गेल्या काही वर्षांत आपल्याकडे सण आणि उत्सवांतील उन्माद दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. मग ती दहीहंडी असो, गणेशोत्सव असो, नवरात्र असो, धुळवड असो किंवा आणखीन काही. हा करतो म्हणून मग तोही करतो.. अशा ईष्र्येतून आता सर्वधर्मीय आपापले सण व उत्सव रस्त्यावर येऊन साजरे करू लागले आहेत. त्यातही एकमेकांशी चढाओढ करत सगळे नियम धाब्यावर बसवून, या सण-उत्सवांतील पारंपरिकतेला फाटा देत जो-तो त्याचा ‘इव्हेन्ट’ करण्याच्या मागे लागलेला आहे. त्यासाठी सर्वसामान्यांना वेठीस धरण्यापर्यंत त्यांची मजल गेलेली आहे. ध्वनी, वायू तसंच जलप्रदूषण, एखाद्याचा हकनाक जीव गमावण्याची शक्यता, उत्सव ‘साजरा’ करण्याच्या नादात सर्वसामान्यांना त्यातून होणारा शारीरिक-मानसिक-आरोग्याचा त्रास या कशा-कशाचाही विचार न करता हे सण साजरे करणं सुरू असतं. हल्ली काही सुजाण मंडळी याविरोधात न्यायालयात दाद मागू लागली आहेत. परंतु न्यायालयांनी त्यांच्या बाजूने निर्णय देऊनसुद्धा सरकार आणि पोलीसही न्यायालयाच्या या निर्णयांचा आदर न करता मूठभरांच्या झुंडशाहीपुढे वाकताना दिसतात. सगळेच राजकीय पक्ष या गुंडपुंडांचं समर्थन करताना दिसतात. खरं तर सणांचं हे ‘इव्हेन्टी’करण करण्यात त्यांचाच बहुतेक वेळा पुढाकार असतो. स्वाभाविकपणेच ते समाजहिताची कसलीही चाड न बाळगता असे ‘इव्हेन्ट’ साजरे करत असतात. सत्तेत असलेला पक्षही आपली तथाकथित मतपेढी सांभाळण्यासाठी या भीषण ‘इव्हेन्ट्स’ना संरक्षक कवच बहाल करत असतो. आता तर काय, हिंदुत्ववादाचा उघड पुरस्कार करणारेच सत्तेत असल्याने असल्या वेडाचारांस ऊत आला तर त्यात नवल ते काय? तर ते असो.

भद्रकाली प्रॉडक्शन्सची निर्मित असलेलं, चं. प्र. देशपांडे लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित ‘ढोलताशे’ हे अलीकडेच रंगमंचावर आलेलं नाटक याच उन्मादी उत्सवी मानसिकतेची खरपूस खिल्ली उडवतं. जरी यात पुण्यातील गणेशोत्सव मिरवणुकीचं उदाहरण वानगीदाखल घेतलेलं असलं तरी ते गणेशोत्सवापुरतं नक्कीच सीमित नाहीए. अशा प्रकारच्या सर्वच सण-उत्सवांच्या ‘साजरीकरणा’ला ते चपखल लागू आहे. ‘ढोलताशे’मध्ये उत्सव मिरवणुकीतील भयंकर उन्माद आणि त्यात वाहून जाण्यास नकार देऊ इच्छिणाऱ्या अक्षयचा प्रवाहपतितांशी होणारा अटीतटीचा संघर्ष चं. प्रं.नी चित्रित केला आहे. हे करीत असतानाच नाटकाला जीवनविषयक तत्त्वचिंतनाची जोड द्यायलाही ते विसरलेले नाहीत. सुख ओरबाडण्यातलं हपापलेपण, वखवख, बहुसंख्यांची मेंढरी वृत्ती, कुठल्याही गोष्टीचा सर्वगामी विचार करून कृती करण्याची नसलेली समाजातील बहुसंख्यांची मानसिकता या सगळ्याचा ऊहापोहही यानिमित्तानं लेखकानं केलेला आहे.

