ज्यांची नलक करत अभिनय शिकून अनेक सुपरस्टार घडले, ज्यांना आजही बडे बडे सुपरस्टार गुरू मानतात, असे फिल्मी दुनियेतील महान कलाकार ‘ट्रॅजेडी किंग’ दिलीप कुमार. वयाच्या ९८ व्या वर्षी आज पहाटे मुंबईतल्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये निधन झालं. त्यांच्या निधानामूळे बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली असून अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. दिलीप कुमार यांच्यासोबत ‘सौदागर’ चित्रपटात काम केलेले अभिनेते मुकेश खन्ना यांनी सुद्धा दिलीप कुमार यांच्या आठवणींना उजाळा दिलाय.

यावेळी मुकेश खन्ना म्हणाले, “आज आपल्या फिल्म इंडस्ट्रीने सगळ्यात मोठा हिरो गमावलाय. दिलीप कुमार स्वतः एक अभिनयाचे विद्यापीठ होते. अनेक कलाकारांनी त्यांच्याकडून अभिनयाचे धडे घेतले आहेत. मी लहानपणापासूनच त्यांचे चित्रपट पाहत आलोय. मी मोठा झाल्यानंतर अभिनय करू लागलो. त्यावेळी माझ्या आयुष्यातील तो खास क्षण होता, ज्यावेळी मला ‘सौदागर’ चित्रपटात दिलीप कुमार यांच्या मुलाची भूमिका करण्याची ऑफर सुभाष घई यांनी दिली. त्यावेळी मी काम करत असलेल्या ‘महाभारत’च्या यशाच्या मार्गावर होतो. चित्रपटात दिलीप कुमार यांच्या रागीट मुलाची भूमिका असल्याचं सुभाष घई यांनी सांगितलं.”

यापुढे बोलताना मुकेश खन्ना म्हणाले, “सौदागर चित्रपटादरम्यान मला दिलीप कुमार यांना जवळून पाहण्याची संधी मिळाली होती. त्याआधी दिलीप कुमार यांच्याबाबतीत मी माझ्या मनात जी प्रतिमा तयार केली होती, ते खऱ्या आयुष्यात तसेच दिसून आले. ते त्यांच्या आयुष्यातील एक एक क्षण मनमोकळेपणाने जगत असत. दिलीप कुमार हे त्यांच्या कामांच्या बाबतीत खूपच गंभीर होते. स्क्रीनवर चांगला परफॉर्मन्स सादर करता यावा यासाठी रात्री २.३० वाजेपर्यंत ते आपल्या भूमिकेचा सराव करत असत.”

दिलीप कुमार यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून आठवणींना उजाळा दिला. आज संध्याकाळी पाच वाजता मुंबईमध्ये दिलीप कुमारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दिलीप कुमार यांच्या निधनामुळे त्यांच्या चाहत्यांना आणि समस्त कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे.