रवींद्र पाथरे

आज निदान शहरांत तरी स्त्री-पुरुष दोघंही बऱ्यापैकी व्यक्तिस्वातंत्र्य अनुभवताना दिसताहेत. किंबहुना, त्याचा अतिरेकच करताहेत असं म्हणायला हरकत नाही. त्यात लग्न हा प्रकार सर्वात जास्त तडजोडीचा. त्यातली जाचकता टाळण्यासाठी अनेक जण ‘लिव्ह इन’चा पर्याय अवलंबतात. परंतु त्यातही अखेरीस नवरा-बायकोसारखाचा पझेसिव्हनेस येतो आणि नातं तुटतं. पूर्वीच्या काळी ‘पदरी पडलं, पवित्र झालं’ असा प्रकार असे. मिळेल त्या जोडीदाराबरोबर सगळ्या तडजोडींसह बिनबोभाट आयुष्य काढायचं अशी पद्धत प्रचलित होती. त्यात मग घुसमट, कोंडी, दडपलेपण, भावनिक सुरक्षितता असं सगळं सगळं काही असे. पण एकदा मनाची तयारी केलेली असली की ते नातं विनातक्रार स्वीकारलं जात असे. म्हणूनच आजही भारतात बहुसंख्य लगं्न टिकलेली दिसतात, ती यामुळेच. लग्नात समोरच्या व्यक्तीशी जुळवून घेणं आलंच. ते जितक्या सुलभरीतीनं होईल तितकं लग्न टिकण्याची शक्यता अधिक. पण हल्ली कुणीच याला राजी नाही. ‘मी’चा ताठा, माझ्याभोवतीच जग फिरायला हवं, ही भावना स्त्री-पुरुष सर्वामध्ये कमालीची तीव्र झाली आहे. साध्या साध्या गोष्टींवरून लग्न तुटताहेत. पण कुणीच त्याबद्दल स्वत:ला दोष द्यायला तयार नाही. याचंच प्रतिबिंब आज रंगभूमीवर दिसून येतंय. ‘चारचौघी’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘नियम आणि अटी लागू’, ‘खरं खरं सांग’ आणि आता मनस्विनी लता रवींद्र लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित ‘डाएट लग्न’ ही सगळी नाटकं लग्नातील प्रॉब्लेम्ससंबंधीच बोलतात आणि लोकही त्यांना गर्र्दी करताहेत. म्हणजे कुठंतरी त्यांनाही हे पटतंय, की काहीतरी चुकतंय. ते दुरुस्त करायला हवं.

‘डाएट लग्न’ हे नाटक खरं तर लग्नातल्या आजच्या आर्टिफिशियल प्रॉब्लेम्सवरचं नाटक आहे. ऋता आणि आलोक या जोडप्यात काहीच धडपणे ‘वर्क’ होत नाहीए. म्हणजे आलोक परफेक्शनिस्ट आहे. (अर्थात त्याच्याच म्हणण्यानुसार!) तर ऋता वेंधळी, सतत त्याच्यावर अवलंबून असलेली, स्वत:चे निर्णय स्वत: न घेऊ शकणारी. कुठलंच काम धडपणे करू न शकणारी. त्यामुळे त्यांच्यात सतत भांडणं होतात. आलोकला हे असह्य़ होतं. तो तिला कंटाळून सांगतो की, आपण वेगळं होऊ या. त्याने तरी आपण सुखी होऊ. पण ऋताला हे तितकंसं मान्य नाहीए. तिला तिच्या चुका मान्य आहेत. ती त्या दुरुस्तही करू पाहते, पण बऱ्याचदा ते तिला नीटसं जमत नाही. या सगळ्याचा एकदा निकाल लावावा म्हणून ते मीरा या सायको-थेरपिस्टकडे जातात. ती एकेकाळची आलोकची मैत्रीण. ती त्यांचा प्रॉब्लेम ऐकून घेते. त्यावर त्यांचं नातं सुधारण्यासाठी ‘डाएट’चा उपाय सुचवते. दोघांनीही महिनाभर एकमेकांशी फारसं बोलायचं नाही. आपापले व्यवहार स्वतंत्रपणे करायचे. एकमेकांशी नवरा-बायको म्हणून संबंध ठेवायचे नाहीत. शक्यतो एकमेकांपासून दूरच राहायचं. स्वतंत्र स्वैपाक करून खायचा.. वगैरे वगैरे. त्याप्रमाणे ते वागायचं ठरवतात. पण ते सगळंच काही त्यांना शक्य होतं असं नाही. एका नाजूक क्षणी ते एकमेकांच्या जवळही येतात. पण त्यानंतर आलोकला ‘गिल्टी’ वाटतं. ते पुन्हा एकदा ‘डाएट’ सुरू करतात.

