‘धूम ३’ चित्रपट ख्रिसमसपूर्वी प्रदर्शित होणार अशी अफवा होती. मात्र, यशराजचे विपणन उपाध्यक्ष रफिक गंगजी यांनी ‘धूम ३’ हा २५ डिसेंबरलाच प्रदर्शित होणार असे सांगितले आहे. आमिरचे याआधीचे चार चित्रपट २५ डिसेंबरला प्रदर्शित झाले आहेत. पण, यावेळेस आमिरच्या या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबतीत प्रश्न उभा राहिला होता. कतरिनाला झालेल्या दुखापतीमुळे चित्रिकरणाचे काम थांबले होते. त्याचप्रमाणे चित्रपटातील अभिनेते चित्रिकरणात विलंब करत आहेत, अशा अफवांनीही जोर धरला होता. पण, रफिक यांनी या सर्व अफवा खोटया ठरवत चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारीखेत कोणताच बदल न झाल्याचे जाहीर केले.
आमिर आणि कतरिनाचा यावर्षी कुठलाच चित्रपट प्रदर्शित होत नसून या दोघांच्या चाहत्यांसाठी ‘धूम ३’ हा ख्रिसमसची भेट असणार आहे. चित्रपटात ‘मिस्टर परफेक्टनिस्ट’ अमिर खानने एका भामट्याची भूमिका साकारली आहे. ‘धूम-३’ या अॅक्शन थ्रीलर चित्रपटात अभिनेता अभिषेक बच्चन आणि उदय चोप्रा ही असणार आहेत.