१९८३ च्या क्रिकेट वर्ल्डकपवर आधारित ’83’ चित्रपट उद्या म्हणजेच २४ डिसेंबरला सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंह विश्वविजेता कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. चित्रपटाचा ट्रेलर खूपच रोमांचक आहे. रणवीर व्यतिरिक्त, चित्रपटात अनेक कलाकार आहेत, जे भारतीय क्रिकेटमधील मोठ्या खेळाडूंची भूमिका साकारत आहेत. त्यापैकी एक गायक-अभिनेता हार्डी संधूचा समावेश आहे. हार्डी संधू हा मुळात प्रथम श्रेणी क्रिकेटपटू होता. दुखापतीमुळे त्याची क्रिकेट कारकीर्द संपुष्टात आली.
या चित्रपटातून हार्डी संधू अभिनयात पदार्पण करत आहे. तो भारताचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू मदन लाल यांच्या भूमिकेत दिसणार आहे. ३५ वर्षीय संधूने संगीत विश्वात स्वतःचे नाव कमावले आहे. या बॉलिवूड गायकाला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. संधूसाठी या स्तरावर पोहोचणे अजिबात सोपे नव्हते, कारण त्याला आजची प्रसिद्धी मिळवण्यापूर्वी अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले.
हार्डी संधूच्या अनेक चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसेल, पण तो भारताच्या अंडर-१९ आणि अंडर-१७ क्रिकेट संघाकडून खेळला होता. पंजाबसाठी तो ३ रणजी सामने खेळला. यात त्याने १२ विकेट्स घेतल्या होत्या. तो व्यावसायिक क्रिकेटही खेळण्यास तयार झाला. मात्र दुखापतीमुळे त्याची क्रिकेट कारकीर्द अकालीच थांबली आणि संधू नंतर संगीताकडे वळला. संधूने पंजाबी संगीत क्षेत्रात एक वेगळे आणि विशेष स्थान निर्माण केले आहे.
हेही वाचा – १४ वर्षीय मुलीवर बलात्कार प्रकरण : ‘त्या’ पाकिस्तानी क्रिकेटपटूवर रमीझ राजा संतापले; म्हणाले, ‘‘अशा गोष्टी…”
१९८३च्या विश्वविजेत्या संघातील ३ सदस्यही हार्डी संधूच्या क्रिकेट कारकिर्दीशी जोडले गेले आहेत. मदन लाल यांनी संधूला NCA अंडर-१७ मध्ये प्रशिक्षण दिले होते, दिलीप वेंगसरकर यांनी त्याला भारतीय अंडर-१९ संघाचा भाग बनवले आणि रणजी ट्रॉफीमध्ये तो बडोदा संघाचे कोच बलविंदर सिंग संधूंच्या हाताखाली तयार झाला.
धवनचा रूममेट होता संधू
संधूने शिखर धवन, चेतेश्वर पुजारा आणि इशांत शर्मा यांच्यासोबतही क्रिकेट खेळले आहे. हार्डी संधूने २०१८मध्ये टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते, की मी तब्बल १० वर्षे क्रिकेट खेळलो. मी शिखर धवनसोबत अंडर १९ क्रिकेटही खेळलो आहे. तो माझा रूममेट होता. याशिवाय मी भारतीय क्रिकेट संघातील चेतेश्वर पुजारा आणि इशांत शर्मासोबतही क्रिकेट खेळलो आहे. मात्र २००६मध्ये माझ्या कोपराला दुखापत झाली. मी वेगवान गोलंदाज होतो.