सिनेमा, सौजन्य –
यशराज फिल्म्स बॅनरचा सगळ्यात महागडा चित्रपट ‘धूम थ्री’ २० डिसेंबर रोजी प्रदर्शित होतोय. या ‘धूम’मध्ये आमिर असल्यामुळे सिनेमाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.यशराज फिल्म्स बॅनरचे चित्रपट म्हणजे सुनियोजित फिल्ममेकिंग, भव्य सेट्स, परदेशी चित्रीकरण स्थळे, निसर्गरम्य परदेशी चित्रण आणि बडय़ा कलावंतांचा सहभाग हे समीकरणच झाले आहे. प्रचंड पैसा खर्च करून अस्सल, व्यावसायिक परंतु सर्व प्रेक्षकांना कोणता ना कोणता मुद्दा सिनेमातील आवडावा अशा पद्धतीने रचना असलेले चित्रपट यशराज फिल्म्स बॅनरने आतापर्यंत केले आहेत.सेट डिझाइन्स, रंगसंगती, चित्रीकरण स्थळे या सगळ्यामध्ये भव्यता असणे हे वैशिष्टय़ नेहमी जपले आहे. अनेक यशस्वी चित्रपट करूनही त्या चित्रपटांचे सीक्वेल यशराजने केले नाहीत. परंतु, धूम २००४ साली आलेल्या चित्रपटाच्या यशानंतर फक्त याच चित्रपटाचा दुसरा भाग आणि या भागाच्या यशानंतर आता तिसरा भाग असे सीक्वेल केले आहेत हेही एक वैशिष्टय़ म्हणता येईल.
धाडसी आणि साहसी चातुर्याने निरनिराळ्या आधुनिक क्लृप्ती लढवून मूळ चित्रपटात बँका लुटणारा चोर, त्याच्या मागावर असलेला पोलीस आणि चोराचा नायनाट करण्यासाठी एका चोराचीच मदत पोलीस घेतो अशी गोष्ट. हीच गोष्ट धूम आणि धूम २ या दोन्ही चित्रपटांत होती. त्यात वेगवेगळ्या पद्धतीचे हॉलीवूडपटांप्रमाणे घटनाक्रम पेरून साहसी अ‍ॅक्शनपट बनविण्यात आले आणि अर्थातच ते त्वरित सुपरहिट झाले इतकेच नव्हे तर ब्लॉकबस्टर ठरले.
यातील एसीपी जय दीक्षित आणि अली अकबर खान हा चोर या भूमिका पहिल्या दोन चित्रपटांप्रमाणे ‘धूम थ्री’मध्येही कायम ठेवण्यात आल्या आहेत. मात्र प्रमुख चोर जो चित्रपटाचा ‘अ‍ॅण्टी हिरो’ आहे ती व्यक्तिरेखा प्रत्येक चित्रपटात नावासह आणि कलावंतासह बदलत गेली आहे. ‘धूम’मध्ये कबीर ही अ‍ॅण्टी हिरोची व्यक्तिरेखा जॉन अब्राहमने साकारली होती. स्टंट बायकिंगचा नाद असलेला आणि त्याचाच चोरीसाठी खुबीने वापर करणारा कबीर दाखविण्यात आला होता. ‘धूम २’मध्ये अ‍ॅण्टी हिरोची प्रमुख भूमिका हृतिक रोशनने साकारली होती. मौल्यवान आणि प्राचीन अशा वस्तू ज्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अतिशय मोठी किंमत मिळते अशा वस्तूंची लीलया चोरी करणारा चोर हृतिकने साकारला होता. ‘मिस्टर ए’ एवढेच त्याच्या व्यक्तिरेखेचे नाव होते. आता ‘धूम थ्री’मध्ये ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खानने अ‍ॅण्टी हिरो साकारला आहे. आमिर खान प्रमुख भूमिका साकारणार असल्यामुळे हा चित्रपट कायमच चर्चेत राहिला.
जय दीक्षित ही व्यक्तिरेखा तिन्ही चित्रपटांमध्ये अभिषेक बच्चननेच साकारली असून अली अकबर खान ही व्यक्तिरेखाही तिन्ही चित्रपटांत उदय चोप्रानेच साकारली आहे. परंतु, आमिर खानला घेतल्यामुळे पहिल्या दोन चित्रपटांप्रमाणेच ‘धूम थ्री’चेही ग्लॅमर प्रचंड वाढले. नायक नव्हे खरे तर खलनायककेंद्री चित्रपट असल्यामुळे मूळ चित्रपटाप्रमाणेच त्याच्या दोन सीक्वेलपटांत नायकाची प्रेयसी आणि खलनायकाची प्रेयसी या व्यक्तिरेखांना खूप नसले तरी बऱ्यापैकी महत्त्व देण्यात आले आहे. विशेषत: ‘बॉस’ सांगेल तसे वागणे, अ‍ॅण्टी हिरोला साथ देणे आणि चोरी यशस्वी करून दाखविणे, प्रसंगी पोलीस जय दीक्षित आणि त्याचा सहकारी अली अकबर खानची फसवणूक करण्यासाठी क्लृप्ती लढविणे यांसारखे काम असलेल्या भूमिका ठेवण्यात आल्याने स्त्री व्यक्तिरेखांनाही चांगल्या प्रकारे वाव देण्याचा प्रयत्न तिन्ही चित्रपटांत लेखक-दिग्दर्शक-निर्मात्यांनी केला आहे.
