‘द डर्टी पिक्चर’मध्ये सिल्क स्मिताची व्यक्तिरेखा साकारून ८०च्या दशकातील बी ग्रेड दाक्षिणात्य अॅडल्ट सिनेमाचे विश्व आणि त्यातील अभिनेत्रीचे वादळी आयुष्य दाखवून विद्या बालनने मोठे धाडस केले होते. ‘स्लिम’ व ‘झीरो फिगर’ या संकल्पनांना छेद देण्याचा यशस्वी प्रयत्न विद्या बालनने केला. त्यानंतरची तिची कारकीर्द आणि पडद्यावरील व्यक्तिरेखांची निवड वेगळी ठरली. आता पुन्हा एकदा ती धाडस करणार आहे आणि गुप्तहेराची भूमिका साकारणार आहे. बॉलिवूडची ती पहिली महिला गुप्तहेर ठरणार आहे.
बॉलिवूडच्या अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांच्या मनात वर्षांनुवर्षे असलेली प्रतिमा मोडून टाकण्याचा जणू विद्या बालनने विडा उचललाय. गाणी म्हणत सोज्वळ भूमिका साकारायच्या आणि नायकावर प्रेम करण्यासाठीच फक्त चित्रपटात अभिनेत्री असते किंवा मग हॉलिवूड स्टाइलच्या कथानकांची चोरी करून बनविलेल्या बॉलिवूडपटांमधील थोडीशी बोल्ड नायिका साकारायची असा प्रकार आतापर्यंत होता. परंतु, या सगळ्याला छेद देत विद्या आपल्या गतीने आणि मतीने पडद्यावर वेगवेगळ्या छटा असलेल्या परंतु मळलेली वाट सोडणाऱ्या व्यक्तिरेखा निवडू लागली आहे.
डर्टी पिक्चरनंतर ‘कहानी’ आणि आता याचवर्षी येऊन गेलेल्या ‘घनचक्कर’मधील ‘हटके’ भूमिकेनंतर विद्या बालन आता ‘बॉबी जासूस’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सज्ज होणार आहे.
दिया मिर्झाच्या बॉर्न फ्री या चित्रपटसंस्थेच्या ‘बॉबी जासूस’ द्वारे विद्या बालन बॉलीवूडमधली पहिली महिला गुप्तहेर ठरणार आहे. यशराज फिल्म्स बॅनरच्या अनेक चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करणारे समर शेख या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करीत आहे.
डर्टी पिक्चरनंतर स्त्री केंद्री सिनेमांना प्रेक्षक आहे हे बॉलिवूडवाल्यांनी जोखले. त्याचबरोबर बॉलिवूड तारका म्हणून प्रेक्षकांच्या मनात असलेली प्रतिमा मोडीत काढूनही चित्रपट बनविता येतो आणि त्याला प्रेक्षकवर्ग आहे हेही विद्या बालनने दाखवून दिले. म्हणूनच विद्या बालन आता बॉलिवूडची पहिली महिला गुप्तहेर साकारण्यास सज्ज झाली आहे. या चित्रपटात बॉबी जासूसचा ‘लूक’ आणि तिची स्वंतत्र गोष्ट सिनेमात असेल असे निर्माती व अभिनेत्री दिया मिर्झाने म्हटले आहे.
‘जासूस’ विद्या!
‘द डर्टी पिक्चर’मध्ये सिल्क स्मिताची व्यक्तिरेखा साकारून ८०च्या दशकातील बी ग्रेड दाक्षिणात्य अॅडल्ट सिनेमाचे
First published on: 03-10-2013 at 06:26 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dia mirza signs vidya balan for bobby jasoos