मीराबरोबरच्या दुसऱ्या सीटिंगमध्ये ती या ‘डाएट’च्या विरुद्ध डाएट त्यांना करायला सांगते; जेणेकरून त्यांच्यात निर्माण झालेलं अंतर कमी होईल. पण पहिल्या डाएटमुळे आता त्यांच्यात संवादच उरलेला नसल्याने त्यांना हेही अवघडच जातं. ऋता आता आपलं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व, स्वतंत्र अस्तित्व शोधण्याच्या प्रयत्नाला लागते. भाडय़ाने जागा घेऊन तिथं आपला संसार मांडायचं ठरवते. मिळालेल्या स्वातंत्र्याने ती हरखून जाते. तिचा जीव आलोकमध्ये अडकलेला असतो खरा, पण त्यातून सोडवणूक करून घ्यायचं ती ठरवते.

मात्र, आता आलोकला हे वेगळेपण नको असतं. ऋताशिवाय आपलं अडेल हे त्याला कळून चुकतं. पण आता उशीर झालेला असतो. तिनं मनाची तयारी केलेली असते..

मनस्विनी लता रवींद्र यांचं हे नाटक आजच्या धरसोड वृत्तीच्या पिढीचं प्रतिनिधित्व करतं. व्यक्तिवादाचा अतिरेक आणि त्यातून निर्माण होणारे प्रॉब्लेम्स हा खरं तर या नाटकाचा मध्यवर्ती विषय. खरं तर ऋता आणि आलोकमध्ये तसं काही ‘गंभीर’ घडलेलं नसतं. मधलं आपलं ‘निकिता प्रकरण’ आलोकने नको त्या वेळी सांगितल्याने ऋता डिस्टर्ब होते, हे खरंय. पण हा अपवाद सोडला तर तसं त्यांच्यात बिनसण्यासारखं फार काही झालेलं नसतं. असं असताना घटस्फोटाच्या टोकापर्यंत त्यांचं नातं का जावं, हेच कळत नाही. आलोकची घटस्फोटाची ‘चूस’ एवढंच त्याला कारण ठरतं. त्यांच्यात प्रेम असतं, पण कॉम्पेटिबिलिटी नसते. तशी लग्नासारख्या कृत्रिम नात्यात ती हळूहळूच येत असते. दोन भिन्न संस्कृती, स्वभाव, वृत्तीची माणसं लग्नानं एकत्र येतात. त्यांच्यात काहीच साम्य नसतं. त्यामुळे त्यांच्यात नातं निर्माण व्हायला वेळ हा लागतोच. त्यात मग तडजोडीही आल्या. त्या केल्याशिवाय नातं टिकणं अशक्यच. पण कुणी बदलायचंच नाही असं ठरवलं तर..? हाच खरा ‘डाएट लग्न’मधील प्रॉब्लेम आहे. लेखिकेने एपिसोडिक पद्धतीनं नाटकाचं लिखाण केलं आहे. पहिला अंक त्यामुळे संथ झाला आहे. दुसऱ्या अंकातच बहुसंख्य घडामोडी घडतात. त्यांच्या नात्यातला गुंता उलगडतो. दोघांना वस्तुस्थिती कळून येते. पण त्यांच्यातील भावनिक गुंतलेपण या अंकात जरा जास्तच ताणलंय. त्यामुळे आता नेमकं त्यांच्यात काय होणार, याची प्रेक्षकांना नको इतका काळ प्रतीक्षा करावी लागते.

