ज्येष्ठ लेखिका मृणालिनी जोशी यांचे गुरुवारी (२७ ऑक्टोबर) दुपारी वॄद्धापकाळाने निधन झाले. त्या ९५ वर्षांच्या होत्या. शहीद भगतसिंग यांच्या जीवनावर आधारित ‘इन्किलाब’ ही त्यांची कादंबरी चांगलीच गाजली. त्याबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर तथा श्री गुरुजी यांच्या जीवनावर आधारित ‘राष्ट्राय स्वाहा’ कादंबरी, शंकर महाराज यांच्या जीवनावर आधारित शंकरलीला, पावसचे स्वामी स्वरूपानंद यांच्या जीवनावर आधारित अमॄतसिद्धी, स्वा. सावरकर यांच्या जीवनातील अंतिम कालखंडावरील ‘अवध्य मी! अजिंक्य मी!!’ हे कादंबरी त्यांचे साहित्य गाजले. त्यांच्या निधनानंतर अनेकांना श्रद्धांजली वाहिली आहे. प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

दिग्पाल लांजेकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर ज्येष्ठ लेखिका मृणालिनी जोशी यांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोबरोबर त्यांनी एक पोस्टही शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी त्यांची आणि मृणालिनी जोशी याची एक आठवण सांगितली आहे. त्याबरोबर ते भावूक झाले.
आणखी वाचा : “गणपतीपुळे येथील हॉटेलमध्ये मी स्वतः …” फसवणुकीच्या प्रकरणावर मधुराणी प्रभुलकर स्पष्टच बोलली

दिग्पाल लांजेकर यांची पोस्ट

ॐ राष्ट्राय स्वाहा..
२००५ च्या फेब्रुवारीत १ तारखेला मी शौनक गायधनी ला फोन केला. ” ऐक रे, अम्मांकडे चाललोय.. येतोयस?” “अम्मा?” “अरे मृणालिनी जोशी! इन्किलाब लिहिणाऱ्या.. आपल्या नाटकासाठी त्यांच्या राष्ट्राय स्वाहा कादंबरीची परवानगी घ्यायचीय…” मग दुपारी आम्ही अम्मांच्या दारात. त्या त्यांच्या बंगल्याच्या मागच्या बाजूला साधना करायच्या. मागे जायचा रस्ता सापडेना तेव्हा फोन केला. म्हणाल्या “मागच्या बाजूला जिना आहे.. तिथे या मी बाहेर थांबते..” “अहो नको, आम्ही शोधतो” म्हणत आम्ही जिन्यात वळलो… तर आम्हाला जिना सापडावा म्हणून त्या स्वतः कष्टाने जिन्यात येऊन थांबल्या होत्या. ते तपोवृद्ध तेज मी आजही विसरू शकत नाही. त्यांचं वय झालं होतं, मणक्यांमध्ये पाणी झाल्यानं असह्य वेदना होत होत्या पण ते सगळं त्या तेजस्वी हास्यामध्ये नाहीसं झालं होतं. मी आणि शौनक अक्षरशः दीपून गेलो होतो. याच भेटीत त्यांनी मला लेखनाचा मंत्र दिला. म्हणाल्या “पात्रं लेखकाच्या अंगात आणि मनात इतकी भिनली पाहिजेत की एका क्षणी ती पात्रंच लेखकाला सांगतात. बाबारे, तू लिहू नकोस अमुक एका प्रसंगात मी कसं वागेन आणि कसं बोलेन हे मी तुला सांगतो. मग लेखकानं फक्त त्या पात्राचं ऐकून निमूट लेखणी चालवायची.”

आजसुद्धा प्रत्येक नवीन कलाकृती लिहिताना हे होईपर्यंत मी थांबतो, आणि त्यामुळंच प्रत्येक पात्राचा आशीर्वादही मिळवतो. अम्मांची इन्किलाब कादंबरी शाळकरी वयातच वाचली होती. सरदार भगतसिंह आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जगलेला, भोगलेला इतिहास रसरशीत पणे मनात भिनला होता. पण नंतर कळत्या वयात त्यांच्या सगळ्या कादंबऱ्या वाचल्या. इन्किलाब, राष्ट्राय स्वाहा, अजिंक्य मी, वेणा स्वामी, मुक्ताई,आणि सरतेशेवटी चरित्रकथनात्मक “आलोक”. आलोक मध्ये त्यांनी त्यांचा लेखनप्रवास उलगडला आहे. विविध थोर विभूतींना कादंबरीत शब्दरूपाने चितारण्याआधी मृणालिनी ताईंनी त्यांची साकल्याने भेट घेतली. स्वातंत्र्यवीर सावरकर, सरदार भगतसिंगांची बहीण अमृत कुंवर, कवी कुसुमाग्रज, सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद, डॉ. धनेश्वर, वंदनीय ताई आपटे, या महात्म्यांनी त्यांच्या लेखणीला परिसस्पर्श केला.. ही बाई १९६८ साली इन्किलाब लिहिण्याआधी दूर पंजाबातल्या एका खेडेगावात थेट भगतसिंगांच्या आईला आणि थोरल्या बहिणीला जाऊन भेटली.. आलोक मधला तो वृत्तांत वाचण्यासारखा आहे. उगीच लेखन जिवंत होत नाही… त्यामागे संशोधनाची तळमळ आणि तपश्चर्येची साधना लागते. ती या पिढीकडे आतोनात आहे. खरे लेखक हे! ‘आम्ही उच्छिष्टावर जगणारे याचक!’.

आज लेखक म्हणून मान्यता मिळताना अम्मांचा आशीर्वादरूप परिसस्पर्श असल्याने रसिकाश्रय मिळतो आहे हे मी कधीच विसरू शकत नाही. पण आता मनातली सल वाढली आहे. ज्यांचे चरणस्पर्श करावेत असे अजून दोन चरण कमी झाले. एक दिव्य साध्वी, तपस्विनी, लेखन शारदा राष्ट्रयज्ञात निमाली.. ॐ राष्ट्राय स्वाहा.. राष्ट्राय इदं न मम असं म्हणत .. आम्हा सगळ्यांच्या ‘अम्मा’ मृणालिनी जोशी यांना विनम्र श्रद्धांजली.., असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा : दिग्पाल लांजेकरांच्या शिवराज अष्टकातील ५ व्या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता, आता ‘ही’ मोहिम दिसणार रुपेरी पडद्यावर

ज्येष्ठ लेखिका मृणालिनी जोशी यांचा जन्म रत्नागिरी येथील १३ फेब्रुवारी १९२७ रोजी झाला होता. त्या पावस येथील स्वामी स्वरूपानंद यांच्या अनुग्रहित शिष्या होत्या. रत्नागिरी येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे घर शेजारीच असल्याने लहानपणापासून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशी त्यांचे घरोब्याचे संबंध होते. सावरकर त्यांना मुलगी मानत असत. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रेरणेने मॄणालिनी जोशी यांनी लिखाणाला सुरवात केली. देशभक्त, आध्यात्मिक व्यक्तींचे चरित्रलेखन, काव्यलेखन यावर त्यांनी भर दिला. जीवनात भेटलेल्या संत-महंतांच्या सहवासातील आठवणींवर आधारित आलोक हे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक त्यांनी लिहिले होते.

Story img Loader