‘टाटा सन्स’चे माजी अध्यक्ष आणि उद्यम जगतातील उमदे उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा रविवारी दुपारी डहाणूजवळील चारोटी येथील भीषण अपघातात मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्यासह प्रवास करणारे जहांगीर दिनशा पंडोल यांचाही मृत्यू झाला, तर इतर दोन प्रवासी गंभीर जखमी झाले. राज्य सरकारने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर सर्वत्र शोककळा पसरली आहे. अनेकांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सायरस मिस्त्री यांच्या आकस्मिक निधनानंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे. बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा हिने सायरस यांच्या निधनावर शोक व्यक्त करत लोकांना कार चालवताना सीट बेल्ट घालण्याचे आवाहन केले आहे.
बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच दिया मिर्झाने तिच्या अधिकृत ट्वीटरवर एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये तिने उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. या ट्वीटमध्ये दिया मिर्झा म्हणाली, “मी तुम्हा सर्वांना विनंती करते की, तुम्ही सर्वांनी सीट बेल्ट लावलाच पाहिजे. तसेच, तुमच्या मुलांना सीट बेल्ट कसा लावायचा याचे प्रशिक्षण द्यायला हवे. यामुळे जीवाचे संरक्षण होते.”
आणखी वाचा : ‘पुष्पा’ फेम अभिनेत्री आता अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकणार, चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल
सायरस मिस्त्री यांचा रस्ते अपघातात झालेला मृत्यू लक्षात घेऊन दिया मिर्झाने लोकांना जागरुक करण्याचे काम केले आहे. तिच्या या ट्वीटनंतर अनेक चाहते तिचं कौतुक करत आहेत. अनेकांनी तिच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ‘तुमच्यासारख्या सेलिब्रिटींनी खरोखर महत्त्वाच्या गोष्टींसाठी आवाज उठवला पाहिजे. खूप छान दिया मिर्झा’, असे एका व्यक्तीने यावर कमेंट करत म्हटले आहे. तर दुसरा युजर म्हणाला, ‘जेव्हाही तुम्ही हायवेवर गाडी चालवत असाल किंवा कुठेही जात असाल तेव्हा कोणत्याही परिस्थितीत सीट बेल्टचा वापर करा.’
सीट बेल्ट न लावल्याने सायरस मिस्त्री यांचा मृत्यू
सायरस मिस्त्री हे पंडोल कुटुंबियांसह अहमदाबादहून मुंबईकडे मर्सिडीज कारने येत होते. चारोटी नाक्याजवळील सूर्या नदीच्या पुलाच्या कठडय़ाला त्यांच्या भरधाव कारची धडक बसल्याने मागील आसनावर बसलेल्या मिस्त्री आणि जहांगीर पंडोल यांचा मृत्यू झाला. त्यांनी सीट बेल्ट लावला नसल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन अपघातस्थळीच त्यांचा मृत्यू झाला. कार पुलाच्या कठडय़ाला धडकताच मोटारीतील संरक्षक ‘एअर बॅग’ उघडल्या, मात्र मिस्त्री आणि जहांगीर आसनावरून फेकले गेल्याने यांचे संरक्षण होऊ शकले नाही, असे सांगण्यात येत आहे.
आणखी वाचा : “अमित शाह जी…” रोहित शेट्टीच्या ‘त्या’ पोस्टच्या कॅप्शनने वेधले सर्वांचेच लक्ष
नम्र, उमदा आणि तेजस्वी उद्योगपती हरपला
मितभाषी असलेल्या मिस्त्री यांच्याकडे २०१२मध्ये ‘टाटा सन्स’चे अध्यक्षपद आले. त्यानंतरच ते खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले. नावात ‘टाटा’ नसलेले ते टाटा समूहाचे दुसरे अध्यक्ष बनले. त्यांना रतन टाटा यांचे वारस म्हणून घोषित करण्यात आले. परंतु, केवळ चार वर्षांच्या कालावधीत मिस्त्री यांना टाटा समूहातून पायउतार व्हावे लागले. पुढे सन्मानासाठी त्यांनी दीर्घकाळ न्यायालयीन लढा दिला. त्यात त्यांना अपयश आले. त्याआधी ते कुटुंबाच्या मालकीच्या बांधकाम व्यवसायात म्हणजे शापूरजी पालनजी अँड कंपनीत १९९१ मध्येच, म्हणजे वयाच्या २३व्या वर्षी संचालक बनले. तीन वर्षांनी ते व्यवस्थापकीय संचालक बनले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने झपाटय़ाने यशाचे शिखर गाठले.
मिस्त्री यांच्या अकाली निधनामुळे एक नम्र, उमदा आणि तेजस्वी उद्योगपती हरपला असून उद्योग जगताची अपरिमित अशी हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे.