बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार हे मूळचे पेशावरचे. पेशावर येथे पाकिस्तानी तालिबान्यांनी केलेल्या शाळकरी मुलांच्या निर्घृण हत्येप्रकरणी दिलीप कुमार यांनी दु:ख व्यक्त केले. दिलीप कुमार यांचे खरे नाव युसुफ खान असून, पेशावरमधील या घटनेमुळे ते अतिशय व्यथित झाल्याची माहिती त्यांची पत्नी सायरा बानू यांनी दिली. या दुर्दैवी घटनेबाबत आपल्या भावना व्यक्त करताना दिलीप कुमार म्हणाले, अखंड भारतात माझा जन्म पेशावर या चैतन्याने भरलेल्या शहरात झाला. या शहराविषयीच्या काही खास आठवणी आजही माझ्या मनात आहेत. तालिबानी अतिरेक्यांच्या या पापाला क्षमा नाही. या घटनेने माझे हृदय पिळवटले असून, भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडील शब्द अपुरे आहेत. या नरसंहारात ज्यांनी आपले चिमुरडे गमावले त्या पालकांच्या दुःखात मी सामील असून, या भयानक घटनेतून स्वत:ला सावरण्यासाठी देव त्या पालकांना शक्ती देवो. या अतिरेकी शक्तींचा नायनाट करण्याची वेळ आली असल्याची भावनादेखील दिलीप कुमार यांनी व्यक्त केली. दिलीप कुमार यांच्या पूर्वजांचे घर आजही पेशावरमध्ये आहे. मंगळवारी पाकिस्तानी तालिबान्यांनी सैनिकी शाळेतील १३२ विद्यार्थ्यांसह नऊ शिक्षकांचा बेछूट गोळीबार करीत नरसंहार केला. अखंड भारतात पेशावर हे संगीत, कविता आणि नाट्यकलेसाठी योग्य असलेले शहर म्हणून प्रसिद्ध होते. १९३६ सालच्या माध्यमातील वृत्तानुसार पेशावरमध्ये भारतातील पहिल्या रेडिओ स्थानकाची स्थापना करण्यात आली होती. बॉलिवूडचे या शहराशी खास नाते आहे. पृथ्वीराज कपूर आणि सुपरस्टार शाहरूख खानसारख्या बड्या कलाकारांची नाळ पेशावरशी जुळलेली आहे. १९३० साली दिलीप कुमारच्या कुटुंबियांनी व्यवसायानिमित्त महाराष्ट्रात आपले बस्तान बसविले. हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यानंतर त्यांनी दिलीप कुमार हे नाव धारण केले. भारतीय चित्रपटसृष्टीतील महान कलाकार दिलीप कुमार यांनी १९५० ते १९६० चा काळ आपल्या अभिनयाने गाजविला होता. ‘दाग’, ‘देवदास’, ‘मधुमती’, ‘अमर’, ‘पैगाम’, ‘मुघल-ए-आझम’, ‘गंगा जमुना’, ‘लिडर’ आणि ‘राम और शाम’सारख्या हीट चित्रपटातून त्यांनी आपला कसदार अभिनय सादर केला आहे. जवळजवळ सहा दशके चित्रपटसृष्टीत काम केल्यानंतर त्यांनी १९९८ साली निवृत्ती घेतली. ‘किला’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता.