बॉलिवूडचा ‘बादशहा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खानने सोमवारी ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीविषयी विचारणा करण्यासाठी शाहरुख त्यांच्या घरी पोहोचला होता. ९५ वर्षीय दिलीप कुमार यांची भेट घेऊन शाहरुखने त्यांच्यासोबत काही वेळ व्यतीत केला. या भेटीचा फोटो दिलीप कुमार यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
ट्विटरवर पोस्ट करण्यात आलेल्या या फोटोमध्ये शाहरुख मोठ्या प्रेमाने आणि आपुलकीने दिलीप कुमार यांचा हात हातात घेऊन त्यांना आधार देत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी वाढतं वय आणि त्यामुळे ओढवणारे आजार यांमुळे दिलीप कुमार यांची प्रकृती खालावली होती. पण, सध्या मात्र त्यांची प्रकृती स्थिर आहे.
.@iamsrk came to visit Saab at home today. -FF pic.twitter.com/GLrnqu1Ln2
— Dilip Kumar (@TheDilipKumar) February 12, 2018
दिलीप कुमार यांचा मानलेला मुलगा म्हणूनही शाहरुख ओळखला जातो. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये जेव्हा शाहरुख त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचला होता, तेव्हा सायरा बानो यांनी स्वत: ट्विटर पोस्टमध्ये मानलेला मुलगा म्हणून शाहरुखचा उल्लेख केला होता.