‘धूम’मध्ये मुंबई, ‘धूम २’मध्ये मुंबई आणि ब्राझीलची राजधानी रिओ दी जानेरो तर ‘धूम थ्री’मध्ये झुरिच, शिकागो, स्वित्झर्लण्डमधील टिसीनो इत्यादी देशांमध्ये चित्रीकरण करण्यात आले आहे.
‘धूम’ आणि ‘धूम २’ हे दोन्ही चित्रपट संजय गधावी यांनी दिग्दर्शित केले असले तरी पटकथा-संवाद लेखन विजय कृष्ण आचार्य यांचे होते. म्हणूनच की काय, दोन चित्रपटांच्या भरघोस यशानंतर निर्माता आदित्य चोप्राने ‘धूम थ्री’च्या लेखनाबरोबरच दिग्दर्शनासाठीही विजय कृष्ण आचार्य यांना विचारणा केली असावी. पटकथा-संवादांच्या यशामुळे दिग्दर्शनही लेखकाकडेच दिले तर तो चित्रपटाला अधिक न्याय देऊ शकतो या सरळसाध्या विचारासह पहिल्या दोन चित्रपटांचे यश पटकथा-संवादामध्ये आणि प्रसंगांच्या अचूक लिखाण व मांडणीमुळे मिळाले आहे, तर दिग्दर्शनही लेखकाकडेच दिले तर ‘धूम थ्री’ अधिक रंगतदार, व्यावसायिकदृष्टय़ा अतियशस्वी ठरू शकेल हा तद्दन धंदेवाईक विचारही निर्मात्याने केला नसेल तरच नवल.
धूम चित्रपट मालिकेत आतापर्यंत सौंदर्यवती ऐश्वर्या राय, बिपाशा बासू, ईशा देओल, रिमी सेन अशा अभिनेत्रींनी काम केले आहे. या वेळच्या सीक्वेलमध्ये कतरिना कैफने आलिया ही व्यक्तिरेखा साकारली असून आमिर खानच्या प्रेयसीची भूमिका केली आहे.
‘धूम थ्री’ची वैशिष्टय़े खूप आहेत. आमिर खानसारखा बडा कलावंत  खूप दिवसांनी हॉलीवूड पद्धतीची मांडणी असलेल्या चित्रपटातून अ‍ॅण्टी हिरो म्हणून दिसणार आहे. त्याचबरोबर तो एक जिमनॅस्टची भूमिका साकारतोय. जिम्नॅस्टिक्सची वेगवेगळी प्रात्यक्षिके दाखविण्यासाठी आमिरने खूप प्रशिक्षण घेतले आहे. त्याचबरोबर अनेक स्टंट्ससाठी त्याला मेहनत घ्यावी लागली आहे.
‘धूम थ्री’ची खूप वैशिष्टय़े आहेत. ‘लार्जर दॅन लाईफ’ चित्रपट आपण खूप दिवसांनी करतोय असे स्वत: आमिरनेच म्हटले आहे. एवढेच नव्हे तर आपल्या कारकिर्दीतील साहीर ही भूमिका साकारणे सगळ्यात मोठे आव्हान होते असेही त्याने नमूद केले आहे. ‘धूम थ्री’मधील साहीर ही अ‍ॅण्टी हिरोची प्रमुख व्यक्तिरेखा साकारण्यासाठी तसेच यातील अनेक गाण्यांसाठी जिम्नॅस्टिक्सबरोबरच टॅप डान्स, बॅले नृत्य हे सगळे शिकलो आहे, असे आमिरने म्हटलेय. वेगाने बाईक चालविण्याबरोबरच एरोबटिक्स, अडथळ्यांची शर्यत शिताफीने पार करण्यासाठी पार्कर हे फ्रेंच तंत्रही आमिर व कतरिना दोघेही शिकले आहेत. पॅराग्लायडिंगचे प्रशिक्षणही कतरिनाने घेतले आहे.
