निवडणूक प्रचारासाठी घरच्यांकडून सहाय्य होत नसल्याच्या वृत्ताने मथुरा येथून लोकसभा निवडणूक लढवत असलेली बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि भाजपची उमेद्वार हेमा मालिनी खूप निराश झाली आहे. असे कोण म्हणते आहे हे जाणून घेण्याचा पवित्रा घेत हेमा मालिनी म्हणाली, मागील आठवड्यात माझी लहान मुलगी अहाना येथे आली होती आणि माझी मोठी मुलगी इशा या आठवड्यात येणार आहे. काही दिवसांत धर्मेन्द्रसुद्धा येणार आहेत. जेव्हा शेवटच्या टप्प्यात निवडणुकीचे वातावरण तापेल तेव्हा माझ्या प्रचारासाठी येण्याचे मी घरच्यांना सांगितले होते, एव्हढेच. त्यांना लवकर बोलवण्यात काही अर्थ नव्हता. हेमा मालिनीचे कुटुंबीय तिच्या निवडणूक प्रचारात सहभागी होत नसल्याचे वृत्त काही माध्यमांतून प्रसिद्ध झाल्याने संतप्त झालेली हेमा म्हणाली, काही लोक असे वृत्त का पसरवत आहेत, हे मला कळत नाही. माझे पती, मुली आणि त्यांचे नवरे कुटुंबातील सर्व सदस्यांनी माझा निवडणूक प्रचार करण्यासाठी मथुरात येण्याची तयारी दर्शविली आहे. स्थानिक माध्यमे माझ्या कुटुंबातील सर्वांना ओळखत नाहीत, याचा अर्थ असा नव्हे की माझे कुटुंबीय मला प्रचारात सहाय्य करीत नाहीत.

Story img Loader