ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांच्या पूर्वजांचे पेशावरमधील निवासस्थान कोसळण्याच्या बेतात आहे. काही दिवसांपूर्वीच या निवासस्थानाचे दोन मजले कोसळले असून अन्य मजले कोणत्याही क्षणी कोसळतील अशा अवस्थेत आहेत.
सदर निवासस्थान पाकिस्तान सरकारने राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित केले असून हा वारसा जतन करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी विनंती किस्सी खवानी बाजारनजीकच्या खुदादाद येथील रहिवाशांनी सरकारला केली आहे.
दिलीपकुमार यांना पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी किताब ‘निशान-ए-इम्तियाझ’ प्रदान करण्यात आला आहे. जवळपास १३० चौ. मीटरच्या क्षेत्रात हे निवासस्थान असून ती संरक्षित वास्तू आहे. सरकारला या वास्तूचे वस्तुसंग्रहालयात रूपांतर करावयाचे आहे, मात्र अद्याप त्याबाबत कोणतीही पावले उचलण्यात आलेली नाहीत.
सदर निवासस्थान अत्यंत नाजूक  अवस्थेत असून ते कोणत्याही क्षणी कोसळेल, असे तेथेच राहणारे शाह हुसेन यांनी सांगितले. दोन मजले अगोदरच कोसळले असून संपूर्ण इमारत कधीही कोसळण्याच्या बेतात आहे, असेही हुसेन म्हणाले.

Story img Loader