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. धर्मेंद्र हे नेहमी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना काही जुने फोटो पोस्ट करत असतात. नुकतंच त्यांनी त्यांच्या पहिल्या गाडीसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्यांनी ही गाडी किती रुपयांना खरेदी केली? याबाबत सांगितले आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
धर्मेंद्र यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्यांनी त्याच्या पहिल्या गाडीबद्दलचे काही किस्से सांगितले आहेत. धर्मेंद्र यांनी १९६० मध्ये पहिली फिएट कार खरेदी केली होती. ही गाडी त्यांनी त्यावेळी १८ हजार रुपयांना खरेदी केली होती. “मित्रांनो ही फिएट गाडी माझ्या आयुष्यातील पहिली गाडी आहे. ही गाडी माझ्या हृदयाच्या अगदी जवळ आहे. एका संघर्षशील तरुणासाठी हे आशीर्वाद आहेत,” असे धर्मेंद्र यांनी या गाडीबद्दल म्हटले.
धर्मेंद्र हे त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात शूटींगसाठी सायकलने ये-जा करायचे. मात्र जेव्हा ते एक प्रसिद्ध कलाकार बनले तेव्हा त्यांच्या अनेक मित्रांनी त्यांना गाडी घेण्याचा सल्ला दिला. यानंतर त्यांनी ही फिएट गाडी खरेदी केली.
धर्मेंद्र यांनी १९६० मध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र ही जोडी ७० च्या दशकातील सुपरहिट जोडी म्हणून ओळखली जाते. आजवर त्यांनी अनेक लोकप्रिय आणि गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यात ‘शोले’, ‘सीता और गीता’, ‘दिल्लगी’ आणि ‘ड्रिम गर्ल’ अशा काही चित्रपटांचा समावेश आहे.