भारत भेटीवर आलेल्या पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शिद महमुद कसुरी यांनी बॉलीवूडचे जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार व त्यांच्या पत्नी सायरा बानो यांची भेट घेत त्यांना भारतात प्रकाशित करण्यात आलेल्या ‘नायदर हॉक नॉर अ डोव्ह’ या पुस्तकाची एक प्रत भेट म्हणून दिली. मंगळवारी संध्याकाळी सातच्या सुमारास दिलीप कुमार यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी कुर्शिद यांनी तासभर घेतलेल्या भेटीत अनेक आठवणी जागवल्या, त्यातच त्यांनी दिलीप कुमार यांनी पाकिस्तानला दोन वेळा गुप्तपणे भेट दिल्याची माहिती दिली आणि त्यांच्या भेटीचे प्रसंग पुस्तकात अधोरेखित केले असल्याचे सांगितले. दिलीप कुमार यांच्या भेटीचा उद्देश हा हिंदू मुस्लिम ऐक्याचा होता त्याचप्रमाणे ही एकमेव अशी व्यक्ती आहे जी भारत पाकिस्तानदरम्यान सलोख्याचे संबंध प्रस्थापित करेल, असेही कसुरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी ऑब्झव्र्हर रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी देखील त्यांच्यासोबत होते.
या भेटी दरम्यान दिलीप कुमार व कसुरी यांच्यामध्ये राजकारणापासून ते चित्रपटांपर्यंत अनेक विषयांवर गप्पा झाल्या. कसुरी यांनी दिलिप कुमार यांना पुस्तक भेट म्हणून दिले असता दिलीप कुमार यांनीही स्वाक्षरी करत आपल्या आत्मचरित्राची एक प्रत कसुरी यांना भेट दिली. त्याचप्रमाणे कसुरी यांनी मणीभवन येथे महात्मा गांधी आणि जिना मेन्शन येथे भेट देऊन बॅ. जिना यांना मानवंदना दिली. यावेळी प्रसारमाध्यमांनी कसुरी यांना दाऊद इब्राहीम बद्दल विचारले असता, मी पाकिस्तानचा माजी परराष्ट्र मंत्री आहे, आयएसआयएसचा अधिकारी किंवा गृह विभागाचा अधिकारी नसल्याचे सांगत अधिक बोलण्यास नकार दिला.