दिग्दर्शक विजय केंकरे यांनी आजच्या पिढीची ही गोची प्रयोगात यथातथ्य रीतीनं मांडलीय. अर्थात सायको-थेरपिस्ट म्हणून मीराला यात फारसा रोल नाहीए. तिचं आणि आलोकचं पूर्वी कधीकाळी काहीतरी होतं याचा संदर्भ नाटकात का आलाय, तेच कळत नाही. त्यानं संहितेला कसलंच बळ मिळत नाही. केंकरे यांनी यातला ऋता आणि आलोकमधील स्वभावगत संघर्ष नीटस आकारलाय. त्यांच्यातलं ‘मिसमॅच’पण त्यांनी नेमकेपणाने अधोरेखित केलंय. तसंच त्यांच्यातलं बॉण्डिंगही त्यांनी उत्कटपणे दाखवलंय. असं असताना ते वेगळं होण्याच्या टोकाला का जातात हे समजत नाही. त्यांच्या लग्नातील ‘आर्टिफिशियल’ प्रॉब्लेमच याला कारणीभूत होताना दिसतो. असो.

प्रदीप मुळ्ये यांनी आलोकच्या घराचं केलेलं नेपथ्य लोभसवाणं आहे. त्यातला अ‍ॅस्थेटिक सेन्स लक्षणीय आहे. शीतल तळपदे यांनी प्रकाशयोजनेतून नाटय़ांतर्गत ताण गडद केले आहेत. आनंद ओक यांच्या संगीताने त्यात भर घातली आहे. मंगल केंकरे यांची वेशभूषा पात्रानुरूप आणि प्रसन्न मूड निर्माण करणारी आहे.

रसिका सुनील यांनी ऋताचं भांबावलेपण, गोंधळलेपण आणि आत्मविश्वासाचा अभाव असलेली तरुणी सर्वार्थाने उभी केली आहे. लग्नातील तिचा ‘रोल’ ती निभावू शकत नाहीए हे तिला कळतंय, पण वळत नाहीए. ती आपल्या परीनं खूप प्रयत्न करते. पण काही जमत नाही, ही तिची व्यथा जेन्युइन आहे. पण त्याकरता लग्न मोडू नये असं तिला प्रामाणिकपणे वाटतं. आलोक हाही खरा तर कन्फ्युज्ड आहे. ऋतातील उणिवा त्याला कळतात, त्या सुधारण्यासाठी त्यानं वेळ द्यायला हवा, तो तो देत नाही. आणि इथंच प्रॉब्लेम्सना सुरुवात होते. सिद्धार्थ बोडके यांनी आलोकची द्विधा मन:स्थिती अचूक हेरलीय. पण स्वत:बद्दलचा फाजील आत्मविश्वास त्याला वास्तवाचा सामना करू देत नाही. किंबहुना, त्याला ऋताबद्दल प्रेम आहे. तिच्या चुकांसकट तो तिला स्वीकारू शकतो. पण तसं प्रारंभी तो करताना दिसत नाही. त्यामागचं तार्किक कारण संहितेत मिळत नाही. ऋताला त्यानं घर सोडण्यापासून मना करण्याचा त्याचा शेवटचा प्रयत्न प्रामाणिक आहे. पण तोवर उशीर झालेला असतो. मीरा झालेल्या वैष्णवी रत्ना प्रशांत यांना संहितेतच सायको-थेरपिस्ट म्हणून फार काही ‘भूमिका’ दिली गेलेली नाही. जी वाटय़ाला आलीय ती त्या प्रामाणिकपणे निभावतात, एवढंच. आधुनिक पिढीच्या व्यक्तिवादाच्या अतिरेकातून उद्भवलेली समस्या मांडणारं हे नाटक आजचं वास्तव समजून घेण्यासाठी पाहायला हरकत नाही.

Story img Loader