महिला कलाकारांना अभिनेत्यांच्या तुलनेत कमी मानधन दिले जाते अशी अनेकदा चर्चा असते. परंतु आता हळूहळू परिस्थिती बदलत चालली आहे. बॉलीवूडसह जगभरातील अनेक अभिनेत्री आजच्या घडीला चांगली कमाई करत आहेत. अभिनयाशिवाय अनेक अभिनेत्री ब्रॅंड्स प्रमोशन करून भरपूर पैसे कमावतात. जगात अशी एक अभिनेत्री आहे जिची संपत्ती बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, अक्षय कुमारपेक्षाही जास्त आहे. ही अभिनेत्री कोण आहे जाणून घेऊया…
शाहरुख-सलमानपेक्षा जास्त संपत्ती असणाऱ्या या अभिनेत्रीने आतापर्यंत एकाही हिट चित्रपटात काम केलेले नाही. दोन दशकांच्या कारकिर्दीत तिने फक्त पाच चित्रपटांमध्ये काम केले आहे. या अभिनेत्रीचे नाव जामी गर्ट्झ असे आहे. आजच्या घडीला तिची एकूण संपत्ती ३ बिलियन युएस डॉलर म्हणजेच जवळपास २५ हजार कोटींपेक्षा जास्त आहे.
हॉलीवूडमध्ये जामी गर्ट्झचे नाव फारसे लोकप्रिय नाही कारण, तेथील ज्युलिया रॉबर्ट्स, अँजेलिना जोली, जेनिफर एनिस्टन या अभिनेत्री जगभरात जास्त प्रचलित आहेत. परंतु हिट चित्रपटांमध्ये काम न करतात जामीने बक्कळ पैसे कमावले आहे. तिने अनेक ठिकाणी गुंतवणूक केल्याचे बोलले जाते. जामी आणि तिचा पती उद्योगपती टोनी रेस्लर हे दोघेही टीम अटलांटा हॉक्स या कंपनीचे मालक आहेत तसेच त्यांचे इतरही बरेच व्यवसाय आहेत.
५७ वर्षीय जामी गर्ट्झने १९७० च्या दशकात बालकलाकार म्हणून अभिनयाला सुरुवात केली. तिने १९८१ मध्ये एंडलेस लव्ह या चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर तिने ‘ट्विस्टर’, ‘स्टिल स्टँडिंग’ आणि ‘द नेबर्स’ यांसारखे चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केले. १९९७ नंतर जामीने फक्त पाच चित्रपटांमध्ये काम केले आहे.
हेही वाचा : “क्रांतीचा फोन आल्यावर…”, समीर वानखेडेंनी केला बायकोबद्दल खुलासा; म्हणाले, “तिच्याशी फोनवर बोलायला…”
सध्या भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता शाहरुख खानची संपत्ती ६ हजार ३०० कोटी एवढी आहे. तर, बिग बी अमिताभ बच्चन यांची संपत्ती ३ हजार कोटी रुपये आणि सलमान खान यांची संपत्ती जवळपास २ हजार ८०० कोटी आहे. या सुपरस्टार्सच्या तुलनेत जामीची संपत्ती दुप्पटीने जास्त आहे.