Grandmother dances on pushpa 2 peelings song video viral on social media
काय भारी नाचलीय! ‘पुष्पा-२’ चित्रपटातील गाण्यावर थिरकली आजी, VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
students performance on Gadi Wala Aaya Ghar Se Kachra Nikal song
मोठ्यांना जमले नाही ते चिमुकल्यांनी करून दाखवले! ‘या’ गाण्यावर आतापर्यंत केलेला बेस्ट डान्स; Viral Video पाहून कौतुकाने वाजवाल टाळ्या
Inquiry into cases in Beed Parbhani through retired judges Nagpur news
बीड, परभणीतील प्रकरणांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
Old Women Play Drum Sets With Wearing Sarees In Thane video goes viral on social media
“काकूंना लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळाले” ठाण्यात महिलांनी साडीमध्ये वाजवला रॉक बँड; VIDEO पाहून नेटकरीही थक्क
Girl Viral Video
‘पुष्पा २’ मधील ‘किसीक’ गाणं लागताच ती बेभान होऊन नाचली… VIDEO होतोय तुफान व्हायरल
A brutal attack by a crocodile on a buffalo
‘शेवटी जे घडायचं ते घडलंच…’ पाणी पिण्यासाठी आलेल्या म्हशीवर मगरीचा क्रूर हल्ला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO
Kids riding bicycle with different method viral video on social media
अशी सायकल तुम्ही कधीच चालवली नसेल! दोघं एकत्र पेडलवर उभे राहिले अन्…, चिमुकल्यांचा ‘हा’ VIDEO एकदा पाहाच

अक्षयनं गणेशोत्सवातील उन्माद, ध्वनी तसंच वायुप्रदूषण यांपासून स्वत:ला आणि आपल्या कुटुंबाला दूर ठेवण्यासाठी पुण्यात ऐन लक्ष्मीरोडवर घर असूनही एका वर्षी गणेशोत्सव मिरवणूक न पाहण्याचा निर्णय घेतलेला असतो. आपल्या घरातून इतरही कुणाला मिरवणूक पाहू न देण्याचा त्याचा निर्धार असतो. त्याच्या बायकोला- अवंतीला त्याचा हा निर्णय पसंत नसतो. कारण यानिमित्तानं त्यांच्याकडे येऊ इच्छिणारे पै-पाहुणे आणि मित्रमंडळी दुखावणार असतात. एक दिवसाचा हा त्रास सहन करणं त्यापेक्षा कितीतरी बरं, असं तिचं म्हणणं असतं. परंतु अक्षय आपल्या निर्णयावर ठाम असतो. आपण हा मिरवणूक पाहण्यास बंदीचा घेतलेला निर्णय एक वर्षांआड राबवू, असं तो अवंतीला सांगतो. मनाला न पटणाऱ्या, वैचारिक, नैतिक, शारीरिक व मानसिकदृष्टय़ा अनिष्ट असणाऱ्या गोष्टींना नकार देण्याचा आपला हा ‘प्रयोग’ असल्याचं त्याचं म्हणणं असतं. परंतु बहुसंख्य समाजाला ज्या गोष्टी खटकत नाहीत, उलट समाज त्यात उत्साहानं सामील होतो, त्या अनुचित कशा, असा अवंतीचा त्यावर सवाल असतो. अक्षयचं म्हणणं : ‘बहुसंख्य लोक करतात ती प्रत्येक गोष्ट बरोबरच असते असं नाही.’ तर्काच्या कसोटीवर घासूनपुसून घेऊन, तसंच तिच्या इष्टानिष्टतेचा सर्वागीण विचार करून मगच प्रत्येक गोष्ट स्वीकारायला वा नाकारायला हवी असा त्याचा आग्रह असतो. या निकषांवर उन्मादी उत्सवांना मूक वा सक्रीय संमती देणं त्याला मान्य नसतं.

