एकटय़ा ‘धूम ३’ साठी १७ विविध वस्तूंच्या कंपन्यांशी करार
एक काळ असा होता की ज्या सुपरस्टारचा हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार असेल त्याची छायाचित्रे मिळवायची, फारतर त्या हिरोची केशरचना, त्याचे विशिष्ट कपडे, नायिकांच्या कपडय़ांचे पॅटर्न, साडय़ा अशा आणि एवढय़ाच गोष्टींच्या हुबेहुब नकला बाजारात लगेच पहायला मिळायच्या. मग राजेश खन्नाचा गुरूशर्ट असेल, अमिताभचे त्याच्या उंचीला अजिबात न शोभणारे दोन पॉकेटचे जॅकेट असेल नाहीतर सलमानची ‘मैने प्यार किया’मधली फ्रेंडची टोपी असेल अशा सगळ्या गोष्टी बाजारात विकण्याचा ‘ट्रेंड’ सुरु व्हायचा. पण, बॉलिवूडची मंडळी इतकी हुश्शार आहेत की त्यांनी या बाजारपेठेवरही आपला शिक्का मारून हुकूमत मिळवली आहे. त्यामुळे आपल्या चित्रपटातील वस्तू आपणच ब्रॅंडला विकायच्या आणि फिल्मी बाजार मांडून पैसे मिळवायचे हा नवा फंडा बॉलिवूडला प्रसिध्दी आणि कमाई देणारा ठरला आहे. एकटय़ा ‘धूम ३’ या चित्रपटासाठी १७ विविध कंपन्यांबरोबर मर्के डायझिंगसाठी करार करण्यात आला आहे. शाहरूखने रा. वन चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा अॅनिमेशन आणि ग्राफिकची करामत असलेल्या या देशी सुपरहिरोची निर्मिती करताना त्याचे कंबरडे मोडले होते. शिवाय, चित्रपट आपटला तर वसूली कशी करायची?, हाही मोठा प्रश्न होता. त्यावर हमखास उत्तर होते ते मर्केंडायझिंगचे. हॉलिवूडमध्ये सुपरहिरोपटातील अनेक गोष्टी ‘ब्रॅंडेड’ म्हणून विकल्या जातात. त्याच धर्तीवर शाहरूखने ‘रा. वन’साठी खास योजना केली. ‘रा. वन’वर आधारित कॉम्प्युटर गेम्स, ‘जी. वन’च्या प्रतिकृती, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स अशा अनेक गोष्टींचे मर्केडायझिंग करण्यात आले. शिवाय, शाहरूख ज्या उत्पादनांचे प्रतिनिधीत्व करतो त्यांचीही मदत झाली. त्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे केवळ या मर्केडायझिंगमधून ‘रा. वन’ने ५२ कोटींची कमाई केली आणि चित्रपटाला प्रसिध्दी मिळाली ती वेगळीच. शाहरूखचाच कित्ता गिरवत दिग्दर्शक राकेश रोशन यांनी क्रिश ३ चांगलीच फिल्डिंग लावली. म्हणजे, चित्रपटात खलनायकाच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरणारे पेनसारखे शस्त्र दाखवण्यासाठी फ्लेअर या ब्रॅंडची घसघशीत जाहिरात करण्यात आली आहे. ‘क्रिश’ हा एक विचार आहे असे सांगत तो लहान मुलांना हातावर बांधण्यासाठी देतो ते खास क्रिश बॅंड, क्रिशच्या प्रतिकृती, त्याचा मास्क अशा अनेक गोष्टी बाजारात आणल्या गेल्या. शिवाय, या देशी सुपरहिरोला लहान मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणखी एक पाऊल पुढे जात राकेश रोशन यांनी ‘टर्नर ब्रदर्स’ आणि ‘टुन्झ अॅनिमेशन’ कंपनीशी हातमिळवणी करून ‘क्रिश’च्या अॅनिमेटेड फिल्म्सही तयार केल्या.
फिल्मी बाजारासाठी मर्के डायझिंगचा हा हुकूमी एक्का आता यशराजनेही हातात घेतला असून धूम ३ साठी आमिर खानच्या टोपीपासून ते अगदी धूम चित्रपटातील दृश्यांवर आधारित ब्रॅंडेड चादरीही विकल्या जाणार आहेत. एकूण १७ विविध उत्पादने चित्रपटासाठी बाजारात आणली जाणार आहेत. यात पहिल्यांदाच एका बॉलिवूडपटासाठी विशेष टॅब्लेटची निर्मिती करण्यात आली आहे. ‘आयसीईएक्स इलेक्ट्रॉनिक्स’ कंपनीने हे धूम ब्रॅंडेड टॅब बाजारात आणले आहेत. याशिवाय, ‘मॅटल’ या हॉलिवुडपटांसाठी ब्रॅंडेड गोष्टी बनवणाऱ्या कंपनीने ‘धूम ३’साठी आमिरची टोपी, आमिर आणि कतरिनाच्या चित्रपटातील व्यक्तिरेखांवर आधारित बाहुल्या आणि आमिरच्या बाईकची प्रतिकृती अशा गोष्टी आणल्या आहेत. याशिवाय, आमिरने वापरलेले स्कार्फ, आमिरच्या बाईकसाठी वापरलेले इंजिन ऑईल, टायर्स, पत्ते, भेटकार्डे अशा कितीतरी गोष्टींची ‘धूम’ बाजारात आहे. फिल्मी बाजारातली ही ब्रॅंडेड घाऊक विक्री चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच निर्मात्याचा खर्च वसूल करत असल्याने हा ट्रेड चित्रपटागणिक वाढतच जाणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा