हिंदी चित्रपटसृष्टीचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. मात्र, त्यांना पूर्णपणे बरे होण्यासाठी थोडा अवधी लागणार असून त्यांना विश्रांतीची गरज असल्याचे त्यांची पत्नी, अभिनेत्री सायरा बानो यांनी गुरुवारी स्पष्ट केले. दिलीप कुमार यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे रविवारी संध्याकाळी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. गुरूवार सकाळपासून त्यांच्या प्रकृतीत सुधार दिसू लागल्याचे सायरा बानू यांनी सांगितले. मात्र, त्यांना पूर्णपणे बरे होण्यासाठी वेळ लागणार असून विश्रांतीची गरज असल्याचे बानो यांनी म्हटले आहे. दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत सुधार व्हावा यासाठी प्रार्थना करणाऱ्या आणि शुभेच्छा देणाऱ्या चाहत्यांचेही त्यांनी मनापासून आभार मानले. ते बरे होऊन लवकरच घरी येतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.तब्बल सहा दशके आपल्या अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीवर वर्चस्व गाजवणाऱ्या दिलीप कुमार यांनी आत्तापर्यंत ६० हिंदी चित्रपटांमधून काम केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dilip kumars condition improving