अक्षय व अवंतीनं आपल्या मित्रमंडळींना आपला हा निर्णय सांगून मिरवणूक पाहायला येण्यापासून रोखलं असलं तरी अक्षयची सोलापूरची काकू आणि तिचा मुलगा समीर बायको-मुलासह पुण्यातली गणेशोत्सव मिरवणूक पाहायला अचानक त्यांच्याकडे येऊन थडकतात. परंतु तरीही अक्षय आपल्या निर्णयापासून ढळत नाही. तो सरळ सांगतो- ‘तुम्हाला मिरवणूक पाहायची असेल तर बाहेर जाऊन पाहा. इथून घराच्या गॅलरीतून ती पाहता येणार नाही.’ त्याच्या या भलत्या हेकेखोरपणाने ते चकित होतात. प्रारंभी त्याला ते पटवू पाहतात. पण तो बिलकूलच बधत नाही म्हटल्यावर शेवटी काकूंचं वय आणि त्यांना असलेली सांधेदुखी बघता किमान तिला तरी गॅलरीतून मिरवणूक पाहू द्यावी, या तडजोडीपर्यंत ते खाली येतात. परंतु अक्षय त्यासही ठाम नकार देतो. शेजारचे बळवंतराव आपल्या घरात मिरवणूक पाहणाऱ्यांची प्रचंड गर्दी झाल्याने अक्षयच्या घरी विश्रामासाठी येतात. त्यांनाही मध्यस्थ करून बघितलं जातं. पण अक्षय काही केल्या आपल्या निर्णयापासून हटत नाही. अखेरीस किमान आपल्याला तरी मिरवणूक पाहायला मिळावी म्हणून समीर-अश्विनी बाळाला अवंतीच्या स्वाधीन करून मिरवणूक पाहायला जातात. पण काकूंचं काय? त्या मिरवणूक बघण्यासाठी तळमळत राहतात. आधी भावनिक आणि नंतर धार्मिकतेची ढाल पुढे करूनही तो बधत नाही म्हटल्यावर नाना प्रकारे सगळ्यांकडून त्याच्यावर दबाव आणायचा प्रयत्न होतो. पण व्यर्थ! साप्ताहिक ‘भुक्कड’चे संपादक काकासाहेब जोशी आणि सो-कॉल्ड हिंदुत्ववादी विद्वान घारपुरे यांच्याकरवीही अक्षयला वैचारिकदृष्टय़ा चीतपट करण्याचा प्रयत्न होतो. अगदी त्याच्या कॉफीत झोपेची गोळी घालण्यापासून ऑफिसातले त्याच्या बॉसकडून त्याची कानउघाडणी करण्याचे पर्यायही चोखाळले जातात. सरतेशेवटी तर काकूंना असलेल्या हृदयविकाराचाही दबाव त्याच्यावर आणला जातो. पण अक्षयला पाझर फुटत नाही तो नाहीच! धार्मिक, भावनिक, वैचारिक अशा कुठल्याच दडपणाला तो बळी पडत नाही म्हटल्यावर काकू हिस्टेरिक होऊन दरवाजे-खिडक्या उघडायला अक्षयला भाग पाडतात. बहुसंख्यांच्या या ‘हिस्टेरिक’तेपुढे विचारांची लढाई लढणारा अक्षय पराभूत होतो खरा; परंतु तरीही त्यानं दिलेला लढा महत्त्वाचा असतो. ही लढाई  आपण कधी ना कधी जिंकूच, हा त्याचा विश्वास पराभवातही अबाधित राहतो. कारण रडणाऱ्या बाळाच्या डोक्याला घट्ट बांधलेली गणेशाच्या जयजयकाराची पट्टी सैल केल्यावर ते रडण्याचं थांबतं.. अक्षयच्या वैचारिक लढय़ाचा विजय निश्चित असल्याचीच ते द्योतक असतं.

नाटककार चं. प्र. देशपांडे यांनी त्यांच्या नेहमीच्या रीतीनुसार एक मध्यवर्ती सूत्र घेऊन हे चिकित्सक चर्चानाटय़ रंगवलं आहे. त्यात मनुष्याच्या वृत्ती-प्रवृत्तींचे रंग मिसळत ते मनोरंजक शर्करावगुंठित स्वरूपात पेश केलं आहे. प्रवाहपतित समाज, दांभिक विद्वानांचं पोकळ रूपडं, झुंडशाहीची मानसिकता, समाजातील प्रचलित रूढी-परंपरांना नसलेलं तार्किकतेचं, विवेकाचं अधिष्ठान, सण व उत्सव ‘साजरीकरणा’त शिरलेली विकृती, या विकृतीच्या दृष्परिणामांबाबतची बहुसंख्यांची अनभिज्ञता, किंवा ज्यांना ते कळतं त्यांच्यात याला विरोध करण्याचं नसलेलं धारिष्टय़ अशा अनेक अंगांनी चं. प्र. देशपांडे या विषयाला भिडले आहेत. एकीकडे ‘ढोलताशे’चं वैचारिक चर्चानाटय़ हे स्वरूप कायम राखत असताना त्यांनी ते क्लिष्ट वा बोजड होऊ न देता सर्वसामान्यांनाही विचारांस प्रवृत्त करेल याची दक्षता घेतली आहे. त्यासाठी संतांचे चपखल दाखलेही त्यांनी नाटकात योजले आहेत.

