छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. ही मालिका गेल्या १३ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. दरम्यान, मालिकेत जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मुलीच्या लग्नामुळे चर्चेत होते.
दिलीप जोशी यांची लेक नियतिने लग्नात तिचे पांढरे केस लपवण्याचा प्रयत्न केला नाही म्हणून तिची सोशल मीडियावर स्तुती होत होती. आता यावर दिलीप जोशी यांनी वक्तव्यं केलं आहे. दिलीप जोशी यांनी नुकतीच ईटाइम्सला मुलाखत दिली, या मुलाखतीत त्यांना नियतीच्या पांढऱ्या केसांवर प्रश्न विचारण्यात आला होता. ‘तिने तिचे पांढरे केस जसे आहेत तसे ठेवणे हा आमच्यासाठी कधीच लग्नासाठी वगैरे प्रश्न नव्हता. लोक अशी प्रतिक्रिया देतील याची कल्पनाही आम्ही केली नव्हती. याबद्दल आमच्या घरात कधी चर्चाही झाली नाही. जे काही आहे ते ठीक आहे. सर्वांनी ते सकारात्मक पद्धतीने घेतले आणि मला आनंद आहे की तिच्यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळाली आहे, असे दिलीप जोशी म्हणाले.
आणखी वाचा : तैमूरच्या फोटोवर कंगनाची कमेंट पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का, म्हणाले…
आणखी वाचा : “अशिक्षित आणि…”, सुधीर मुनगंटीवारांबाबत सोनम कपूरची पोस्ट व्हायरल!
पुढे दिलीप जोशी म्हणाले, मला असं वाटतं की जी व्यक्ती जशी आहे ती तशीच राहिली पाहिजे. आपण जसे आहोत तसे जगासमोर आले पाहिजे, कोणताही मुखवटा न लावता. दरम्यान, लग्नानंतर नेटकऱ्यांनी नियतिची प्रचंड स्तुती केली होती.