विपणन, प्रसिद्धी आणि लोकांमध्ये चर्चा केली जाईल अशा पद्धतीची पोस्टर्स, फर्स्ट लूक असणे ही आजची गरज बनली आहे. अतिशय अफलातून ट्रेलर असेल तरच प्रेक्षक सहजपणे चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात जातात हा आजचा फंडा आहे. म्हणून  ‘धूम २’च्या नंतर लगेचच ‘धूम थ्री’ची घोषणा करण्यात आली. त्याचबरोबर गेल्या वर्षीच्या नाताळमध्येच ‘धूम थ्री’ बरोब्बर एक वर्षांनंतर नाताळ दरम्यान प्रदर्शित करण्याचे जाहीर करण्यात आले.  आमिर खानचा चित्रपटात प्रवेश झाल्यानंतर आता या चित्रपटाचे प्रमोशन कसे केले जाणार याचीही भरपूर चर्चा झाली. परंतु, अन्य सर्व चित्रपटांप्रमाणे टीव्हीवरील रिअ‍ॅलिटी शो, ठिकठिकाणच्या मॉल्समध्ये चित्रपटाच्या टीमने जाणे, देशभरातील अनेक शहरांत जाऊन प्रेक्षकांना भेटणे, टीव्हीवरील मुलाखतींवर भर देणे यासारखे प्रकार न करण्याचे स्वत: आमिर खाननेच ठरविले होते. त्यामुळे साहिर या त्याच्या व्यक्तिरेखेचा लूक असणारी हॅट घालून गेल्या काही दिवसांपासून तो फिरतोय. आमिर आणि सलमान मित्र असल्यामुळे गेल्या आठवडय़ात बिग बॉस या लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोमध्ये सलमानने ही हॅट वापरून अनोख्या पद्धतीने ‘धूम थ्री’चे प्रमोशन केले. भूमिका लार्जर दॅन लाईफ प्रकारातली असली तरी शेवटी साहीर हा अ‍ॅण्टी हिरो आहे आणि  म्हणूनच मोठय़ा प्रमाणात लोकांसमोर येण्याचे आमिरने टाळले आहे असे म्हणायला खूप जागा आहे. कारण लवकरच ‘सत्यमेव जयते’ या त्याच्या रिअ‍ॅलिटी शोचा सीक्वेल म्हणजेच दुसरे पर्व लोकांसमोर येणार आहे. त्यातील सामाजिक भान जपणारा, लोकांना तुम्हीसुद्धा माझ्यासारखे सामाजिक भान जपून देशांतील गरजू घटकांसाठी काही चांगले काम करा वगैरे सल्ला देताना धूम थ्रीमधील साहीरची प्रतिमा लोकांच्या डोक्यात फिट बसणे आमिरला धोक्याचे वाटत असावे. हेच एक प्रमुख कारण प्रमोशन न करण्यामागे असावे असे बोलले जाते. हॅट घालून मात्र आमिर बायको-मुलासह सर्व ठिकाणी जातोय.  
आपला फर्स्ट लूकमधील पाठमोरा फोटो, हॅटमधील लूक्स आणि चित्रपटाचा ट्रेलर, कतरिनावर चित्रीत झालेल्या गो कमली या गाण्याचे यूटय़ूबवरील प्रोमाज् आणि लोकांना चित्रपटाचा साचा पाठ झाल्यामुळे ट्रेलरद्वारे व तेवढेच प्रमोशन करणे रास्त ठरेल असे वाटले. म्हणूनच टीव्ही शो, मॉल्स वगैरे ठिकाणी भेटी देऊन लोकांमध्ये थेट जाऊन प्रमोशन न करण्याचे आपण ठरविले असे आमिर खानने म्हटले आहे.
या चित्रपटाचे सॅटेलाईट हक्क ७५ कोटी रुपयांना विकले गेले असून हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरावा यासाठी सर्वतोपरीने चित्रपटाच्या कलाकार निवडीपासून ते प्रदर्शनापर्यंत व्यवस्थित चर्चेत ठेवण्याचा प्रयत्न आदित्य चोप्रा यांनी केला आहे. सुरुवातीला हा चित्रपट थ्रीडी करण्याचा आदित्य चोप्रा यांचा मानस होता. परंतु, नंतर हा बेत रद्द करण्यात आला. त्यानंतर आयमॅक्स कॉपरेरेशनशी करार करून आयमॅक्स फॉरमॅट टेक्नोलॉजीमध्ये हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. अशा प्रकारे आयमॅक्स फॉरमॅटमध्ये प्रदर्शित होण्याचा पहिला मान ‘धूम थ्री’ने मिळविला आहे. भारतातील आयमॅक्स थिएटर्स आणि परदेशातील आयमॅक्स थिएटर्स अशा मोजक्याच ठिकाणी चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. डॉल्बी अ‍ॅटमॉस या ध्वनियंत्रणेतील नव्या तंत्रज्ञानाचा अंतर्भाव चित्रपटात करण्यात आला असून हिंदीबरोबरच तामिळ आणि तेलुगू ंमध्येही डब केलेली आवृत्ती प्रदर्शित केली जाणार आहे. आमिर खानचे दक्षिण भारतात खूप चाहते आहेत. म्हणूनच हा निर्णय घेण्यात आला आहे. फक्त ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर जाऊन आमिरने चित्रपटाचे प्रमोशन केले. १७ वेगवेगळ्या ब्रॅण्ड्सशी हातमिळवणी करून प्रसिद्धीची व्यवस्था करण्यात आली आहे. बीएमडब्ल्यू मोटररॅड या कंपनीशी करार केल्यामुळे एस-१०००आरआर आणि के-१३००आर या स्पोर्ट्स बाईक या चित्रपटात पाहायला मिळतील.

Story img Loader