दिग्दर्शक विजय केंकरे यांनी नाटकातल्या ‘बिटविन द लाइन्स’ गोष्टी अतिशय सूक्ष्मरीत्या प्रयोगात आणल्या आहेत. मग त्या पात्रांच्या देहबोलीतून असतील, संवादोच्चारांतून असतील, किंवा नि:शब्दतेतून, विरामांच्या जागांतून असतील. पात्रांच्या केवळ लूक्समधूनही त्यांनी अनेकदा आशय टोकदार केला आहे. मर्यादित षटकांच्या मॅचमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये अटीतटीच्या रंगतीत खेळाडूंसह प्रेक्षकही जसे चेंडूगणिक श्वास रोखून देहभान विसरून सामील झालेले असतात, तसं हे नाटक उत्कर्षबिंदूप्रत येत असता त्यांनी हा संघर्ष कमालीचा तीव्र केला आहे. एकेका वाक्यानंतर उमटणारी वा न उमटणारी अपेक्षित प्रतिक्रिया त्यांनी विरामांतून अधोरेखित केली आहे. त्यातून नाटक चरमसीमा गाठतं. अक्षयच्या शेवटच्या एका नि:शब्द कृतीनं नाटकाचा हेतूही सफल होतो. पात्रांना त्यांचे व्यवहार व हालचाली देत असताना विजय केंकरे यांनी सखोल विचार केल्याचं सतत जाणवतं. राहुल रानडे यांनी गणेशोत्सवातील बीभत्स धांगडधिंगा प्रक्षेपित करणाऱ्या पाश्र्वसंगीतातून विकृत उन्मादी वातावरणनिर्मिती केली आहे. नेपथ्यकार राजन भिसे यांनी पुण्यातलं लक्ष्मी रोडवरचं वाडा-संस्कृतीतलं घर वास्तवदर्शी उभे केलं आहे. वेशभूषेतून प्रत्येक पात्राची ‘आयडेंटिटी’ त्यांनी समूर्त केली आहे. शीतल तळपदे यांनी प्रकाशयोजनेतून गणेशोत्सवातील प्रकाश प्रदूषण चोख दाखवलं आहे. सचिन वारिक आणि चंदर पाटील यांनी समीर, सा. ‘भुक्कड’चे संपादक काकासाहेब जोशी आणि हिंदुत्ववादी घारपुरे या पात्रांना रंगभूषेतून विशिष्ट व्यक्तित्व प्रदान केलं आहे.

ललित प्रभाकर यांनी विवेकवादी विचारांचं अधिष्ठान मानणारा अक्षय कुठल्याही आक्रस्ताळेपणाशिवाय ठाशीवपणे उभा केला आहे. बहुसंख्यांच्या भावनिक, मानसिक दडपणांना भीक न घालता विचारांचा विचाराने सामना करण्याची आपली भूमिका समोरच्याच्या गळी उतरवण्यातली त्याची शांत रीत दाद देण्याजोगी. अवंतीची तळ्यात-मळ्यात अवस्था क्षिती जोग यांनी देहबोली आणि नेत्राभिनयातून छान अभिव्यक्त केली आहे. काकूंचा मिरवणूक पाहण्याचं हपापलेपण आणि ते पूर्ण न होण्यातून निर्माण झालेला त्रागा, उद्विग्नता उज्ज्वला जोग यांनी नेमकेपणी व्यक्त केली आहे. राजन भिसे यांनी प्रवाहपतित, हतबल बळवंतराव या भूमिकेततल्या खाचाखोचांसह उत्तम साकारले आहेत. विजय केंकरे यांच्या संपादक काकासाहेब जोशींपेक्षा पोकळ हिंदुत्ववादी घारपुरे अधिक लक्षवेधी झाले आहेत. अभिजीत गुरूंनी ‘समंजस मुलगा’ या आपणच निर्माण केलेल्या इमेजचा बळी ठरलेला समीर व उत्तरार्धातील त्याचा उद्रेक अतिशयोक्तीच्या आधारे चोख दाखवला आहे. अमृता संत यांनी सरडय़ासारखे परिस्थितीनुरुप रंग बदलणारी अश्विनी मुद्राभिनय आणि सततच्या धांदल-धावपळीतून यथार्थ उभी केली आहे.

आजच्या सण-उत्सवांच्या विकृत, उन्मादी साजरीकरणाच्या बोकाळलेल्या प्रवृत्तीची रंजक पद्धतीनं खिल्ली उडवीत त्यावर काहीएक ठाम भाष्य करणारं ‘ढोलताशे’ हे नाटक प्रत्येकानं एकदा तरी पाहायलाच हवं.

Story img Loader