महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आज पर्यंत अनेक चित्रपट आले आहेत. त्यात लवकरच शिवाजी महाराजांवर आणखी एक चित्रपट येणार आहे. प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’ या ऐतिहासिक चित्रपटानंतर ‘पावनखिंड’ हा चित्रपट आणला. अलिकडेच हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. आता लवकर दिग्पाल लांजेकर शिवाजी महाराजांवर एक चित्रपट घेऊन येत आहेत. त्यांनी ‘शेर शिवराज’ चित्रपटाची घोषणा केली असून या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
दिग्पाल लांजेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या चित्रपटाची माहिती दिली होती. त्यानंतर आता या चित्रपटाची टीझर प्रदर्शित झाला असून यासोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाच्या टीझरची जोरदर चर्चा सुरू आहे. टीझरमधील दृश्यं अक्षरशः अंगावर काटा आणणारी आहेत.
आणखी वाचा- The Kashmir Files वर अखेर आमिर खाननं सोडलं मौन, म्हणाला “जेव्हा एका व्यक्तीवर अत्याचार…”
दिग्पाल लांजेकर यांनी हा टीझर त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. व्हिडीओ पोस्ट करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘आदिलशाहीच्या जुलमी वरवंट्याखाली जेव्हा महाराष्ट्र भरडला, अन्याय निवारण्यासाठी तेव्हा कणाकणांतून बाहेर पडला, सहस्त्र हातांचा अजस्त्र नरसिंह… शेर शिवराज २२ एप्रिल २०२२…हर हर महादेव.’ सध्या सोशल मीडियावर शेर शिवराजच्या टीझरची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. या टीझरनंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. हा चित्रपट येत्या २२ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
आणखी वाचा- “पावनखिंड विरुद्ध झुंड विरुद्ध कश्मीर फाईल्स, कुठे चाललोय आपण?”, दिग्दर्शकाची संतप्त पोस्ट
दरम्यान दिग्पाल लांजेकर यांचं दिग्दर्शन असलेला ‘पावनखिंड’ हा ऐतिहासिक चित्रपट १८ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, समीर धर्माधिकारी, अंकित मोहन यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका चिन्मय मांडलेकरनं साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला होता.