गेली ३० वर्षे गाणी लिहत असलेले गीतकार समीर अनजान हे ‘धूम ३’मधील ‘मलंग’ गाण्यामुळे वादाच्या भोव-यात सापडले आहेत. मदारिया सुफी समुदायाने आमिर खान, कतरिना कैफ, निर्माता यशराज फिल्म्स आणि गीतकार समीर अनजान यांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे. या गाण्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
‘नझर के सामने’ (आशिकी), ‘तुम पास आऐ’ (कुछ कुछ होता है) आणि ‘कभी कभी खुशी गम’ ही गाणी लिहणारे समीर यांना आपल्या ‘मलंग गाण्याचा अभिमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अशा प्रकारचे दावे आणि कायदेशीर समस्या समोर येणे, हा केवळ चित्रपट निर्मात्यांना त्रास देण्याचा एक मार्ग बनला आहे. ‘राम-लीला’च्या प्रदर्शनापूर्वीही अशाच समस्या समोर आल्या होत्या. ‘हाउसफूल २’ मधील ‘अनारकली डिस्को चली’ या गाण्याकरिताही मला अनावश्यकपणे वादात खेचले गेले होते. अनारकलीला ऐतिहासिक स्थान असल्याचे सांगत लोकांनी माझ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली होती, असे समीर म्हणाले.
‘मलंग’ हे एक भव्य गाणे आहे. या गाण्यामुळे कोणाच्याही भावना दुखावल्या गेलेल्या नसून हे सुंदर आणि सुफी प्रेमगीत आहे. पण, काहीही कारण नसताना याला कायद्याच्या कचाट्यात खेचण्यात आले आहे, असेही समीर म्हणाले.

Story img Loader