स्वाती वेमूल

कोटींची उड्डाणे घेऊ पाहणाऱ्या भारतातील जवळपास ७० टक्के लोकसंख्या आजही खेड्यात राहते. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक ही पुढील राजकीय प्रवासाचा पाया ठरते. सरपंचपदाची निवडणूक, गावच्या मातीत मुरलेलं राजकारण, खुर्चीसाठी खेळला जाणारा खेळ आणि त्या खेळात कौटुंबिक नात्यांचाही पडलेला विसर असा फिल्मी ‘धुरळा’ बॉक्स ऑफिसवर उडाला आहे. समीर विद्वांस दिग्दर्शित ‘धुरळा’ या चित्रपटात कलाकारांची मोठी फौजच आहे. मल्टिस्टारर आणि राजकीय कथानक हे समीकरण साधून उत्तम चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न समीर विद्वांसने केला आहे.

Engravings on the wheels
चित्रास कारण की: जमिनीवरची मेंदी
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Tata Literature Live The Mumbai Litfest
बुकबातमी : इथं जाऊ की तिथं जाऊ?
Savlyachi Janu Savli
Video: “मी ही बघतेच कशी…”, हळदीच्या कार्यक्रमात भैरवीचे सावलीच्या वडिलांना चॅलेंज; मालिकेत येणार ट्विस्ट
Neelam Kothari And Mahesh Thakur
“मी तिच्या अंगावर पडलो अन् नीलमने…”, अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा; म्हणाला, “त्यानंतर सलमानने…”
Savlyachi Janu Savli
Video : “आयुष्यातला अंधार…”, सावली आणि सारंगचे लग्न होणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो
ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”
Phullwanti on OTT
घरबसल्या पाहा प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ सिनेमा; ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर आहे उपलब्ध

आंबेगाव बुद्रुक या गावच्या सरपंचपदाची निवडणूक. निवृत्ती अण्णा उभे यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा नवनाथ उभे (अंकुश चौधरी) आणि पत्नी ज्योती उभे (अलका कुबल) यांच्यात सरपंचपदाच्या खुर्चीसाठी सत्तासंघर्ष सुरू होतो. सुरुवातीला खुर्चीपासून लांबच राहणं पसंत करणाऱ्या ज्योतीताई आमदारांच्या (उदय सबनीस) आग्रहाखातर आणि सुनैनाताई (सुलेखा तळवलकर ) यांच्या साहाय्याने निवडणूक लढवण्यास सज्ज होतात. मोबाइलही नीट वापरता न येणाऱ्या ज्योतीताई सरपंचपदाच्या खुर्चीसाठी बचत गटातील महिलांच्या ताकदीनिशी निवडणुकीत उभे राहतात. नवनाथ हा त्यांचा सावत्र मुलगा. सावत्र मुलगा आणि आई यांच्यात हा संघर्ष सुरु होतो तितक्यात आंबेगाव बुद्रुक गावातील सरपंचपदाची जागा महिलेसाठी राखीव असल्याचा निर्णय कानी येतो. अर्थात यामागेही देवाणघेवाणीचं राजकारण. इथेच कथेला मोठं वळण येतं. सुरुवातीला दुरंगी लढत वाटणाऱ्या या निवडणुकीत नंतर रंजक वळण येतं. सत्तेच्या खेळातील हे वळण तुम्हाला चित्रपटगृहात जाऊन पाहावं लागेल.

आपल्या देशाच्या राजकारणात महिला पिछाडीवर आहेत असं अनेकदा आपल्याला ऐकायला मिळतं. ‘धुरळा’मध्ये याच महिलांना विशेष अधोरेखित करण्यात आलं आहे. ज्योतीताई, मोनिका (सोनाली कुलकर्णी) आणि हर्षदा (सई ताम्हणकर) या तिघींचं व्यक्तीमत्व एकमेकींपासून अत्यंत भिन्न. हीच भिन्नता कथेत आणखी चुरस आणते.

चित्रपटाच्या पूर्वार्धाचा वेळ ही प्रत्येक पात्राची ओळख, निवडणुकीची पार्श्वभूमी यासाठी दिल्याने कथेचा ओघ थोडा मंदावतो. मात्र उत्तरार्धात कथेवर पूर्ण पकड मिळवण्यात दिग्दर्शकाला यश मिळालंय. कलाकारांची फौज असली तरी प्रत्येक कलाकाराला त्याची भूमिका सिद्ध करण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला आहे. अलका कुबल यांनी त्यांची भूमिका उत्तमरित्या साकारली असली तरी ‘ज्योतीताई’ ही व्यक्तीरेखा पडद्यावर थोडीशी गुंतागुंतीची वाटते. एका क्षणी आई म्हणून असलेला कळवळा आणि दुसऱ्याच क्षणी खुर्चीसाठी मुलाविरोधात जाणं या गोष्टींमुळे हा गुंता निर्माण होतो. दुसरीकडे सई आणि सोनाली अगदी चोखपणे त्यांच्या भूमिका पार पाडताना दिसतात. सोनालीचा सहज वावर तर सईचा विचारपूर्वक अभिनय, ही जमेची बाजू ठरते. अंकुश चौधरीने नवनाथ उभे ही व्यक्तीरेखा अत्यंत नेमकेपणाने साकारली आहे. नजरेतून दिसलेला धाक, देहबोली, उत्तम संवादफेक यांमुळे अंकुश त्याची व्यक्तीरेखा पडद्यावर योग्यरित्या पार पाडण्यात यशस्वी ठरला आहे. या सर्वांमध्ये आणखी एक भूमिका चांगलीच लक्षात राहते ती म्हणजे प्रसाद ओकची. हरिशभाऊ गाढवेची नकारात्मक प्रतिमा प्रसादने उत्तमरित्या उभी केली आहे. सिद्धार्थ जाधव, अमेय वाघ, सुलेखा तळवलकर यांनीसुद्धा त्यांच्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे.

राजकारणातील ‘धुरळा’ प्रेक्षकांच्या मनाला भिडण्यासाठी उत्तम पार्श्वसंगीत देण्यात आले आहे. संगीतासोबतच चित्रपटातील दमदार संवाद चित्रपटगृहातून बाहेर पडल्यावरही चांगलेच लक्षात राहतात. निवडणुकीत कोण विजयी ठरतो आणि त्या विजयानंतर कथेत काय वळण येतं याची उत्सुकता शेवटपर्यंत ताणण्यात दिग्दर्शकाला यश आले आहे.

एकंदरीत हा फिल्मी ‘धुरळा’ चांगल्या मतांनी बॉक्स ऑफिसवर विजयी होतो. मराठीतील हा मल्टिस्टारर चित्रपट उत्तम कथानकासह प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे राजकारणाचा ‘धुरळा’ चित्रपटगृहात जाऊन नक्कीच अनुभवण्यासारखा आहे.

लोकसत्ता ऑनलाइनकडून ‘धुरळा’ला साडेतीन स्टार

– swati.vemul@indianexpress.com